Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 02 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेत
आज कामकाज सुरु होताच शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत
असल्याचा मुद्दा उपस्थित करुन, गोंधळ करण्यास सुरुवात केली. सभापती एम व्यंकय्या नायडू
यांनी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि शिवसेनेद्वारे दिलेले स्थगन प्रस्ताव फेटाळले. त्यामुळे
या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यानं, सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
****
सर्व देशवासियांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत सामाजिक माध्यमावर प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंगा ठेवावा असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावर आपलं प्रोफाईल
पिक्चर बदललं असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, आज आपल्या तिरंग्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ या
गौरवशाली मोहिमेसाठी सिद्ध झाला असल्याचं म्हटलं आहे.
****
भारतीय
जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत ‘आझादी का अमृत महोत्सव’
आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबाबत चर्चा करण्यात आल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद
जोशी यांनी सांगितलं. नऊ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन
करण्यात येणार असून, पक्षाचे खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात
अतिवृष्टीनं बाधित परिसरात तातडीनं मदत देण्याची मागणी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते
अजित पवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात दहा लाख हेक्टरपेक्षा
अधिक क्षेत्रावर अतिवृष्टी झाली असून, शेतीचं त्याचबरोबर घरं, पशुधन आणि सार्वजनिक
मालमत्तेचं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करावा,
पीकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये, तर फळबागांसाठी हेक्टरी
दीड लाख रुपये मदत द्यावी, या भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं,
आदी मागण्या पवार यांनी यावेळी केल्या. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा
शपथविधी होऊन एक महिला उलटून गेला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, असं सांगून
पवार यांनी, राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी गावोगावी जाऊन सत्कार स्वीकारण्यापेक्षा
जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असं ते म्हणाले.
****
खाजगी क्षेत्रांना ड्रोन नियमावली २०२१ नुसार वस्तूंच्या वाहतुकीसाठी ड्रोनचा वापर
करता येईल, असं सरकारनं जाहीर
केलं आहे. कृषी, लस मात्रा पोहोचवणं, सर्वेक्षण,
शोध आणि बचाव, वाहतूक, नकाशा
आणि आराखडा तयार करणं, संरक्षण, तसंच कायद्याची
अंमलबजावणी अशा क्षेत्रात ड्रोनचा वापर करता येणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
व्हि के सिंग यांनी काल ही माहिती दिली. लस मात्रांची ने-आण,
शेतावरील फवारणी, स्वामित्व योजनेअंतर्गत जमिनींचे
उतारे इत्यादीसाठी सरकार ड्रोनचा वापर प्रभावीपणे करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्याच्या मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २९ लाख ३१ हजार ४२० मतदार असून, त्यांनी एक एप्रिल २०२३ पर्यंत मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्याचं
आवाहन, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आधार
क्रमांक संलग्न करणं ऐच्छिक आहे, असं त्यांनी सांगितलं.
या मोहिमेअंतर्गत निवडणूक कार्यालयांकडून विशेष शिबिरांचं आयोजनही केलं
जाणार असल्याची माहिती चव्हाण
यांनी दिली.
****
शालेय विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्याबाबत जाणीव आणि जनजागृती
निर्माण करण्यासाठी, नांदेड जिल्ह्यात विशेष उपक्रम
हाती घेतला आला आहे. या कार्यक्रमाची
सुरूवात नांदेड इथून झाली असून, जिल्हाधिकारी
डॉ.विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा कृती आराखडा
तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातल्या महिला आणि स्वयंसेवक यांना प्रशिक्षित
करून, त्यांच्या मार्फत मोफत कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातल्या १२५ जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून,
तीन लाख विद्यार्थी आणि सहा लाख पालकांपर्यंत बालविवाह निर्मूलनाचा संदेश
पोहचवण्यात येणार आहे.
****
कोविड
महामारी, अतिवृष्टीमध्ये महसूल विभागाकडून चांगलं काम झालं असल्याचे गौरवोद्गार, उस्मानाबादचे जिल्ह्याधिकारी कौस्तुभ
दिवेगावकर यांनी काढले आहेत. उस्मानाबाद इथं काल महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट
अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा
सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत
आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा टि – २० क्रिकेट सामना आज सेंट किट्स इथं खेळला जाणार
आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सामन्याला सुरवात होणार आहे. पाच सामन्यांच्या
मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
//**********//
No comments:
Post a Comment