Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 July 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· रायगड
जिल्ह्यात दरडग्रस्त तळई इथली शोधमोहीम स्थानिकांच्या विनंतीवरून थांबवली.
· राज्य
आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन तुकड्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कायम स्वरूपी
ठेवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.
· विरोधकांच्या
गदारोळामुळे संसदेचं कामकाज बाधित; गदारोळातच काही विधेयकं मंजूर.
आणि
· राज्यात
कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या एक कोटीवर.
****
रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त तळई इथली शोधमोहीम
थांबवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेतल्या
मृतांच्या तसंच बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी केलेल्या विनंती वरुन शोधमोहीम थांबवण्याचा
निर्णय घेतला असून, शोधपथकांना घटनास्थळावरून परत बोलावण्यात आल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं. तळई इथल्या ३१ व्यक्ती अद्यापही बेपत्ता असून, त्यांना मृत घोषित करण्यात
आलं आहे. त्यामुळे तळई इथल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ८४ झाली आहे.
****
तळई गावातल्या दरड दुर्घटनेतल्या जखमींची
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज जे.जे. रुग्णालयात भेट देऊन विचारपूस केली.
दुर्घटनेतल्या १६ जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींच्या उपचाराचा सर्व
खर्च राज्य शासन करणार असून, अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही वैद्यकीय
शिक्षणमंत्र्यांनी रुग्णांना दिली.
****
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफच्या
धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन तुकड्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात
कायम स्वरूपी ठेवल्या जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सांगली
इथं पूरस्थिती आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात
सतत येणारा पूर आणि भूस्खलन यासारख्या घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. राज्य
आपत्ती व्यवस्थापन दलाचं एक केंद्र कराड इथं तर दुसरं रायगड किंवा रत्नागिरी इथं सुरू
केलं जाईल, असं पवार यांनी सांगितलं. पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन या कामावर
देखरेख करण्यासाठी नोडल अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात नेमले जातील, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे
कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही, असं पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा
जिल्ह्यात कोयनानगर दौऱ्यावर जाऊन पाहणी करणार होते, मात्र, मुख्यमंत्र्यांना घेऊन
जाणारं हेलिकॉप्टर मुसळधार पावसामुळे पुणे इथं परत नेण्यात आलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा घातपाताचा
कट पोलिसांनी उधळून लावला. कुरखेडा तालुक्यात लवारी गावानजीकच्या जंगलात नक्षलवाद्यांनी
पुरुन ठेवलेली स्फोटके पोलिसांनी शोधून निकामी केली. उद्यापासून सुरु होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या
शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांची ही कारवाई मोठी मानली जात आहे.
****
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाला आज सकाळी
आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण
मिळवलं. सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली
होती. दरम्यान, या आगीत कोणत्याही सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही.
****
पेगासस हेरगिरी, कृषी कायद्यांना विरोध आणि
इतर कारणांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत
कामकाज चार वेळा तहकूब केल्यानंतर दुपारी तीन वाजता पुन्हा सुरू झालं, तेव्हाही विरोधकांनी
अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात येऊन फलक झळकावत, घोषणाबाजी करत गदारोळ केला. तालिका
अध्यक्ष रमादेवी यांनी या गदारोळातच फॅक्ट्रिंग वि-नियमन सुधारणा विधेयक, राष्ट्रीय
खाद्य तंत्रज्ञान उद्योग तसंच व्यवस्थापन संस्था विधेयक चर्चेविना मतदानाला घेतलं.
सदस्यांनी हात उंचावत मतदान करून ही विधेयकं संमत केली, त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी
तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेचं कामकाज दिवसभरात पाच वेळा तहकूब
करावं लागलं, दुपारी तीन वाजता कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता.
उपसभापतींनी या गदारोळातच समुद्र सहायता विधेयकावर चर्चा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र
गदारोळ सुरुच राहिल्यानं, सदनाचं कामकाज आधी चार वाजेपर्यंत आणि नंतर पाच वाजेपर्यंत
स्थगित करावं लागलं. मात्र त्यानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं, तालिका सभापतींनी
कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाचा
सामना जर्मनीच्या संघासोबत होत आहे. टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताचा अचंत
शरत कमल तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे. उद्या त्याचा सामना चीनच्या मा लोंग याच्याशी होणार
आहे. महिला एकेरीत मात्र मनिका बत्राचा ऑस्ट्रीयाच्या सोफियानं पराभव केला. बॅटमिंटनमध्ये
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीनं
पराभव केला. तिरंदाजीत प्रवीण जाधव, अतनु दास आणि तरुणदीप राय या संघाचा दक्षिण कोरियाच्या
संघानं उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने
एक कोटींचा टप्पा पार केला आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची
संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप
व्यास यांनी ही माहिती दिली. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनी आरोग्य विभागाचं कौतुक केलं आहे.
****
औरंगाबाद इथं आज दोन कोविड रुग्णांचा मृत्यू
झाला, जिल्ह्यात कोविडने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तीन हजार ४८३ झाली आहे. जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या आता एक लाख ४७ हजार १८० झाली असून, यापैकी एक लाख ४३ हजार ३९० रुग्ण
कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात नऊ नवीन रुग्ण
आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ४०० झाली आहे. कोरोना विषाणूमुक्त
झालेल्या १२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १६८ रुग्ण
या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या एका कोविड लसीकरण केंद्रावर
शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
या प्रकरणी भाजपचे ओबीसी मोर्चाचे शहरजिल्हा अध्यक्ष गोविंद केंद्रे यांना शिवसेनेचे
पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात
आली आहे. केंद्रे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या
अंगारकी चतुर्थीला जालना जिल्ह्यातलं राजूर इथलं गणपती मंदीर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा
प्रशासनानं दिले आहेत. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक व्यापाऱ्यांनीही
एक दिवस जनता संचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड नियमांचे पालन करून भाविकांनी
दर्शनासाठी येणं टाळावं, असं आवाहन भोकरदनचे तहसीलदार संतोष गोरड यांनी केलं आहे.
****
विद्यार्थ्यांनी शंका न बाळगता भारतीय सेनेत
दाखल व्हावं, असं आवाहन कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी केलं आहे. कारगील विजय दिनानिमित्त
आज औरंगाबाद इथं कारगील स्मृतीवनात हुतात्म्यांना अभिवादन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
ते बोलत होते. आमदार अतुल सावे, स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यावेळी उपस्थित होते.
युद्ध अथवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. आपण स्वतः दहा वर्षे भारतीय सेनेत सेवा दिली
असून, १९७१ च्या युद्धात सीमेवर तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम केलं. सीमेवर उभे राहून
देशसेवा करण्यासारखं समाधान नसल्याचं कॅप्टन सुर्वे यांनी नमूद केलं.
****
पदोन्नती मधील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचं
आरक्षण कायम करण्यात यावं या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय
मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment