Wednesday, 5 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०५ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशभरात आज विजयादशमी अर्थात ‌दसर्याचा सण साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण शौर्य, समृद्धी आणि सौहार्दाचा सण म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दुसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपुरात रेशीमबाग मैदानावर पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि प्रमुख अतिथी पद्मश्री संतोष यादव यांनी शस्त्रपूजन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या आई तुळजाभवानी देवीचा दसरा म्हणजे सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे मोठ्या उत्साहात पार पडला. देवीची मूर्ती पालखीत ठेवून देवी स्वतः मंदिराबाहेर भाविकांना येऊन दर्शन देते.

****

विजयादशमीनिमित्त मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट आज वेगवेगळे मेळावे घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातला गट शिवाजी मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातला गट बांद्रा कुर्ला संकुलातल्या मैदानात मेळावा घेणार आहे.

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचं सोनेरी पान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

जम्मू काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र चकमकींमध्ये चार दहशतवादी मारले गेले. शोपिया जिल्ह्यातल्या द्रास आणि मोलू भागात आज पहाटे या चकमकी झाल्या. जैश - ए - मोहम्मदचे तीन, तर लष्कर -ए- तय्यबाचा एक दहशतवादी यात मारला गेला असून, चकमक अद्यापही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबवण्यात येणार असून, यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते.

//**********//

 

No comments: