Wednesday, 24 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  24 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑगस्ट २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      विधान भवन परिसरात आंदोलनादरम्यान सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की.

·      नद्या रुंदीकरण आणि खोलीकरणासंदर्भात राज्यस्तरावर धोरण आखण्यात येणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      एसटी प्रवासाचं तिकीट युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून काढता येणार.

·      साहित्य अकादमीचे बालसाहित्य पुरस्कार; संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीची निवड.

आणि

·      लातूर जिल्ह्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायती कचरा मुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय.

****

विधान भवन परिसरात आज सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाचे आमदार घोषणाबाजी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी तिथे येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी या दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. विरोधी पक्षाचे लोक रोज आमच्या विरोधात घोषणाबाजी करत असतात, आज आम्ही घोषणाबाजी केली तर त्यांनी धक्काबुक्की केल्याचं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं, तर, सत्ताधारी पक्ष सदनात आमचा आवाज उमटू देत नाही आणि सदनाच्या बाहेरही आमचा आवाज बंद करतो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी केला.

****

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की होणं हे दुर्दैवी असून, हे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी आणि जनतेचा अपेक्षाभंग होईल, असं काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आंदोलन करणं हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे, पण आता सत्ताधारीच आंदोलन करत आहेत. सत्ताधारी पक्षाने जबाबदारीनं वागलं पाहिजे, असंही थोरात यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी एक ट्विट करत, शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी विनंतीही सुळे यांनी या संदेशातून केली आहे.

****

राज्यातल्या सगळ्या नद्यांमधला गाळ काढणं, तसंच रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात धोरण आखण्यात येणार असून यासंदर्भातली कार्यवाही युद्ध पातळीवर करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. चिपळूण इथे वशिष्ठी नदीला आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात सदस्य सुनील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या वर्षी नदीतून गाळ काढण्याचं काम झाल्यानं गेल्या वर्षींच्या तुलनेत यावर्षी चिपळूणमध्ये पाणी शिरलं नाही, त्यामुळे भविष्यात राज्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चिपळूणच्या धर्तीवर उपाययोजना करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सगळ्या संबंधितांची बैठक घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल असं मंत्री दीपक केसरकर यांनी आज, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

****

राज्यात कुटुंब न्यायालयांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. पाच वर्षांच्या कालावधी साठी स्थापन करण्यात आलेल्या लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आदी ठिकाणची प्रत्येकी एक प्रमाणे एकूण चौदा कुटुंब न्यायालयं नियमित किंवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

****

एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकिट काढता येणार आहे, महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली. या ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशी पाच हजार ॲण्ड्राईड तिकिट यंत्रं महामंडळानं घेतली आहेत. चन्ने यांच्या हस्ते महामंडळाच्या मुख्यालयात आज या तिकीट यंत्रांचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे एसटी प्रवासात रोखीने व्यवहार कमी होण्यास मदत होणार असून सुट्या पैशांची समस्याही कायमस्वरुपी सुटणार आहे. ही डिजिटल तिकीट वाटप यंत्र पहिल्या टप्प्यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर तसंच भंडारा या विभागांना वितरीत करण्यात आली आहेत.

****

साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार आज जाहीर झाले. मराठी भाषेतल्या बाल साहित्यासाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीची निवड झाली आहे. विविध २३ भाषांमधल्या साहित्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. मराठीसाठी साहित्याची निवड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत सासणे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर आणि साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांच्या समितीनं केल्याचं अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. यंदाचे युवा साहित्यिक पुरस्कारही आज अकादमीनं जाहीर केले, मात्र मराठी भाषेसाठीचा पुरस्कार आज जाहीर झाला नाही. हा पुरस्कार स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, असं अकादमीकडून सांगण्यात आलं आहे.

****

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून एक हजार २८८ किलो वनस्पती तुपाचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. संबंधित दुकानातून वनस्पती तुपाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात हे वनस्पती तूप मानवी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर या वनस्पती तुपाचा सात लाख ३८ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध व्हावं आणि आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या वनस्पती तुपाची खरेदी विक्री करू नये, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे.

****

देशाच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येनं आज दोनशे दहा कोटी अठ्ठावन्न लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातल्या बारा ते चौदा वर्षं वयोगटातल्या चार कोटींहून जास्त मुलामुलींना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे, तर, अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटाच्या चौदा कोटी तीस लाखांहून जास्त नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे.

राज्यात आज सकाळपासून एकतीस हजारपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५४ लाखाच्या वर गेली आहे.

दरम्यान, कोविड लसीची पहिली मात्रा परदेशात घेतलेल्या नागरिकांना भारतात दुसरी मात्रा किंवा खबरदारीची मात्रा घेता येणार आहे. उपलब्ध लसींपैकी कोणतीही एक लस घेण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे. उस्मानाबादच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायती प्लास्टिक आणि कचरा मुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आहे. जागतिक कीर्तीचे कचरा विघटन तज्ज्ञ रामदास कोकरे आता लातूर जिल्ह्याच्या नगर परिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी काल निलंगा नगर परिषद आणि शिरूर अनंतपाळ नगर पंचायती पासून या कामाची सुरुवात केली. येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनी ही शहरं कचरा मुक्त होतील असं नियोजन करण्यात आलं आहे. रामदास कोकरे यांनी यापूर्वी विविध शहरांमध्ये राबवलेल्या शून्य कचरा मोहिमांची दखल जगानं घेतली असून तशीच मोहीम ते आता लातूर जिल्ह्यात राबवणार आहेत. या पद्धतीत कचऱ्याचं सतरा प्रकारात वर्गीकरण होतं आणि प्रत्येक प्रकारापासून नगरपरिषदेला उत्पन्नही मिळू शकतं. या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी सहाआयुक्त कोकरे जिल्ह्यातल्या प्रत्येक शहराला भेट देणार असून उद्यापासून लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमधून कचरा मुक्ती अभियान सुरू होणार आहे.

****

पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर आता औरंगाबाद जिल्हा परिषद देखील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन - एमकेसीएलसोबत करार करत व्यवसाय व्यवस्थापन शाखा - बीबीए च्या १५ उमेदवारांना इंटर्नशिपची संधी देणार आहे. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी ही माहिती दिली.

****

No comments: