Thursday, 30 June 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      बहुमत चाचणी रोखण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

·      शिवसेनेचा बंडखोर गट काल गुवाहाटीमधून गोव्यात दाखल

·      औरंगाबाद शहराचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा प्रस्तावही मंजूर

·      अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या ८०५ कोटी १७ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य सरकारची मान्यता

·      हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार

·      उपराष्ट्रपती पदाची सहा ऑगस्टला निवडणूक

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार ९५७ रुग्ण, मराठवाड्यात १०८ बाधित

आणि

·      हैदराबाद मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचं निधन

****

सविस्तर बातम्या

महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी रोखण्याची शिवसेनेची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचाही काल राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी राजभवन इथं भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, बहुमत चाचणी थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं, शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं होतं. न्यायालयानं या याचिकेवर सायंकाळी तातडीनं सुनावणी घेतली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं बहुमत चाचणी रोखण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी थेट संवाद साधत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले...

Byte

महाविकास आघाडीकडे शिवसेनेकडे किती आमदार आहेत, मग भाजपकडे किती आहेत, आणखी किती आहेत, मला त्यामध्ये रस नाही. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे, की माझ्या विरोधामध्ये कोण आहेत, किती आहेत, मला त्याच्यात आजीबात रस नाही. पण माझ्या विरोधात एक जरी माझा माणूस उभा राहीला तरी ते मला लज्जास्पद आहे. ठिके तुमची इच्छा ही प्रमाण. कारण का मला तो खेळच खेळायचा नाहीये. आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे

आपल्या कार्यकाळात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करता आलं, याचं समाधान वाटत असल्याची भावना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ज्या लोकांनी सतत ही मागणी केली, ते लोक या बैठकीला अनुपस्थित होते, मात्र ज्यांचा या नामकरणास विरोध असल्याचं भासवण्यात आलं, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र या नामकरणाला कोणताही विरोध न करता, तत्काळ मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमुक्तीसह महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

बहुमत चाचणीची मागणी होताच, राज्यपालांनी तत्काळ बहुमत चाचणीचे आदेश दिले, तीच तत्परता विधान परिषदेच्या नामनियुक्त १२ आमदारांच्या प्रलंबित प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी दाखवावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

बंडखोर शिवसैनिक आमदारांनी नाराजीच्या मुद्यावर प्रत्यक्ष आपल्याशी चर्चा करायला हवी होती, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लावल्या जात असलेल्या सुरक्षा बंदोबस्तावर, त्यांनी उपरोधिक टीका केली. ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांततेचं आवाहन केलं. शिवसेना आपलीच आहे, ती कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आश्वासित केलं. ते म्हणाले...

Byte

   

मी आज सांगतो उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचलं, शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या, आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या, तो गोडवा त्यानं लखलाभो. मला तुमच्या प्रेमाचा गोडवा पाहीजे. मला तुमच्या आशिर्वादाचा गोडवा पाहीजे, हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत. मला पुन्हा सगळ्यांची साथ, सोबत, आशिर्वाद पाहीजे, प्रेम पाहीजे. पुन्हा मी शिवसेना भवनामध्ये बसायला सुरूवात करणार आहे. माझ्या शिवसैनिकांना भेटायला सुरूवात करणार आहे आणि पुन्हा एकदा नविन भरारी मारणार आहे. सगळे जे काही तरुण तरुणी आणि माझ्या माता - भगीनी आहेत, त्यांना सोबत घेऊन. शिवसेना आपलीच आहे, शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेचं आज बोलावलेलं विशेष अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे.

****

शिवसेनेचा बंडखोर गट काल गुवाहाटीमधून गोव्यात दाखल झाला. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर हा गट आज मुंबईत येणार होता.

****

औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत संमत झालेले हे ठराव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येऊन त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका तसंच महानगरपालिका आणि नगरपालिका यांचं नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल आणि वन विभाग तसंच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

****

राज्यातल्या विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ या तिन्ही प्रादेशिक विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. ही मंडळे पुर्नगठीत करण्यासंदर्भातली विनंती केंद्र शासनाला करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येईल. सध्याच्या मंडळाचा कालावधी ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला आहे.

अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या ८०५ कोटी १७ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच यात राज्य शासनाचा आर्थिक हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठीचा राज्य शासनाचा दोन हजार ४०२ कोटी ५९ लाख रुपयांचा ५० टक्के इतका हिस्सा केंद्र शासनास निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्याने देण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यात हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने केलेल्या शिफारशीस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

राज्यातल्या ग्रामीण भागात विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ग्रामीण भागात २० लाभार्थ्यांकरता एक वसाहत निर्माण करण्यात येईल. दहा कुटुंबांकरता प्रति वसाहतीसाठी अंदाजे ४४ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला लाभार्थी निवडण्याचे अधिकार देण्यात येणार आहे.

****

केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतिपद निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना पाच जुलै रोजी जारी करण्यात येणार आहे. यासाठी १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आवश्यकता भासल्यास सहा ऑगस्टला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं जाईल. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ९५७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ७२ हजार ४७४ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९२२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ६९६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ९८ हजार ८१७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २५ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १०८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४२, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १८, जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी १४, तर बीड जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

राज्यातल्या चार कोटी जमीनमालकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्यांच्या सातबारा उताऱ्याशी लिंक करण्याचा निर्णय, भूमिअभिलेख विभागानं घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंद, बोजा आदींची माहिती, खातेदाराला एस एम एस आणि ई-मेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसंच जमिनींची परस्पर विक्री होत असल्यास ही बाब खातेदारांना समजणार असून, या माध्यमातून फसवणूक रोखणं शक्य होणार आहे.

****

राज्यात पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यातल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, चार ऑगस्टला मतदान होणार असल्याची घोषणा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं केली आहे.

****

औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासकपदी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक पदी बदली झाली आहे.

मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त सेवानिवृत्त होत असल्यानं, गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसाळकर यांची मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

हैदराबाद मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले नावंदर यांनी भुमीगत राहून औरंगाबाद तहसिल कचेरीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. परसोडा आणि रोटेगाव रेल्वे रुळ उखडून, तसंच तारा तोडून निजाम सरकारची दळणवळण व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील ते सहभागी होते. विद्यार्थी संघाचे चिटणीस, मराठवाडा स्वातंत्र्यसैनिक संघटना, मराठवाडा बुद्धिबळ संघटना, तसंच औरंगाबाद वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. नावंदर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शहरातल्या टी.व्ही.सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, आतिषबाजी करुन आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे उस्मानाबाद शहरातही शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला.

दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला विरोध दर्शवला आहे. सत्ता जात असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतला जातो. त्याअनुषंगानं आम्ही लढा देणार असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.

****


औरंगाबादचे आमदार हरवले असल्याची तक्रार आम आदमी पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार घेण्यास नकार देण्यात आल्यानं ही तक्रार टपालानं पाठवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच आमदारांचा समावेश आहे, या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काल वाहन फेरी काढण्यात आली.

दरम्यान, पैठण तालुक्यातल्या रजापूर इथं शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि संदिपान भुमरे यांच्या समर्थनार्थ शांततेत भव्य रॅली काढण्यात आली. पाचोड पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

****

राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आज ऑरेंज अलर्ट तर ठाणे, पालघरसह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

 

 

No comments: