Tuesday, 6 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 December 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून अभिवादन.

·      औरंगाबादसह मराठवाड्यात विविध कार्यक्रमांतून महामानवाला आदरांजली.

·      सीमावादाचा मुद्दा सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशनात मांडावा-खासदार शरद पवार यांची सूचना.

·      ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने निधन.

आणि

·      चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करुन अभिवादन केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

दरम्यान, देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली आहे. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायांनी गर्दी केली आहे. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे सामुहिक बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे.

केंद्रीय संचार ब्युरोचं नागपूर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "भारताचे संविधान आणि महामानवाचा जीवनप्रवास" या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. येत्या ८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

****

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे यांचं ’राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झालं. बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही तीन मूल्यं आहेत. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ’सामाजिक न्याय हे चौथं मूल्यं समाविष्ट केलं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही मूल्येही आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजवली, असं डॉ कांबळे यांनी नमूद केलं. त्यापूर्वी आज सकाळी विद्यापीठातून समता शांती पदयात्रा काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा  भडकल गेट इथं समारोप झाला.

 

डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदीप संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आलं.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालये तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं.  मराठवाड्यात सर्वत्र बाबासाहेबांना विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं.

****

कर्नाटकात बेळगाव जवळ हिरेबागवाडी इथं महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडीफोडीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असून, घडलेल्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी फौजफाटा उभा केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

****

सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय मांडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रक्षोभक विधान करून हा वाद सुरू केला, आता त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. सीमाभागातलं आंदोलन पुढच्या ४८ तासांत थांबवा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दोन राज्यात सीमाप्रश्नावरून होणारा हा वाद देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या चार गावांनी मध्यप्रदेशात समाविष्ट होण्याचा इशारा दिला आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. पाणीप्रश्न, आरोग्य सुविधा, शिक्षण अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

****

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा परिसरातील सुमारे ५५ आदिवासी गावांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी गुजरातमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सुरु केलेलं आंदोलन मागे घेतलं आहे.  या भागाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलं, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

महाविकास आघाडीने जाहीर केलेला १७ डिसेंबरचा मोर्चा हा वैफल्यग्रस्तांचा मोर्चा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. विधीमंडळाचं अधिवेशन नागपुरात असतांना, १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचं महाविकास आघाडीचे नियोजन पाहता, मोर्चाची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर ढकलून बघ्याची भूमिका घेण्याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा डाव स्पष्ट दिसत असल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. सीमा मुद्द्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या काही वाहनांवर कर्नाटकात हल्ले केले, या हल्ल्यांना फूस लावण्याचे काम काँग्रेस आणि जेडीएस करत असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला.

****

शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर उद्या होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय पीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने आता ही सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू असल्याचा आरोप करत सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र १३ जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सुखटणकर यांनी सुमारे पाच दशकं रंगभूमीची सेवा केली. गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांतून तसंच कैवारी, जावई माझा भला, चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, वाट पाहते पुनवेची या सारख्या अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या.

सुखटणकर यांच्या निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुखटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

चतुरंग प्रतिष्ठानचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दुर्ग संशोधक, इतिहास अभ्यासक बाळकृष्ण तथा आप्पा परब यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि तीन लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी डोंबिवलीत होणाऱ्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात आप्पा परब यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज हिंदू शौर्य दिन साजरा करण्यात आला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...