Tuesday, 2 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  02 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुतोवाच.

·      ओला दुष्काळ जाहीर करून खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी; राज्यपालांना निवेदन सादर.

·      बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान.

आणि

·      नागपंचमीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा.

****

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातलं सरकार संवेदनशून्य असल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला. पूर परिस्थितीत केलेल्या पाहणी दौऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या कामाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे की नाही? असा सवाल विरोधकांना विचारला. ‘शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची योजना थांबली होती. ती आम्ही कार्यान्वित केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या’ असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

दरम्यान, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

****

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांकडे केली आहे. पवार यांच्या नेतृत्वात आज एका शिष्टमंडळानं मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं. मराठवाडा तसंच विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असून, नुकसानाची तातडीनं पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नसल्याकडेही या पत्रातून लक्ष वेधण्यात आलं आहे. या निवेदनात केलेल्या मागण्यांबाबत अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना, राज्यपालांनी याबाबत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले –

 

महाराष्ट्रातला आज शेतकरी-शेतमजूर जो संकटात आहे, तो संकटातनं बाहेर काढण्याच्या करता सरकारनी तातडीनं या सगळ्या गोष्टी करणं, अधिवेशन बोलावणं, ओला दुष्काळ जाहीर करणं, पंच्याहत्तर हजार रुपये खरीपाच्या पिकांना हेक्टरी मदत करणं, जे काही फळबागा आहेत त्यांना दीड लाख हेक्टरी मदत त्या ठिकाणी करणं, आणि पुन्हा त्यांना रब्बीची पिकं घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं, अशा या सगळ्या गोष्टी, आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली. अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थितीत त्या सगळ्या आम्ही सर्वांनी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी सांगितलं की ठीक आहे. मी त्याच्यासंदर्भात सीएम शी डीसीएम शी त्याठिकाणी बोलतो.

****

जगातल्या इतर चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी खूपच चांगली असून आता रुपया हळू हळू वधारत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत सांगितलं. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. भारतीय रुपयाच्या मूल्यात मोठे चढउतार होऊ नयेत, याकरता रिझर्व बँकेनं वेळोवेळी हस्तक्षेप केला असल्याचं त्यांनी सांगितलं. परकीय चलनसाठ्याच्या बाबतीत देश पुरेसा सक्षम असल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत २०४ कोटी ६० लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी ७१ लाख १४ हजारावर लसीकरण सत्रातून हा टप्पा गाठण्यात आला आहे. आतापर्यंत तीन कोटी ९१ लाखापेक्षा अधिक बालकांना कोविड लसमात्रा देण्यात आली आहे.

****

राज्यात आज सकाळपासून ३६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ५६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा तर ६४ लाख १४ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या वेळापत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि सर्व संबंधितानी याची नोंद घ्यावी. या तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर १ ऑगस्ट पासून उपलब्ध करुन देण्यात आलं आहे, असं शिक्षण मंडळानं कळवलं आहे.

****

केंद्रीय विश्वविद्यालय प्रवेश परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा ४, ५ आणि ६ ऑगस्टला होणार आहेत. या परीक्षेची प्रवेशपत्रं तयार असून विद्यार्थांना आपापले प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन घ्यावीत असं परीक्षा मंडळानं कळवलं आहे. या परीक्षेचा पहिला टप्पा जुलै महिन्यात पार पडला. या परीक्षेसाठी एकूण १४ लाख ९० हजार परीक्षार्थिंनी नोंदणी केली आहे.

****

आज नागपंचमीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी महिला भगिनीनी नागाच्या प्रतिमेचे पूजन केलं. ग्रामीण भागासह शहरांमधूनही अनेक ठिकाणी झाडांना झोके बांधून महिला तसंच मुलामुलींनी आनंद लुटला. नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात नागाच्या प्रतिमेचं पूजन करून पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षे कोरोनामुळं मोठ्या प्रमाणात नागपंचमी साजरी करता आली नव्हती.

****

औरंगाबाद महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी आज मावळते आयुक्त डॉ.अस्तिककुमार पांडेय यांच्याकडून पदभार घेतला. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्राधान्य देणार, शहराचा नवा विकास आराखडा, औरंगाबाद शहरासाठीची महात्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना आणि स्मार्टसिटीच्या योजनांसाठी पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. डॉ. अभिजीत चौधरी यांनी यापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे.

****

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर तसंच मोहम्मद अनीस यांनी अंतिम फेरी गाठली आहे. महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. तर टेबलटेनिस स्पर्धेत भारत आणि सिंगापूर यांच्यात तर लॉन बॉल स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना होणार आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंट किट्स इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सामन्याला सुरवात होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विजयवाडा - नगरसोल आणि नगरसोल - नरसापूर दरम्यान या महिन्यात सहा साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे. विजयवाड्याहून नगरसोलला जाणारी गाडी या महिन्याच्या ५, १२ आणि १९ तारखेला विजयवाडाहून सुटेल तर नगरसोलहून नरसापूरला जाणारी गाडी ६, १३ आणि २० तारखेला सुटणार असल्याचं रेल्वेकडून कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड ते विजयवाडा दरम्यानही एक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. ही गाडी ०४ ऑगस्ट रोजी नांदेड इथून रात्री पावणे बारा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता विजयवाडा इथं पोहचेल.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...