Sunday, 20 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.02.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      नक्षलवाद्यांना स्फोटकं पुरवणाऱ्या चौघांना गडचिरोलीतून अटक; स्फोटकासाठीची सामग्री जप्त.

·      देशात परिवर्तनाची गरज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून व्यक्त; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा.

·      पंतप्रधान पीक विमा योजनेत केंद्र सरकारकडून दुजाभाव - कृषी मंत्री दादा भुसे यांचा आरोप.

आणि

·      भारत - वेस्ट इंडीज दरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज अखेरचा सामना.

****

नक्षलवाद्यांना स्फोटकं पुरवणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून स्फोटकांसाठी वापरली जाणारी सामग्री पोलिसांनी जप्त केली, यामध्ये साडे तीन हजार मीटर लांबीच्या कार्डेक्स वायरच्या १० बंडलचा समावेश आहे. पोलीस विभाग आणि जलद कृती दल यांनी संयुक्तपणे अहेरी तालुक्यात ही कारवाई केली. या टोळीतला पाचवा आरोपी फरार झाला आहे. 

****

देशात परिवर्तनाची गरज असल्याचं, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. तेलंगणा आणि महाराष्ट्राची सुमारे एक हजार किलोमीटर लांबीची सीमा आहे. महाराष्ट्राच्या सहकार्याने कालेश्वरम प्रकल्प पूर्ण झाला, यापुढेही अशाच सहकार्यातून काम करण्याची इच्छा राव यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवर काम करून लोकशाही मार्गाने एकत्र पुढे जाण्याच्या चर्चेला आज प्रारंभ झाल्याचं, चंद्रशेखर राव यांनी नमूद केलं. याच संदर्भात हैदराबाद इथं एक बैठक घेऊन अनेक प्रादेशिक पक्षांशी चर्चा करणार असल्याचं सांगत, या बैठकीला येण्याचं आमंत्रण राव यांनी ठाकरे यांना दिलं.

 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी बोलताना, शेजारी राज्यांशी चांगले संबंध राखण्याची गरज व्यक्त केली. सध्या देशासमोरच्या मूलभूत प्रश्नांना बगल देत, अन्य मुद्यांवर लक्ष वळवण्याकडे कल दिसून येतो, या पार्श्वभूमीवर राव यांच्यासोबतच्या चर्चेतून नव्या विचारांना सुरवात झाल्याचं, ठाकरे म्हणाले.

दोन्ही समपदस्थ नेत्यांमध्ये या बैठकीत देशाच्या विकासाला गती देण्यासह अनेक विषयांवर चर्चा होऊन अनेक विषयांवर सहमती झाल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

दरम्यान, राव यांनी, मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही आज भेट घेतल्याचं वृत्त आहे.

****

पंतप्रधान पीक विमा योजनेत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. ते आज अमरावती इथं बोलत होते. पीक विमा योजनेत शेतकरी हिताचे बदल अपेक्षित आहेत, यासंदर्भात केंद्र सरकार कडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला, बीड पॅटर्नसारखा यशस्वी प्रयोग राबवण्यात आला, मात्र केंद्र सरकारने दखल घेतली नसल्याचं, भुसे यांनी सांगितलं. ते म्हणाले –

या योजनेमधे जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत, शेतकरी हिताचे बदल झाले पाहिजेत, त्या दृष्टीकोनातनं केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्याच्यापैकीच एक बीड मॉडेल की ज्याच्यामध्ये नफ्यालाही कंपन्यांना एक मर्यादा आणि उद्या तोटा तर झाला तर त्याच्यातही एक मर्यादा. त्याच्यावरची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची. हे जे मॉडेल होतं, दुर्दैवानं केंद्र सरकारनं अद्याप त्यालाही मान्यता दिलेली नाही. आणि म्हणूनच हा अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि या संदर्भामधे गंभीरपणे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव विचार करत आहेत.

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज १६ जिल्ह्यांतील ५९ विधानसभा जागांवर शांततेत मतदान झालं. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंजाबमध्ये सुमारे ६३ टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५७ टक्के, मतदान झाल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणुका होत असून पंजाब राज्यात ११७ विधानसभा जागांसाठी मतदान झालं.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन उद्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर होणाऱ्या मंथनाचा भाग म्हणून उद्या आणि परवा त्या  आर्थिक समूह, उद्योग, वाणिज्य, व्यापार आणि काही प्रमुख क्षेत्रातील करदाते तसंच मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे अन्य अधिकारी-मान्यवर यावेळी उपस्थित असतील. हा कार्यक्रम आणि इतर घडामोडी सकाळी साडे दहा वाजेपासून अर्थमंत्रालय आणि पत्र सूचना कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर आणि यू-ट्यूब माध्यमांवर उपलब्ध होणार आहे.

****

मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज साजरी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील बाळशास्त्री जांभेकर यांचं योगदान आणि कार्य मार्गदर्शक आहे, त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

औरंगाबाद, बीड तसंच हिंगोली इथं माहिती संचालक कार्यालय, तसंच जिल्हा माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज कोलकाता इथं ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. हा मालिकेतला हा अखेरचा सामना संध्याकाळी सात वाजता सुरु होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

राज्यात टीईटी तसेच म्हाडा पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी बुलडाणा शहरातून एकास अटक केली आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी पुण्याला नेल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातली ही तिसरी व्यक्ती असल्याचं, समोर आलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आलं. दहा जागांसाठी जिल्ह्यातल्या आठ मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आलं. पाच जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. या मतदानाची उद्या मोजणी केली जाणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...