Thursday, 3 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरची चर्चा पुन्हा सुरु झाली. अखिल भारतीय अण्णा द्रमुक मनेत्र कळघन पक्षाचे एम थंबीदुराई यांनी चर्चेत सहभागी होत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आरोग्य, पायाभूत सुविधा, कोविड व्यवस्थापन आणि इतर क्षेत्रात सरकारच्या यशावर प्रकाश टाकण्यात आला असल्याचं सांगितलं. कोविड-19 महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. आसाम गण परिषदेचे बिरेंद्र प्रसाद बैश्य, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, राष्ट्रीय जनता दलाचे ए डी सिंग यांनी या चर्चेत सहभाग घेतला.    

****

राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा चार ते ३० मार्च दरम्यान होणार असून, १४ फेब्रुवारी ते तीन मार्च प्रात्यक्षिक परीक्षा होईल अशी माहिती गोसावी यांनी दिली. कोरोनामुळे परिक्षा हुकल्यास विद्यार्थ्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या काळात पुन्हा संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत, तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल, असं ते म्हणाले. बोर्डाच्या परिक्षेसाठी कोविड प्रतिबंधक लस बंधनकारक नाही, असं गोसावी यांनी स्पष्ट केलं. 

****

देशाच्या विविध भागात शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं सुधारित मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. यानुसार शालेय विद्यार्थ्यांना वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे का, हे ठरवण्याचा निर्णय राज्यांनी घ्यावा, असं शिक्षण मंत्रालयानं सुचवलं आहे. वर्गात आणि शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना रांगेत उभं राहताना सुरक्षित अंतर राखण्यासाठी खूण करावी, अशी सूचनाही यात करण्यात आली आहे.

****

मुंबई महानगर पालिकेचा २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचा ४५ हजार १४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज स्थायी समितीला सादर केला. आतापर्यंतच्या पालिकेच्या अर्थसंल्पापैकी हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही. नागरीकांना रोग्यदायी, आनंदी जीवन देवून पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवणं आणि अंमलबजावणी यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला असल्याचं चहल यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचा तीन हजार ३०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे सहआयुक्त अजित कुमार यांनी शिक्षण समितीला सादर केला.

****

देशात कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १६७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५५ लाख दहा हजार ६९३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६७ कोटी ८७ लाख ९३ हजार १३७ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ३४ लाख ७५ हजार ११७ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

****

राज्यातल्या १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे ९१ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे, तर १५ ते १८ वयोगटातल्या ५२ टक्क्यांहून अधिक मुलामुलींना या लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. राज्यातल्या ६७ टक्क्यांहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

****

कोरोना विषाणूची तिसरी लाट राज्यात ओसरताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण सुमारे ४२ टक्क्यांनी कमी झालं आहे. जानेवारी तीन लाखाच्या वर गेलेली राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता दोन लाखापेक्षा कमी झाली आहे. गडचिरोली, नागपूरमधला रुग्ण बाधित होण्याचा दर ४० टक्क्यांपेक्षा जास्त, तर वाशिम, औरंगाबाद, नाशिक, पुणे, वर्धा आणि अमरावतीमध्ये हा दर ३० टक्क्यांहून अधिक आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमधला हा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात चिकलठाणा आणि करमाड रेल्वे मार्गादरम्यान दरम्यान भुयारी मार्गाचं काम करण्याकरता लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज आणि आठ फेब्रुवारीला काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. काचिगुडा ते रोटेगाव एक्स्प्रेस काचिगुडा रेल्वे स्थानकावरुन नियमित वेळेपेक्षा ९० मिनिटे उशीरा सुटेल, औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून १२० मिनिटं उशिरा सुटेल. तर पूर्णा ते हैदराबाद एक्स्प्रेस चार आणि नऊ फेब्रुवारीला पूर्णा रेल्वे स्थानकावरून एक तास उशिरा सुटेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...