Tuesday, 6 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०६ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करुन अभिवादन केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार, माजी केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 राज्यपाल भगत भगतसिंह कोशारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. दादरच्या इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं काम लवकरात पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी  दिली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही  चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. दरम्यान,देशभरातून मुंबईत चैत्यभूमीवर त्यांचे अनुयायी दाखल झाले आहेत.

***

औरंगाबादमध्येही महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजता समता शांती पदयात्रा काढण्यात आली. विद्यापीठात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप झाला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले आणि प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी भडकल गेट इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.  

***

मराठवाडा मुक्ती संग्रमाचा अमृत महोत्सव यशस्वी करण्याचे निर्देश हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. पापळकर यांनी काल याबाबत एक बैठक घेऊन संबंधित विभागांनी दिलेल्या आराखड्यानुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. या आराखड्यानुसार विविध उपक्रम वेळेत राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

 

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...