Wednesday, 29 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.06.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2022

Time - 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जून २०२ सायंकाळी ६.१०

****

      राज्यसरकारच्या बहुमत चाचणीसाठी विधानसभेचं उद्या विशेष अधिवेशन.

      अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव.

      सातबारा उताऱ्याशी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी लिंक करण्याचा निर्णय.

आणि

      ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींसाठी चार ऑगस्टला मतदान.

****

विधानसभेचं विशेष अधिवेशन उद्या बोलावण्यात आलं आहे. सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आलं असून सर्वांनी सभागृहात उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि विधीमंडळ सचिवालयाला एक पत्र पाठवून हे निर्देश दिले. हे विशेष अधिवेशन राज्य सरकारच्या बहुमत चाचणीसाठी बोलावण्यात आलं आहे, अशी माहिती विधानमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आली.

 

उद्या सकाळी ११ वाजता हे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं आणि बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असं राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे. विधान भवनात आणि विधान भवनाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, जेणेकरून बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल, सभागृहाच्या कामकाजाचं थेट प्रेक्षपण करण्यात यावं, आमदारांना त्यांच्या जागेवर उभं राहून शीरगणतीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडावी, कोणत्याही कारणास्तव बहुमत चाचणीची प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही, बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं आणि त्याचा अहवाल आपल्याकडे सोपवण्यात यावा, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या आहेत.

****

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं सांगत शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

****

सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना उद्याच्या बहुमत चाचणीत मतदानाची परवानगी द्यावी, यासाठी त्यांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सायंकाळ सुनावणी घेण्यास न्यायालयानं मंजुरी दिली आहे. यापूर्वी विधान परिषद, तसंच राज्यसभा निवडणुकीत न्यायालयानं या दोघांना मतदानाची परवानगी दिली नव्हती.

****

शिवसेनेचा बंडखोर गट उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार आहे. त्यात सर्व आमदार सहभागी होतील, अशी माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. सगळ्या आमदारांनी आज गुवाहाटी मध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते गोव्याला जाणार असून, उद्या सकाळी सगळे आमदार मुंबईत दाखल होणार आहेत.

****

प्राथमिक कृषी पत संस्थांच्या संगणकीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. देशभरातल्या ६३ हजार कृषी पतसंस्थांच्या संगणकीकरणासाठी सुमारे दोन हजार ५१६ कोटी रुपये खर्चालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. या निर्णयाचा १३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचा विश्वास ठाकूर यांनी वर्तवला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलाची विक्री नियंत्रणमुक्त करण्यालाही आजच्या बैठकीत मंजुरी दिली.

****

राज्यातील चार कोटी जमीनमालकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्यांच्या सातबारा उताऱ्याशी लिंक करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंद, बोजा आदींची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसेच जमिनींची परस्पर विक्री होत असल्यास ही बाब खातेदारांना एसएमएसच्या माध्यमातून समजणार असून, या माध्यमातून फसवणूक रोखणे शक्य होणार आहे

****

देशाची कोविड लसीकरणाची व्याप्ती १९७ कोटीहून अधिक झाली आहे. दोन कोटी ५६ लाख ७८ हजारावर लसीकरण सत्रांमधून १९७ कोटी ४६ लाखाहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत तीन कोटी ६५ लाखाहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची मात्रा देण्यात आली आहे.

****

आज सांख्यिकी दिवस, प्रसिद्ध सांख्यिकीतज्ज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंग यांनी सांख्यिकी विज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशावर प्रकाश टाकला. सांख्यिकी विज्ञानामुळे  शाश्वत विकासासाठी धोरणं आणि निर्णय घेण्यास मदत होते,असं राव यांनी नमूद केलं.

****

अमरनाथ यात्रा उद्यापासून सुरु होत असून, त्यासाठी काश्मीर खोऱ्यात सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीनगरच्या उपायुक्तांनी पंथ चौकातल्या यात्रेकरुंसाठीच्या छावणीला काल भेट देऊन तिथल्या तयारीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी आरोग्य शिबीर, दळणवळणाची साधनं, पाण्याचं व्यवस्थापन, स्थानिकांची दुकानं आदींचीही तपासणी केली.

****

राज्यात पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद तसंच खुलताबाद तालुक्यातल्या प्रत्येकी एक, पैठण सात, गंगापूर तसंच वैजापूर प्रत्येकी दोन, सिल्लोड तालुक्यात तीन, जालना जिल्ह्यात जालना तालुक्यातल्या सहा, परतूर एक, बदनापूर १९ आणि मंठा तालुक्यात दोन, बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या तीन, तर गेवराई आणि अंबेजोगाई तालुक्यात प्रत्येकी पाच, लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यात चार, देवणी एक तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात चार, उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तसंच लोहारा तालुक्यात प्रत्येकी दोन, कळंब आणि वाशी तालुक्यात प्रत्येकी एक, तर उमरगा तालुक्यात पाच, आणि परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. संबंधित तहसीलदार पाच जुलै रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. १२ ते १९ जुलै या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, त्यांची छाननी २० जुलैला होईल. तर २२ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रं मागे घेता येतील. चार ऑगस्टला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदान तर मतमोजणी पाच ऑगस्टला होईल.

****

हैदराबाद मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात आज नवे १८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक लाख दोन हजार ८८४ रूग्ण बाधित झाले असून, यापैकी एक लाख १५३ रुग्ण बरे झाले आहेत.

****

राज्यात येत्या २ दिवसात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत उद्या ऑरेंज अलर्ट तर ठाणे, पालघरसह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. परवा कोकण किनारपट्टी, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ९ टक्के पेरण्या झाल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबादचे आमदार हरवले असल्याची तक्रार आम आदमी पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे.  पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार घेण्यास नकार देण्यात आल्यानं ही तक्रार टपालानं पाठवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच आमदारांचा समावेश आहे, या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज वाहन फेरी काढण्यात आली. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी देत या वाहनफेरीनं  शहरातल्या विविध भागातून मार्गक्रमण केलं.

दरम्यान, पैठण तालुक्यातल्या रजापूर इथं शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि संदिपान भुमरे यांच्या समर्थनार्थ शांततेत भव्य रॅली काढण्यात आली. पाचोड पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...