Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२२ सायंकाळी
६.१०
****
· लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई
दौऱ्यावर.
· सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यात अराजक निर्माण झाल्याचा भाजपचा आरोप.
· बीड जिल्ह्यात रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी.
आणि
· आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ
पंत, गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांना दंड.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत
आहेत. उद्या संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत होणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर
पुरस्कार प्रदान सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहतील. या सोहोळ्यात पंतप्रधान मोदी
यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता
मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेला हा पुरस्कार यापुढे दरवर्षी राष्ट्र
उभारणीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन
की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८८ वा भाग
असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यात अराजकाची
स्थिती निर्माण झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार,
भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद
घेऊन ही टीका केली.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला
प्रकरणी आंदोलकांना तातडीने पकडण्यात आलं, मात्र भाजपच्या पोलखोल यात्रेवरचा हल्ला,
भाजप कार्यकर्ते मोहित कंभोज यांच्या वाहनावर तसंच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांच्या घरावर हल्ला करणारे मात्र मोकाट आहेत, हल्लेखोरांना वेगळा न्याय का असा
सवालही या पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा देणाऱ्या राणा
दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेलं आहे.
****
देश २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त होण्याच्या दिशेनं
जलद गतीनं वाटचाल करत आहे. असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आपल्या
ट्विट संदेशात म्हटलं आहे. आधुनिक उपचार पद्धती आणि चांगल्या प्रकारे आरोग्याची काळजी
घेणं यामुळं हे ध्येय साध्य होणार आहे. २०१५ या वर्षी एक लाख लोकांमागे क्षयरोग ग्रस्त
रुग्णांची संख्या २१७ होती तर २०२० मध्ये तीच संख्या कमी होवून १४२ झाली असून मृत्यूदरातही
घसरण झाली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८७
कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.आतापर्यंत १८७ कोटी ४६ लाखांहून अधिक लसीकरण झालं
आहे. काल १९ लाख १३ हजार २९६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८७
कोटी ४६ लाख ७२ हजार ५३६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ५२७ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली, ३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ६५६
रुग्ण बरे झाले. देशात सध्या १५ हजार ७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यातील लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रस्ता
अपघातात सात जणांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी सायगाव जवळ हा अपघात
झाला. लातूर जिल्ह्यातील आर्वी इथलं एक कुटुंब अंबाजोगाई तालुक्यातील राडी इथं घरगुती
कार्यक्रमासाठी जात असतांना समोरुन येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला.
मृतांमध्ये पाच महिला आणि चालकाचा समावेश असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाही. जखमींना
अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री
अमित देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन जखमीवर तातडीने आवश्यक ते उपचार करण्याच्या
सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
दरम्यान, याच ठिकाणी यापूर्वी बस आणि ट्रक चा देखील
भीषण अपघात झाला होता, त्यामुळे या मार्गावर अधिक खबरदारीची उपाय योजना करावी अशी मागणी
नागरिकांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील
खंडाळा देवी गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले
आहेत. खाजगी बस आणि एक चारचाकी वाहन यांच्यात समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला.
****
केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या औरंगाबाद इथं तीन हजार
६२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा होणार आहे. यामध्ये सोलापूर
- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या प्रथम चरणाचं लोकार्पण आणि पैठण - औरंगाबाद रस्त्याच्या
चौपदरीकरण कामाचा समावेश आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती
दिली. शहरातल्या बीड बायपास जवळील जबिंदा लॉन्स इथं सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार
आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन
केल्याप्रकरणी आयपीएल प्रशासन परिषदेने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, दिल्लीचा
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि दिल्लीचे फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांना दंड
ठोठावला आहे. काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स या
सामनाच्या शेवटच्या षटकात नो बॉलवरून दिल्ली कॅपिटल्स संघाने पंचांशी वाद घातला. ऋषभ
पंतला त्याच्या मॅच फीच्या १०० टक्के, शार्दुल ठाकूरला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के
दंड ठोठवण्यात आला आहे. तर, प्रवीण आम्रे यांना त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड
आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
****
मंगोलिया इथं सुरू असलेल्या आशिआई कुस्ती अजिंक्यपद
स्पर्धेत भारताचे रवी कुमार दाहिया, बजरंग पुनिया आणि गौरव बालियान अंतिम फेरीत दाखल
झाले आहेत. ५७ किलो वजनी गटात रवी दाहियानं उत्कृष्ट खेळ करत मंगोलियाच्या झनबजार झंदानबूदला
हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियानं बहरिनच्या
हाजी मोहम्मद अलीला पराभूत केलं आणि ७९ किलो वजनी गटात गौरव बालियानही अंतिम फेरीत
प्रवेश केला आहे.
****
आज जागतिक पुस्तक दिन. जगातील सर्व लेखकांच्या महान
कार्याबद्दल हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक,
वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था- युनिस्कोनं १९९५ पासून हा दिवस पुस्तक आणि वाचन यासाठी
आरेखित केला असून नागरिकांमध्ये वाचनाचा आनंद आणि आवड निर्माण होणं हा यामागचा उद्देश
आहे. २३ एप्रिल हा प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन इंग्रजी भाषा दिवस
म्हणूनही साजरा केला जातो.
****
उदगीर इथं भरलेल्या ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचं दालन उभारण्यात आलं आहे. या
दालनात महासंचालनालयाची विविध प्रकाशनं उपलब्ध आहेत. अधिकाधिक वाचकांनी या दालनास भेट
द्यावी असं आवाहन लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
****
परभणी जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा
२०२२ चं आज जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आज आणि उद्या
या स्पर्धा चालणार आहेत.
****
No comments:
Post a Comment