Tuesday, 23 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  23 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यावर दिली जाणारी तातडीच्या मदतीची रक्कम ५ हजारावरून १५ हजार रुपये करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      ओल्या दुष्काळाची मागणी आणि थेट नगराध्यक्ष निवडीवरून विरोधकांचा दोन्ही सदनात सभात्याग.

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार डॉ सुधीर रसाळ यांना प्रदान.

आणि

·      सार्वजनिक गणेशोत्सव तसंच नवरात्रोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेण्याचं महावितरणचं आवाहन.

****

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यावर दिली जाणारी तातडीच्या मदतीची रक्कम ५ हजारावरून १५ हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यावर ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालं तर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानाच्या मुद्यावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी विविध विभागांच्या मदतीने सर्वंकष धोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

राज्यात सरासरीपेक्षा १२१ टक्के अधिक पाऊस झाला. त्यामुळे १८ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधित झाली आहे. ऑगस्टमध्ये ८६ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचं नुकसान झालं. याठिकाणी पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नियमित विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबर पासून विम्याची मदत मिळेल. विमा नुकसान भरपाईचे अर्ज बँकेत जमा करता येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गोगलगाय आणि बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल, असं ते म्हणाले. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवता यावा यासाठी राज्यातील स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शेतपिकांमध्ये वैविध्य वाढवणं, सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीला प्राधान्य देणं, तसंच कृषी विद्यापीठ बळकट करण्याची घोषणाही त्यांनी केली.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झालेल्या विरोधी पक्षानं सभात्याग केला. तत्पूर्वी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतमजुरांना एकरकमी मदत जाहीर करावी, अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफी करावी, आदिवासींना खावटी अनुदान द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.

यासंर्भात बोलतांना बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषात नसताना मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आदिवासींना खावटी अनुदान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्याची तरतूद असणारं महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक २०२२ आज विधान परिषदेत बहुमताने मंजूर करण्यात आलं. या विधेयकाला विरोध दर्शवत विरोधकांनी सभात्याग केला. हे विधेयक दोन्ही सदनाच्या ७५ सदस्यांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावं असा प्रस्ताव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडला होता मात्र हा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला त्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आलं.

****

अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी एका महिन्याच्या आत सर्वंकष धोरण आणलं जाईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या जरिकोट इथं वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या ट्रॅकने घराची पडझड केल्यासंदर्भातील तारांकित प्रश्न काँग्रेसचे अमरनाथ राजूरकर यांनी विचारला होता. या प्रकरणी संबंधित तहसीलदार आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात येईल आणि ट्रक चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं विखे पाटील यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

****

भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर आज सदनात अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय तसंच संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीने भरीव वाटचाल करण्याचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचं कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं साहित्यिक तथा ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना जीवन साधना पुरस्कार आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी कुलगुरु बोलत होते. विद्यापीठाची प्रगती आणि विस्तार होत आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद - नॅकचा ए ग्रेड विद्यापीठाला मिळाल्याचं सांगतानाच विद्यापीठाच्या कारकिर्दीचा त्यांनी आढावा घेतला. कोविडच्या मानसिकतेतून विद्यार्थी आणि पालक अजूनही बाहेर पडलेले नाहीत यासाठी विद्यापीठ परिसरात एक चैतन्य निर्माण होण्यासाठी नवनवीन उपक्रम घेण्यात येणार आहेत, यामध्ये युवक महोत्सव, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषद, कुलगुरुंची परिषद असे उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि विद्यापीठात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दरानं तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. तसंच वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असं आवाहन महावितरणने केलं आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृत वीज जोडणी न घेता घरगुती किंवा अन्य अवैध मार्गाने वीज जोडणी घेतली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळासमोर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं महावितरणने कळवलं आहे. तसंच अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या गणेश मंडळांविरूध्द महावितरणच्या नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही प्रादेशिक कार्यालय औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी दिला आहे.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१० कोटी ३१ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत ४ कोटींहून अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असं त्यांचे पुत्र आणि चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी सांगितलं. नाडियादवाला यांनी १९५३ मध्ये चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली. १९६५ च्या महाभारत चित्रपटासह हेरा फेरी आणि वेलकम या विनोदी चित्रपटांसह ५० हून अधिक हिंदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.

****

घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच सरपंचाच्या थेट निवडीस ‘महाविकास आघाडी’चा विरोध असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक त्यांनी आज जारी केलं. नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा, लोकशाहीला बळकटी देणारा हा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारनं प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठराविक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल या भीतीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारनं आदर केला आहे, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

****

No comments: