Monday, 26 July 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 July 2021

Time 7.10AM to 7.20AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** राज्यातल्या पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याचा निर्णय घेणारः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

** रायगड जिल्ह्यातील तळीये गावाचं पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पूर्णपणे पुनर्वसन करण्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आश्वासन

** राज्यात अतिवृष्टीशी निगडित घटनांमध्ये दगावलेल्या व्यक्तींची संख्या १४९, - ६४ लोक अद्याप बेपत्ता

** प्रत्येक भारतीयानं ‘भारत जोडो’ आंदोलनाचं नेतृत्व करण्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

** राज्यात सहा हजार ८४३ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ३१८ बाधि

** टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, मुष्टीयोद्धा एम सी मेरीकोम, नेमबाज अंगद वीरसिंग बाजवा आणि मेराज अहमद खान आणि तलवारबाजीत भवानी देवी दुसऱ्या फेरीत

आणि

** जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकला सुवर्णपदक तर  श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ३८ धावांनी विजय

****

राज्यातल्या पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पूरग्रस्त चिपळूण शहराला मुख्यमंत्र्यांनी काल भेट देऊन, परिस्थितीची पाहणी केली, बाजारपेठेतून पायी चालत त्यांनी नुकसानाचा आढावा घेतला, व्यापारी तसंच नागरिकांशी संवाद साधला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. फक्त सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, असं त्यांनी नमूद केलं. आर्थिक मदत पुरवणं, एवढाच प्रश्न नसून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करणं याला सरकारची प्राथमिकता असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या झालेल्या मदत कार्याबाबत माहिती जाणून घेतली. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्हास्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसंच औषधं, कपडे आणि इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्यांवर अडचणी येऊ नये, यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच केंद्राकडे मागणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

केंद्रीय लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातल्या दरडग्रस्त तळीये गावाला काल भेट दिली. इथल्या लोकांचं पूर्णपणे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्की घरं बांधून देण्यात येतील, असं आश्वासन राणे यांनी दिलं. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व्यवस्थित काम करत असल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात अतिवृष्टीशी निगडित घटनांमध्ये दगावलेल्या व्यक्तींची संख्या १४९ झाली आहे, तर ६४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. राज्य सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा, या जिल्ह्यांमध्ये आलेल्या या आपत्तीत, आतापर्यंत दोन लाख २९ हजार ७४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रत्नागिरी तसंच रायगड जिल्हा प्रशासनाला प्रत्येकी दोन कोटी रुपये, तर अन्य जिल्हा प्रशासनाला ५० लाख रुपये मदत देण्यात आली आहे. तीन हजार २४८ जनावरंही या आपत्तीत दगावली असून, सांगली जिल्ह्यात १७ हजार ३०० कोंबड्याही दगावल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

****

पूरग्रस्त भागात जखमी नागरिकांवर उपचार करतानाच त्यांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यातल्या पूरग्रस्त भागात आरोग्य सेवांसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पूर ओसल्यानंतर साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याची सूचनाही टोपे यांनी केली.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परिक्षा - सीइटीसाठी प्रवेश अर्ज आजपासून भरता येणार आहेत. शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असल्याचं मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितलं.

****

प्रत्येक भारतीयानं ‘भारत जोडो’आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या ७९ व्या भागातून, काल जनतेशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी, देश हीच आपली कायम सर्वात मोठी आस्था आणि प्राधान्य असेल, असा संकल्प करण्याचं आवाहन केलं. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या अनुषंगानं बोलताना, राष्ट्र प्रथम- सदैव प्रथम, हा मंत्र घेऊनच पुढे वाटचाल करायची आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

येत्या १५ ऑगस्टला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रगान डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन जास्तीत जास्त भारतीयांनी एकाचवेळी राष्ट्रगीत गाण्याच्या उपक्रमात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले. खादी तसंच हस्तकला कारागीरांनी केलेल्या वस्तू वापरण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

आज साजरा होत असलेल्या कारगील विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी कारगील हुतात्म्यांना अभिवादन केलं. ऑलिम्पिक स्पर्धेत गेलेल्या भारतीय संघाला सर्वांनी शुभेच्छा देण्याचं आवाहन त्यांनी केलं. जलसंधारण, पर्यावरण, निसर्ग संवर्धन या विषयांवरही संवाद साधताना पंतप्रधानांनी, आगामी सण उत्सवांनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

राज्यात काल सहा हजार ८४३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ६४ हजार ९२२ झाली आहे. काल १२३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१ हजार ५५२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार २१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६० लाख ३५ हजार २९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ९ हजार ९८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३१८ नविन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका, रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २०८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ५०, औरंगाबाद २८, लातूर २१, नांदेड पाच, जालना तीन, हिंगोली दोन, परभणी जिल्ह्यात एकवा रुग्ण आढळला.

****

नाशिकच्या आदिवासी बहुल तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी, भारत ज्ञान विज्ञान समुदाय या संस्थेच्या वतीनं तयार केलेलं भारुड आणि रॅपचे मिश्रण अर्थात, रिमिक्स असलेले गीत, सध्या आदिवासींच्या वाड्या पाड्यांवर गाजत आहे. बोरवठ शाळेतले शिक्षक प्रमोद अहिरे यांनी हे गीत लिहिलं आहे. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली -

आदिवासी बहुल भागातील नागरिकांमध्ये लसीकरणासंबंधी अनेक गैरसमज आहेत. अफवा आहेत. त्यामुळे भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारुडाबरोबरच रॅप पद्धतीचाही यात वापर केलेला असल्याने अबाल वृद्धांना हे गाणं आवडत आहे. हे गाणं जनतेपर्यंत जाईल आणि एक समाज जागृती होईल, अशी मला आशा वाटते.

****

टोकियो ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा २१-, २१-१० असा पराभव केला, आता बुधवारी सिंधूचा सामना हाँगकाँगच्या चेऊंग शी होणार आहे.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत एम सी मेरीकोमने डोमिनिकाच्या गार्सिया मिगेलीनाचा चार-एक ने पराभव करत दुसरी फेरी गाठली.

पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेत भारताचे अर्जुन लाल जाट आणि अर्जुन सिंग यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.

नेमबाज अंगद वीरसिंग बाजवा आणि मेराज अहमद खान यांनी स्कीट नेमबाजी स्पर्धेत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

तलवारबाजी मध्ये भारताच्या भवानी देवी ने ट्यूनिशियाच्या बेन अजीजी नाडियाचा १५ - तीन असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत मनू भाकर आणि यशस्विनी देसवाल या दोघींचंही आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. दहा मीटर पिस्टल प्रकारात दीपक कुमार आणि दिव्यांश सिंग पनवार ही जोडीही पात्रता फेरीतच बाद झाली. मनू भाकर महिलांच्या २५ मीटर पिस्तुल नेमबाजीत सहभागी होणार आहे. येत्या २९ जुलैला ही स्पर्धा होणार आहे. या व्यतिरिक्त मनु भाकर सौरभ चौधरीसोबत १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीच्या मिश्र संघ सामन्यातही खेळणार आहे.

भारताची एकमेव जिम्नॅस्ट, प्रणती नायक देखील पात्रता फेरीत बाद झाली आहे.  

लॉन टेनिस प्रकारात महिलांच्या दुहेरी सामन्यात सानिया मिर्झा आणि अंकिता रैना या जोडीचा युक्रेनच्या नाडिया आणि लूडमिला या जोडीने पराभव केला. तर सुनित नागल आज दुसऱ्या फेरीचा सामना खेळणार आहे. 

पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाच्या संघानं सात-एक असा पराभव केला.

****

हंगेरीत सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकनं सुवर्णपदक पटकावलं आहे. प्रियानं ७५ किलो वजनी गटात बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत केलं.  

****

कोलंबो इथं झालेला श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी ट्वेंटी सामना भारतानं ३८ धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेल्या श्रीलंका संघाला भारतानं निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावत १६४ धावा करत, १६५ धावांचं लक्ष्य दिलं. मात्र श्रीलंकेचा संघ १९ व्या षटकांत १२६ धावांवर सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी मिळवली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या जवळपास ३० गावांना काल पुन्हा एकदा भूगर्भातून गुढ आवाजासह कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी पांगरा शिंदे, नांदापूर, सोडेगाव, हरवाडीदांडेगाव आदी परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. जिल्ह्यातील औंढा, कळमनुरी, वसमत या तालुक्यांच्या काही भागात हे धक्के जाणवले. गेल्या १५ दिवसांपूर्वी रविवार या भागात भूकंपाचा जोरदार धक्का झाला होता.

****

उस्मानाबाद नजिक कौडगांव औद्योगिक वसाहतीमध्ये नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन अंतर्गत, तांत्रिक वस्त्र निर्मीती प्रकल्प उभारण्यासाठी स्वाक्षरी अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. दीड वर्षापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने पाठवावा, या मागणीसाठी, जिल्ह्यातल्या १० हजार नागरिकांच्या सह्यांचं निवेदन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती, आमदार राणा जगजितसिसिंह पाटील यांनी दिली. हा प्रकल्प उभारल्यास जिल्ह्यात १० हजार पेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळू शकतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

****

दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेष सन्मानपत्र देऊन गौरवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी केलेल्या विविध कार्याची दखल घेत, आठवले यांचा गौरव करण्यात आला आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या झरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं बांधावर वृक्ष लागवड, फळबाग आणि बिहार पॅटर्न पद्धतीने वृक्ष लागवड असा विविध वृक्ष लागवड महोत्सव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत काल पार पडला. यावेळी टाकसाळे यांच्या हस्ते गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरणचं ३३ केव्ही केंद्र, जिल्हा परिषद प्रशाला तसंच गावातील प्रमुख रस्त्यावर वृक्ष लागवड करण्यात आली.

//********//

 

No comments: