Tuesday, 1 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातल्या घटनापीठासमोरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं आहे. दोन्ही बाजूने कोणते मु्द्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहिती देखील देण्याचे निर्देश न्यायालयानं  दिले आहेत.  १६ आमदारांची अपात्रता यासह इतर याचिका घटनापीठासमोर सादर झाल्या आहेत.

****

भारत जलसप्ताहाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज ग्रेटर नोएडा इथं उद्घाटन झालं. जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयातर्फे आयोजित केला जाणारा हा सप्ताह पाच नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. जलस्रोतांबाबत जागृती, संवर्धन आणि वापर यासंदर्भात एकात्मिक दृष्टीने प्रयत्नांसाठी हा सप्ताह आयोजित केला जात आहे. शाश्वत विकास आणि एकतेसाठी जल सुरक्षा अशी या सप्ताहाची संकल्पना आहे.

****

भय आणि दबावमुक्त वातावरणातल्या निवडणुका ही लोकशाहीची मूलभूत गरज असून, निवडणूक प्रक्रीया सर्वसमावेशक करण्यातही निवडणूक व्यवस्थापन यंत्रणांची जबाबदारी महत्त्वाची आहे, असं केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगांची रचना, क्षमता आणि भूमिका या विषयावर नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बीजभाषण देताना ते काल बोलत होते. देशातल्या दुर्बल घटकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरता निवडणूक व्यवस्थापन यंत्रणेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. आज या परिषदेचा समारोप होणार आहे.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी - ईपीएफओनं कर्मचारी पेंशन योजना १९९५ मध्ये जमा असलेला निधी काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचार्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी राहीली असेल, अशांनाच ही परवानगी दिली जाईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भुपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

रेल्वे सुरक्षा दलामध्‍ये मध्ये हवालदार आणि सहाय्यक उप निरीक्षकांच्या नऊ हजार ५०० पदांच्या भरतीबाबत समाज माध्‍यमांवर आणि वर्तमानपत्रांमध्‍ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे. आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्‍यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या तीन हजार ९१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई पोटी साडे आठ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. राज्यात कालपर्यंत ३३ जिल्ह्यांमधल्या एकूण तीन हजार २०४ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला. विविध जिल्ह्यांमध्ये १४० लाख लस मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचं सिंह यांनी सांगितलं.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथं अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. उद्यापर्यंत हे अधिवेशन चालणार असून, किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, नेते डॉ. अजित नवले यांच्यासह ६५ राज्य कौन्सिल सदस्य आणि राज्यभरातले ३०० प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई आणि मदत देणं अपेक्षित असताना, शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा आणि दिखावा करत आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

****

औरंगाबाद शहराच्या वाहतूक गरजा आणि वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन येणाऱ्या पुढच्या तीस वर्षांसाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याचं सादरीकरण केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्या समोर काल औरंगाबाद स्मार्ट सिटी मुख्यालयात करण्यात आलं. यामध्ये शेंद्रा द्योगिक वसाहत ते वाळूज पर्यंत अखंड उड्डाणपूल आणि निओ मेट्रोच्या विकास आराखड्याचा समावेश आहे. उड्डाणपुलाची सुरुवात, विविध पाच ठिकाणी चढ उतार करण्यासाठीची ठिकाणं यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

****

बांगलादेशबरोबरच्या एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघटनेच्या निवड समितीनं संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा कर्णधार, तर के. एल. राहुल उपकर्णधार असेल. राहुल त्रिपाठी आणि यश दयाल यांना एकदिवसीय सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. बांगलादेशबरोबरचा पहिला एकदिवसीय सामना चार डिसेंबरला होणार आहे.

****

आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि शिव थापा भारताच्या पथकांचं नेतृत्व करणार आहेत. जॉर्डनमधल्या अम्मान इथं आजपासून या स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेसाठी भारताचं २५ खेळाडूंचं पथक सहभागी होणार आहे.

//**********//

No comments: