Monday, 1 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज मुंबईतल्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राऊत यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीने काल दिवसभर चौकशीनंतर मध्यरात्री अटक केली. 

****

संजय राऊत यांच्या अटकेचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजला. त्यासह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊत यांच्या अटकेच्या मुद्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

दरम्यान, महागाईच्या मुद्यावर उद्या राज्यसभेत चर्चा केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सभागृहात सांगितलं.

लोकसभेत राऊत यांच्या अटकेसह, चार खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ सुरु केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. 

****

संजय राऊत यांच्या अटकेच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं राज्यभर निदर्शनं करण्यात येत आहेत. औरंगाबाद इथं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. 

****

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३६ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत आजपासून एक हजार ९७६ इतकी झाली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

****

आपल्या देशा तेल इंधनावर सोळा लाख कोटीची आयात होत असून, हा खर्च कमी करण्यासाठी बायो सीएनजी, हरीत हायड्रोजन याचा अत्याधिक उपयोग होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मध्ये एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. हरीत हायड्रोजन हे भविष्यातलं इंधन असून, ते बायोमासपासून तयार होत असल्यानं शेतकऱ्यांनीच या हरीत हायड्रोजनची निर्मिती करावी, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल आठ लाख ३४ हजार १६७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०कोटी ३४ लाख तीन हजार ६७६ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १६ हजार ४६४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १६ हजार ११२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ४३ हजार ९८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या एकशे दोनाव्या पुण्यतिथीनिमित्त, तर मराठी साहित्यात उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आज विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नांदेड इथल्या देगलूरच्या महाविद्यालयातले प्राध्यापक राजेश्वर दुडुकनाळे यांचं “अण्णाभाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवादया विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे.

****

आज पहिला श्रावणी सोमवार. यानिमित्त बारा ज्योतिर्लिंगासह ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळच्या श्री घृष्णेश्वर मंदीरात, बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदीरात, तर हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत.

****

यंदाचा पद्मश्री डॉ. विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार, साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक, आणि पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते, किशोर बेडकीहाळ यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट साहित्य पुरस्कार रविंद्र इंगळे-चावरेकर यांना, तर विशेष साहित्य पुरस्कार मंगेश नारायण काळे यांच्या, ‘चित्रसंहिताया समीक्षा ग्रंथास जाहीर झाला आहे. समाज प्रबोधन पुरस्कारपरिवर्तनाचा वाटसरुया पत्रिकेच्या संपादक अभय कांता, नाट्यसेवा पुरस्कार दत्ता भगत, आणि कलागौरव पुरस्कार, कलावंत छबुबाई चव्हाण यांना जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी काल ही घोषणा केली. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून, ११ ऑगस्टला प्रवरानगर इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यादुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंट किट्स इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकून एक शून्य अशी आघाडी घेतली आहे.

//***********//

No comments: