आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ जून २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जगाला यावर्षी दुष्काळाचा धोका असून, अन्नधान्याच्या वाढत्या कमतरतेमुळे २०२३ हे
वर्ष जगासाठी आणखी वाईट असू शकतं, असा इशारा, संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी दिला
आहे. युक्रेन मधल्या युद्धामुळे संकटांमध्ये आणखी भर पडली आहे, त्यामुळे हवामान बदल,
कोरोनाची साथ तसंच विषमतेमुळे निर्माण झालेल्या जागतिक उपासमारीचं संकट उपस्थित झालं
आहे, असंही संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव अंतोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवृत्त सनदी अधिकारी
परमेस्वरन अय्यर यांची नियुक्ती केली आहे. निती आयोगाचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी
अमिताभ कांत यांचा कार्यकाळ येत्या ३० जुनला संपत आहे. अय्यर यांनी आपल्या सेवाकाळात
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
****
भारतीय नौदलाच्या आखूड पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉन्च क्षेपणास्त्राची चाचणी काल
ओदिशात चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून यशस्वी झाली. संरक्षण संशोधन आणि
विकास संस्था आणि भारतीय नौदलानं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्रानं, हवेतल्या लक्ष्याचा
अचूक वेध घेतला. पृष्ठभागावरुन वरच्या दिशेने मारा करु शकणारं हे क्षेपणास्त्र रडारवर
दिसणार नाही अशा हवाई आक्रमणांचा वेध घेऊ शकतं.
****
भारत एन सी ए पी अर्थात नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक अधिसूचनेचा
मसुदा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला. त्यानुसार
भारतातल्या वाहनांना त्यांच्या क्रॅश चाचण्यांमधल्या कामगिरीच्या आधारे स्टार रेटिंग
दिलं जाईल, असं ट्विट गडकरी यांनी केलं आहे.
****
अग्निवीर योजना रद्द करावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि स्वराज इंडिया
परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात
आला. यावेळी युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
नांदेड तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून चांगला पाऊस झाल्यामुळे कालपासून पेरणीला
सुरूवात झाली. तालुक्यातल्या विविध मंडळात शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment