Friday, 9 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल पुन्हा शपथ घेणार

·      हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या हातातून सत्ता निसटली, काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत

·      हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा, औरंगाबाद स्पर्धेत

·      माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबाच्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरु असल्याची राज्य सरकारनं दिली उच्च न्यायालयाला माहिती

·      म्हाडाच्या नोकरभरतीत बनावट उमेदवार बसवून परिक्षा देणाऱ्या ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीडसह ऊ जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश

·      घनसावंगीमध्ये उद्यापासून ४२वं मराठवाडा साहित्य संमेलन

णि

·      औरंगाबादमधल्या वंदे मातरम सभागृहाचा आज लोकार्पण सोहळा

****

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला असून येत्या सोमवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल हे पुन्हा शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. गुजरातमध्ये भाजपला सलग सातव्यांदा सत्ता मिळाली आहे. एकूण १८२ पैकी भाजपनं १५६ जागांवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत एकाच पक्षानं मिळवलेल्या या सर्वाधिक जागा आहेत. दुसरीकडे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाला केवळ १ जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला पाच जागा मिळाल्या तर चार अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले इसुदिन गढवी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र एकूण मतांपैकी १४ टक्के मतं पक्षाला मिळाल्यामुळे, आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या हातातून सत्ता निसटली असून या राज्यात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकूण ६८ जागांपैकी ४० जागांवर काँग्रेस पक्षाला विजय मिळाला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे २५ उमेदवार विजयी झाले आहेत. या राज्यात तीन अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.

पाच राज्यात झालेल्या एक लोकसभा आणि सहा ‍विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही काल मतमोजणी पार पडली. उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव विजयी झाल्या आहेत. राज्यातल्या विधानसभेच्या दोन जागांपैकी एक भाजपला तर दुसरी राष्ट्रीय लोकदलाला मिळाली आहे. बिहारमधल्या एका जागेवर भाजप, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस तर ओडिसात बिजू जनता दलाचा उमेदवार विजयी झाला आहे.

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. लोकांनी विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देतानाच, विकास चांगल्या गतीनं कायम राहावा, अशी इच्छाही व्यक्त केली आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले…

‘‘बीजेपी को मिला जनसमर्थन इसलिए भी महत्तवपूर्ण हे ,क्योंकी ये ऐसे समय मे आया है, जब भारत अमृतकाल मे प्रवेश कर चुका है. ये दिखाता है की आने वाले पच्चीस साल सिर्फ और सिर्फ विकास की राजनिती के ही हैं. भाजपा को मिला जनसमर्थन नए भारत के आकांक्षाओ का प्रतिबिंब है, भारत के युवाओकी युवा सोच का प्रकटीकरण है. भाजपा को मिला समर्थन गरीब, दलित, वंचित, पीछडे आदिवासीयोके सशक्तीकरण के लिए है.’’

****

हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेशचे नागरिक, पक्षाचे नेते, आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. गुजरातच्या जनादेशाचा आपण स्विकार करत असून, लोकशाही प्रक्रियेत जय -पराजय होत असतात, असंही खरगे म्हणाले. ते म्हणाले...

‘‘हिमाचल प्रदेश मे हम जीते है इसलिए में सभी वहां के लोगो को, मतदाताओको धन्यवाद देता हूं. जीते है तो ये खुशी की बात हैं, मुझे बडी खुशी हो रही हैं. लेकीन आगे अभी हमारा लंबा सफर है उसके लिए क्या करना हैं डिटेल्स से बात करेंगे.’’

****

गुजरातचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी दिल्ली महानगर पालिका आणि हिमाचल प्रदेशच्या निकालाच उदाहरण दिलं. राजकारणात पोकळी असते, गुजरातची पोकळी भाजपानं भरून काढली आणि दिल्लीची पोकळी आम आदमी पार्टीनं भरून काढली आहे. आज अनेकांना बदल हवे आहेत त्याची नोंद कार्यकर्त्यांनी घेऊन ती पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजेत, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

****

हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरवल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. या कंपनीला राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी पुणे, औरंगाबाद आणि  नागपूर, असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाबाबत केंद्राच्या दबावामुळे  महाराष्ट्राचे मंत्री गप्प बसणार असतील तर अर्थ काय? असा प्रश्न काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित केला. महापुरुषांचा अपमान, सीमावाद अशा विविध विषयांवर भूमिका मांडण्यासाठी काल महाविकास आघाडीनं मुंबईपत्रकार परिषद घेतली. या सगळ्यांच्या विरोधात येत्या १७ तारखेला महाराष्ट्रद्रोही हल्लाबोल या मोर्चाचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कर्नाटक बँकेच्या मुद्यावर आपल्या काळात कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा जुना डाव असल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्तीवेतन कर्नाटक बँकेमार्फत करण्याच्या आदेशावरून विरोधकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. सीमा वादावरून सुरू झालेल्या संघर्षात तेल ओतून अशांतता माजवण्याचा हा कट असून,  कर्नाटक बँकेसोबत यासंबंधीचा करार ठाकरे सरकारनेच केला होता, ही बाब जाणीवपूर्वक लपवली जात आहे,  असं पक्षानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. यासंदर्भात ८ डिसेंबर २०२१ रोजीच ठाकरे सरकारकडे कर्नाटक बँकेनं अर्ज केला होता आणि २१ डिसेंबर २०२१ रोजी कर्नाटक बँकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. महाविकास आघाडी सरकारनं बंधन बँक,  इक्विटास स्मॉल फायनान्स बँक,  करूर वैश्य तसंच साऊथ इंडियन बँकेसही परवानगी दिली होती, असं या पत्रकात म्हटलं आहे.

****

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात अशांतता निर्माण करण्यामागे एक षडयंत्र दिसत असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. काल ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही राज्य सरकारांना शांतता तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखायची आहे, तरीही त्यांच्याबद्दल भ्रामक प्रचार केला जात आहे, असंही फडनवीस  यावेळी म्हणाले.

****

राज्यात तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. येत्या काही दिवसांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात होणार असुन, ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ‍अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे भरण्यात येणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं.

****

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबानं बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या कथित आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारतर्फे काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी ठाकरे कुटुंबानं भष्ट्राचार करुन बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला असून यासंबंधीची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण -म्हाडाच्या नोकरभरतीत बनावट उमेदवार बसवून परिक्षा देणाऱ्या ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिक्षेच्या निकालानंतर म्हाडानं १ हजार ६६३ उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावलं असता त्यावेळी ६० उमेदवार संशयित आढळून आले. याप्रकरणी १५० पानांचा अहवाल तयार करण्यात आला असून म्हाडानं चौकशी समिती तयार केली आहे. ही नोकरभरती सरळ सेवा भरतीद्वारे केली जाणार होती, मात्र कोविडमुळं एका आयटी कंपनीच्या माध्यमातून राज्यात १०६ केंद्रावर लेखी परिक्षा घेतली गेली होती. गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, जालना, नाशिक, पुणे, कोल्हापूर  आणि नागपूर इथल्या उमेदवारांचा समावेश आहे.

****

४२वं मराठवाडा साहित्य संमेलन उद्यापासून जालना जिल्ह्यात घनसावंगीमध्ये होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्धाटन होणार असून साहित्यिक शेषराव मोहिते हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. संमेलनाच्या दोन दिवसात कथाकथन, विविध विषयांवरील परिसंवाद, मराठवाडा, राज्य आणि जिल्हा अशा तीन स्तरावरील कवींचं संमेलन, बाल मेळावा, प्रकट मुलाखत आदि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्वाताध्यक्ष माजी आमदार शिवाजी चौथे यांनी दिली आहे.

****

औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉक्टर भागवत कराड यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर इथं नवीन शैक्षणिक धोरणावर आयोजित चर्चासत्राचं उद्धाटन मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतिश देशपांडे यांनी दिली आहे. दोन एकर परिसरात वंदे मातरम सभागृहाची चार मजली इमारत असून यामध्ये दोन सभागृह, एक आर्ट गॅलरी ॲम्पिथिएटर, अतिथी कक्ष, प्रदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सोयी सुविधा असलेलं हे वंदे मातरम् सभागृह असणार आहे. 

****

सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी व्यसनापासून दूर राहणं आवश्यक असल्याचं मत लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केलं. लातू जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जीवनरेखा प्रतिष्ठान एकात्मीक व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. कोणत्याही प्रकारचं व्यसन हे शरीरासाठी हानिकारक असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लव्ह जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतरणाविरोधात हिंगोलीत काल भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. याबाबत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या चित्तेगाव परिसरात होणाऱ्या तबलिगी इज्तेमा शांततापूर्ण आणि सुविधायुक्त वातावरणात व्हावा यांसाठी जिल्हा प्रशासन नागरिकांना मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे. काल चित्तेगाव इज्तेमा स्थळाची पाहणी त्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व मुस्लीम बांधवाना इज्तेमासाठी आवश्यक असलेली मदत जिल्हा प्रशासनामार्फत केली जाईल, असं यावेळी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...