Monday, 1 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  01 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रशासनानं कार्यक्षमता वाढवावी - मुख्यमंत्र्यांची सूचना.

·      देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल - शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका.

·      खासदार संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी.

·      निवृत्त माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचं आज औरंगाबाद इथं निधन.

आणि

·      मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात.

****

केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रशासनानं कार्यक्षमता वाढवावी, तसंच परस्पर समन्वय ठेवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह योजना अंमलबजावणीसंदर्भात आज मुंबईत प्रशासकीय आढावा बैठक घेतली, त्यावेळी बोलताना, या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. कोविड बूस्टर डोस लसीकरणाला वेग, एक जिल्हा एक उत्पादन, जलजीवन मिशन, शहरी गृहनिर्माण योजना, आदी योजनांना वेग देण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

हर घर तिरंगा ही मोहिम राज्यामध्ये सर्व नागरिकांनी उत्साहाने राबवावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने चांगली जनजागृती करावी, अशी सूचना केली.

****

देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असून, आता राजकीय पक्षांसोबतच जनतेनेही विचार करण्याची गरज असल्याचं मत शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना पक्षप्रवक्ते खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रादेशिक पक्ष संपवण्याचं भाजपचं धोरण असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पाठोपाठ भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचं विधानही भाजपच्या याच धोरणाचं सुतोवाच करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

नड्डा यांनी बिहारमध्ये पाटणा इथं काल १६ जिल्ह्यांतल्या भाजप कार्यालयांचा शुभारंभ केला, त्यावेळी केलेल्या भाषणात, कुठल्याही राजकीय पक्षात भाजपशी स्पर्धा करण्याची क्षमता नाही. महाराष्ट्रातही शिवसेनेचा अंत होत असून देशात फक्त भाजप शिल्लक राहिल. उर्वरित राजकीय पक्ष नष्ट होतील असा दावा केला आहे.

****

दरम्यान, संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यात सकाळी १० ते रात्री १० या दरम्यान राऊत यांची चौकशी केली जाईल आणि ते त्यांच्या वकिलांना सकाळी साडे आठ ते साडे नऊ या काळात भेटू शकणार आहेत. राऊत हे हृदयविकाराचे रुग्ण असल्याने रात्री साडे दहा वाजेनंतर त्यांची चौकशी करणार नाही, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं आहे. काल रविवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर मध्यरात्री राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर आज, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर, तर राऊत यांच्या वतीने वकील अशोक मृंदरगी यांनी युक्तिवाद केला. वेणेगावकर यांनी राऊत यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौकात शिवसेनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल आठ लाख ३४ हजार १६७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०४ कोटी ३४ लाख तीन हजार ६७६ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

निवृत्त माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचं आज औरंगाबाद इथं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले धारुरकर यांनी, तरूण भारत वृत्तपत्राचे संपादक म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं प्रताप नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारुरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परखड पत्रकार आणि विचारवंत असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धारूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी विचारांना बळकटी देणारं मोठं लेखन कार्य धारूरकर यांनी केलं. एक उत्तम संपादक, वैचारिक स्तंभलेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २९ लाख ३१ हजार ४२० मतदार असून त्यांनी एक एप्रिल २०२३ पर्यंत मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आधार क्रमांक संलग्न करणं ऐच्छिक असणार असल्याचं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत निवडणूक कार्यालयांकडून विशेष शिबिरांचं आयोजनही केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सुमारे पाच लाख २५ हजार राष्ट्रध्वज घरांवर फडकवण्याचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रध्वज नागरिकांसाठी २९ रुपये किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

औरंगाबाद तालुक्यातल्या तिसगाव ग्रामपंचायतीला आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते सर्व प्रथम ध्वज वितरीत करण्यात आले. याबद्दल उपसरपंच नागेश कोठारे यांनी आनंद व्यक्त करत सर्वांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं –

 

खूप आनंदाची बाब आहे आमच्या गावासाठी. पूर्ण जिल्हाभरामधून आमच्या गावामध्ये पहिल्यांदा माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आम्हाला वितरीत करण्यात आले. यासाठी आम्ही तीन हजार झंड्यांची खरेदी केलेली असून आम्ही आमच्या गावामध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती करून प्रत्येकाने आपल्या घरावर हा राष्ट्रध्वज फडकवावा असं आम्ही सर्वांना आवाहन करणार आहोत.

                                   ****

आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंगासह महादेवाच्या विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. परळी इथं वैद्यनाथाच्या, औंढा इथं नागनाथाच्या तर वेरुळ इथं घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात आलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. जालना शहरातल्या पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचं, दिसून आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाचे दहा दरवाजे बंद करण्यात आले असून आठ दरवाज्यातून चार हजार १९२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली आहे. धरणात सध्या ९० टक्के जलसाठा आहे.

****

देवदर्शनासाठी गेलेल्या हिंगोली इथल्या भाविकांच्या वाहनाला कर्नाटकात अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. बंगळुरू महामार्गावर चित्रदुर्ग इथं काल ही दुर्घटना घडली. गंभीर जखमींना चित्रदुर्ग इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीनं या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

शहरातल्या बलवंत वाचनालयामार्फत आजपासून तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ग्रंथालयात मुबलक ग्रंथसाठा उपलब्ध असून नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बॉल प्रकारात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा पराभव करत, अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जलतरणमध्ये ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात भारताचा श्रीहरि नटराजन अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

****

No comments: