Thursday, 29 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2021

Time 7.10AM to 7.20AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण देणाऱ्या ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ’ विधेयकाच्या मसुद्याला, केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी तर पहिली ते बारावीच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.

·      कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा कवच.

·      महाराष्ट्र सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणा स्थापना करण्यास मान्यता.

·      राज्यात सहा हजार ८५७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ४५१ नवीन बाधित.

·      रुग्ण संख्या कमी होत नसल्यामुळे बीड जिल्ह्यात कोविड रुग्णांचं गृहविलगीकरण बंद.

आणि

·      टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा उप-उपांत्यपूर्व फेरीत विजय.

****

बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण देणाऱ्या ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ’ विधेयकाच्या मसुद्याला, केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. व्यावसायिक, सार्वजनिक आणि खासगी अशा सर्व बँकांमधल्या, प्रत्येक ठेवीदाराच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना, विमा संरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच बँकेवर निर्बंध असले, तरी ९० दिवसात ठेवी परत मिळण्याची तरतूदही या विधेयकात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. कंपन्यांसाठीच्या मर्यादित दायित्व भागीदारी विधेयकाच्या मसुद्यालाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे व्यवसाय सुलभतेला आणखी चालना मिळेल असं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य मंडळासह सर्व मंडळाच्या खासगी शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, राज्य सरकार लवकरच याबाबत आदेश जारी करेल, असं त्या म्हणाल्या. ज्या शाळा शुल्क कपातीच्या आदेशाचं उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं गायकवाड यांनी सांगितलं. हा निर्णय फक्त या वर्षासाठी असून, तो सर्व प्रकारच्या मंडळाच्या खासगी शाळांना बंधनकारक असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

 

राज्यातल्या क आणि ड वर्ग महापालिका तसंच नगरपंचायती आणि नगर परिषदा यामधल्या, कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेले अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास, ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगपालिका, तसंच सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती यांना, ही योजना लागू राहील. त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी, कंत्राटी तसंच मानधन तत्त्चावरील आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश करण्यात येत असल्याचं, सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानात ग्रामीण टप्पा दोनच्या अंमलबजावणीला, मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. योजनेचा हा दुसरा टप्पा राबवण्याकरता २०२५ पर्यंत, एकूण चार हजार ६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. केंद्राचा यात ६० टक्के हिस्सा असून, राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. यासाठी एक हजार ८४० कोटी ४० लाख इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास मान्यता देण्यात आली.

 

महाराष्ट्र सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यासही काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. जागतिक स्तरावर सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी, त्यांना मिळणारा अधिकचा दर आणि राज्यात सेंद्रिय शेतीस अनुकूल असणारी परिस्थ‍िती विचारात घेता, हा निर्णय घेण्यात आला. सध्या सेंद्रिय प्रमाणीकरणाचं काम खाजगी प्रमाणिकरण संस्थामार्फत करण्यात येतं, मात्र शेतकऱ्यांसाठी हे खर्चिक असल्यानं, राज्य सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या यंत्रणेचं मुख्यालय अकोला इथं राहणार असून, कृषी विभागाच्या आठ संभागात क्षेत्रीय कार्यालयं स्थापन करण्यात येणार आहेत.

 

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी -एस डी आर एफच्या निकषांनुसार, दरड तसंच पूरबाधितांना तातडीची मदत पुरवण्यास सुरवात करण्यात आली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबत माहिती दिली. बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरलं नसल्यानं, तसंच पंचनामे सुरु असल्यानं, पुढील पंधरा दिवसांत वाढीव मदतीबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

****

राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी मंजूर रिक्त पदं भरण्यासाठी संबंधित विभागांनी १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससीकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ही पदं भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन, कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.

****

देशात कोरोना विषाणूचा फैलाव अजून पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेले निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांना याबाबत पत्र लिहिलं आहे. पॉझिटीव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये कडक उपाययोजना कराव्या, चाचणी, बाधितांचा शोध, योग्य उपचार, लसीकरण आणि मार्गदर्शक तत्वे या पंचसूत्रीवर सातत्यानं लक्ष ठेवावं, अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.

****

राज्यात काल सहा हजार ८५७ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ८२ हजार ९१४ झाली आहे. काल २८६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३२ हजार १४५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल ६ हजार १०५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६० लाख ६४ हजार ८५६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ५३ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ८२ हजार ५४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ४५१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीडमधील दोन तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २४१ रुग्ण आढळले. उस्मानाबाद १०२, औरंगाबाद ५१, लातूर ४४, परभणी सहा, जालना पाच तर नांदेड जिल्ह्यात काल दोन नवीन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही.

****

रुग्ण संख्या कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, आणि गेवराई या तालुक्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापना पाच तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार या तालुक्यांमध्ये आस्थापना सकाळी सात ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत, तर शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी काल याबातचे आदेश जारी केले. जिल्ह्यात गृहविलगीकरण बंद केलं आहे, त्यामुळे बाधितांनी कोविड सेंटरलाच जाऊन उपचार घेणं बंधनकारक असल्याचं, या आदेशात म्हटलं आहे. 

****

कोविड लसीची मात्रा घेतल्यानंतर प्रत्येक नागरिकानं लसीकरण केंद्रावर अर्धा तास थांबवण्याची सूचना, आरोग्य मंत्रालयानं केलेली आहे. लस घेतल्यानंतर संबंधितावर काही दुष्परिणाम झाल्यास, तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, हा या मागचा उद्देश आहे. या तीस मिनिटांच्या रिकाम्या वेळेचा, अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातल्या कोविड लसीकरण विभागानं, सदुपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागानं या रिकाम्या वेळेत १५ मिनिटं आरोग्य मार्गदर्शन हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले –

१५ मिनिटांत आरोग्य मार्गदर्शन श्री अविनाश कोडेगावकर यांनी ही कल्पना आम्हाला सुचवली आहे आणि आम्ही त्याची लगेच अंमलबजावणी करून त्या कोविड लसीकरण इथे समन्वयक आहेत डॉ.प्रशांत दहिरे यांनी उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. डॉ.काशीकर म्हणून सहयोगी प्राध्यापक आहेत, त्यांनी केंद्रावर १५ मिनिटांची आरोग्य विषयक माहिती सर्व लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना दिली. लसीकरणाचे समज आणि गैरसमज आणि दोन डोस घेतल्यानंतर लसीकरणाचा किती परिणाम होतो, किती दिवस लसीकरणाचे इफेक्ट राहतात, या सर्व गोष्टींचं अद्ययावत जी माहिती आहे त्याची आपण या नागरिकांना या ठिकाणी देणेार आहोत. आणि याचा फायदा निश्चितच या ठिकाणी लस घेतलेल्या नागरिकांना होईल.

****

आठवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू करण्यासाठी, गाव पातळीवर समितीने निर्णय घेऊन शाळा सुरू करण्याबाबत शासनानं परवानगी दिली आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात फक्त ५३ शाळाच सुरू झाल्या आहेत. यापूर्वी फक्त आठ शाळांनी नियमित तासिका सुरू केल्या होत्या. परवा मंगळवारपासून आणखी ४५ शाळा सुरू झाल्या आहेत.

****

पहिला अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं काल पुणे इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. नाटेकर यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदं मिळवली आहेत. भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते.

****

औरंगाबाद इथं प्रस्तावित क्रीडा विद्यापीठ पुणे इथं स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध एमआयएम पक्ष आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीनं, काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. हा औरंगाबादसह मराठवाड्यातल्या गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी अन्यायकारक असल्याचं, आंदोलनकर्त्यांनी यावेळी म्हटलं. यामागणीचं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सादर करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात छायाचित्र न देणाऱ्या १० हजार ८४३ मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. छायाचित्र नसलेल्या मतदारांना विहीत मुदतीत छायाचित्र जमा करण्याचं प्रशासनानं आवाहन केलं होतं. आता अशा मतदारांनी पुन्हा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सहा क्रमांकाचा अर्ज भरून द्यावा, असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे.

****

पारंपारिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना टाळेबंदी काळातील १०० टक्के शुल्क माफी मिळवून द्यावी, यासाठी ए आय एस एफ या संघटनेनं, काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. कोविड टाळेबंदी काळात कोणत्याही महाविद्यालयात अभ्यासवर्ग भरले नसल्यानं, हे शुल्क माफ करण्याची मागणी संघटनेनं केली आहे.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं आज सकाळी उप-उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात दोन्ही सरळ सेटमध्ये विजय मिळवला, तिनं डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टला २१- १५. २१-१३ ने पराभूत केलं.

हॅाकी मध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना अर्जेंटिना विरुद्ध सुरु आहे.

दरम्यान, काल भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनकडून एक-चार असा पराभव पत्करावा लागला.

नेमबाजीत राही सरनोबतचा २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात सामना सुरु आहे.

मुष्टीयोद्धा पूजाराणीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने काल अल्जेरियाच्या स्पर्धकाला पराभूत केलं.

तिरंदाजीमध्ये महिलांच्या एकेरी सामन्यात दीपिका कुमारी हिनं भूतानच्या कारमा हिला सहा - शून्य अशा फरकाने हरवत, उप- उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

तिरंदाज प्रविण जाधव यानं रशियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं मात्र अंतिम सोळा जणांच्या फेरीत पराभव झाल्यानं त्याचं वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

रोईंग मध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल प्रकारात अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान काल कोलंबो इथं झालेला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना श्रीलंकेनं चार गडी राखत जिंकला. या विजयासह यजमान संघानं मालिकेत एक-एक अशी बरोबरी राखली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं दिलेलं १३३ धावांचं लक्ष्य श्रीलंकेच्या संघानं दोन चेंडू राखत पूर्ण केलं. या मालिकेला तिसरा आणि अखेरचा सामना आज होणार आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केलं होतं. या आवाहनास प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा-लोहारा इथून शिवसेनेच्या वतीनं रायगड जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, किराणा आणि संसारोपयोगी साहित्य पाठवण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या दैठणा आणि सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून, नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीचं निवेदन जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण सभापती शोभा घाटगे यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना काल दिलं आहे. दैठणा इथल्या काही घरात पाणी शिरले तर शिर्शी या गावी २३३ मेंढ्या वाहून गेल्या, या कुटुंबाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, त्याची दखल घेऊन प्रशासनानं त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

****

No comments: