Friday, 9 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  09 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ डिसेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      समान नागरिक संहिता विधेयक २०२२ राज्यसभेत सादर; विरोधी पक्षांचा विधेयकावर आक्षेप.

·      सरकारी योजना लागू करताना पर्यावरण सुरक्षेची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त.

·      औरंगाबाद इथं वंदे मातरम सभागृहाचं लोकार्पण; संतपीठाच्या अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचं वितरण.

आणि

·      राज्यात १५ डिसेंबरपर्यंत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता.

****

समान नागरिक संहिता तयार करण्यासाठी राष्ट्रीय निरीक्षण आणि अन्वेषण समितीचं गठन तसंच देशभरात कार्यान्वयासाठी राज्यसभेत एक अशासकीय विधेयक सादर करण्यात आलं. भाजप खासदार डॉ करोडीलाल मीणा यांनी हे समान नागरिक संहिता विधेयक २०२२ सादर केलं. ६३ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने तर २३ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी हे विधेयक सादर करण्यावर आक्षेप घेतला. डाव्या पक्षाच्या खासदारांनी हे विधेयक घटनाविरोधी असल्याचं सांगत, ते परत घेण्याची मागणी केली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल तसंच अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही हे विधेयक असंवैधानिक आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध असल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विधेयक सादर करणं हा प्रत्येक सदस्याचा अधिकार असल्याचं सांगत, सर्व सदस्यांना विधेयक सादर होऊ देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मतदान होऊन हे विधेयक सदनासमोर सादर झालं.

****

सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्यात सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी केलं आहे. उद्याच्या जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ते आज राज्यसभेत बोलत होते. ‘सर्वांसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय’ हा यंदाच्या मानवाधिकार दिनाचा विषय आहे. भारतानं मानवाधिकाराला दिशा देण्यासाठी अनेक पावलं उचलली, कोविड प्रादुर्भावाच्या काळात सर्वांचं लसीकरण आणि खाद्यसुरक्षा हे याचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं, धनखड यांनी म्हटलं आहे.

 

राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग पुन्हा कार्यान्वित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयानं २०१५ मध्ये न्यायिक नियुक्ती आयोग अधिनियम रद्द केला आहे.

 

देशात सध्या २२ गतिशक्ती कार्गो टर्मीनल सुरू करण्यात आले असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत देशभरात अशी शंभर टर्मीनल सुरू करण्याचं उद्दीष्ट निर्धारित आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सध्या देशभरातून कार्गो टर्मीनलसाठी सव्वाशे अर्ज आले आहेत, त्यापैकी ७९ टर्मीनलसाठी मान्यता दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

संसद तसंच विधीमंडळात महिलांचं प्रतिनिधीत्व वाढण्यासंदर्भात घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीच्या गरजेवर केंद्र सरकारने भर दिला आहे. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

भारतातले सुमारे अकराशे विद्यार्थी आणि ९० नागरिक सध्या युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. या सर्वांना युक्रेनच्या सीमेतून बाहेर पडण्याच्या पर्यायांबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकार संपर्क साधत असल्याचं, विदेश राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

 

देशभरात आणखी तीनशे वन स्टॉप सेंटर उघडले जाणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. महिलांसंदर्भातल्या गुन्ह्यांची संख्या अधिक असलेल्या किंवा भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही केंद्र सुरू केली जातील. सध्या देशभरात अशी ७३० केंद्र कार्यरत असल्याची माहिती ईराणी यांनी दिली.

 

लोकसभेत आज सरकारने चार घटनादुरुस्ती विधेयकं सादर केली. यामध्ये दोन विधेयकं तमिळनाडू आणि कर्नाटकात अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्तीची तर दोन विधेयकं हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींच्या यादीत काही समाजाचा समावेश करण्याशी संबंधित आहेत.

 

सुमारे साडे आठ हजार भारतीय सध्या परदेशातल्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोक आखाती देशांच्या कारागृहात असल्याची माहिती विदेश राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी लोकसभेत दिली. भारतानं संयुक्त अरब अमिरात युएईसोबत कैदी हस्तांतरण करार केला आहे. यामुळे युएईच्या तुरुंगातल्या भारतीयांना उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी भारतात पाठवलं जाऊ शकतं, असं मुरलीधरन यांनी सांगितलं.

 

येत्या स्वातंत्र दिनापर्यंत देशभरात खेलो इंडियाअंतर्गत एक हजार केंद्र सुरू होतील, असं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या चर्चेला उत्तर देत होते. यापैकी ७३३ केंद्रांना यापूर्वीच मंजुरी दिल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. खेळांसाठीच्या पायाभूत आराखड्यात सुधारणेवर लक्ष दिलं जात असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

****

सरकारी योजना लागू करताना पर्यावरण सुरक्षेची काळजी घेण्याची आवश्यकता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. त्या आज उत्तराखंडमध्ये मसुरी इथं लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या ९७ वाव्या फाऊंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होत्या. आपल्या उद्दीष्टांची पूर्तता करताना, समाजातल्या वंचित घटकांना समोर ठेवून निर्णय घेण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.

****

११ डिसेंबरला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो रेल्वेमधून तसंच समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

****

औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचं आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. हे सभागृह विकास कार्याच्या चळवळीचे केंद्र व्हावं, असं अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोन एकर परिसरात उभारलेल्या या सभागृहाची चार मजली इमारत असून यामध्ये दोन सभागृहं, एक आर्ट गॅलरी ॲम्पिथिएटर, अतिथी कक्ष, प्रदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सोयी सुविधा करण्यात आल्या आहे. 

****

पैठण इथल्या संत एकनाथ महाराज संतपीठाच्या अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचं वितरण आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. संतपीठाच्या पायाभूत सुविधासह इतर उपक्रमांसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. विद्यापीठानंही सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी केल्या. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी संतपीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतीची दुरुस्ती तसंच इतर सुविधासाठी दोन कोटी रुपयापर्यंतचा निधी जिल्हा नियोजन समिती मधून देणार असल्याचं यावेळी सांगितलं. इतर अभ्यासक्रम आणि अनुषांगिक कामासाठी शासनाकडे पाठवलेल्या निधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही भुमरे यावेळी म्हणाले.

****

राज्यात १५ डिसेंबरपर्यंत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून ५०० किलोमीटर अंतरावर निर्माण झालेल्या ‘मॅनदौस’ चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याचं वेधशाळेतर्फे सांगण्यात आलं आहे. राज्यातही १५ डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज नाशिक जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस तर धुळे जिल्ह्यात सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. रब्बी पिकांवरही या वातावरण बदलाचा परिणाम होत आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे २९ आणि ८ जागांची तसंच ३८ अभ्यासमंडळाची निवडणूक प्रक्रिया उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी बीड, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हयात प्रत्येकी पाच तर जालना जिल्ह्यात दोन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. १३ तारखेला या मतदानाची मतमोजणी होणार आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...