Saturday, 10 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      सरकारी योजना लागू करताना पर्यावरण सुरक्षेची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त

·      सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्यात सर्वांना सहकार्य करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

·      समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर 

·      राज्यात फेब्रुवारी २०२३ पासून पोलिस भरतीसाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करता येणार

·      ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं प्रारंभ

·      नाशिक-पुणे महामार्गावर तीन वाहनांच्या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

णि

·      मराठवाड्यात थंडीचा कडाका; परभणीत सहा पूर्णांक तीन तर औरंगाबाद इथं सात पूर्णांक नऊ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

****

सरकारी योजना लागू करताना पर्यावरण सुरक्षेची काळजी घेण्याची आवश्यकता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. त्या काल उत्तराखंडमध्ये मसुरी इथं लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या ९७ वाव्या फाऊंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होत्या. आपल्या उद्दीष्टांची पूर्तता करताना, समाजातल्या वंचित घटकांना समोर ठेवून निर्णय घेण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.

****

सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्यात सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी केलं आहे. आजच्या जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ते काल राज्यसभेत बोलत होते. सर्वांसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय हा यंदाच्या मानवाधिकार दिनाचा विषय आहे. भारतानं मानवाधिकाराला दिशा देण्यासाठी अनेक पावलं उचलली, कोविड प्रादुर्भावाच्या काळात सर्वांचं लसीकरण आणि खाद्यसुरक्षा हे याचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं, धनखड यांनी म्हटलं आहे.

****

समान नागरिक संहिता तयार करण्यासाठी राष्ट्रीय निरीक्षण आणि अन्वेषण समितीचं गठन तसंच देशभरात कार्यान्वयासाठी काल राज्यसभेत एक अशासकीय विधेयक सादर करण्यात आलं. भाजप खासदार डॉ करोडीलाल मीणा यांनी हे समान नागरिक संहिता विधेयक २०२२ सादर केलं. ६३ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने तर २३ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. डाव्या पक्षाच्या खासदारांनी हे विधेयक घटनाविरोधी असल्याचं सांगत, ते परत घेण्याची मागणी केली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल तसंच अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही हे विधेयक असंवैधानिक आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध असल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विधेयक सादर करणं हा प्रत्येक सदस्याचा अधिकार असल्याचं सांगत, सर्व सदस्यांना विधेयक सादर होऊ देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मतदान होऊन हे विधेयक सदनासमोर सादर झालं.

****

देशात सध्या २२ गतिशक्ती कार्गो टर्मीनल सुरू करण्यात आले असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत देशभरात अशी शंभर टर्मीनल सुरू करण्याचं उद्दीष्ट निर्धारित आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सध्या देशभरातून कार्गो टर्मीनलसाठी सव्वाशे अर्ज आले आहेत, त्यापैकी ७९ टर्मीनलसाठी मान्यता दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

संसद तसंच विधीमंडळात महिलांचं प्रतिनिधीत्व वाढण्यासंदर्भात घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीच्या गरजेवर केंद्र सरकारने भर दिला आहे. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

****

देशभरात आणखी तीनशे वन स्टॉप सेंटर उघडले जाणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. महिलांसंदर्भातल्या गुन्ह्यांची संख्या अधिक असलेल्या किंवा भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही केंद्र सुरू केली जातील. सध्या देशभरात अशी ७३० केंद्र कार्यरत आहेत.

 

सरकारने काल लोकसभेत चार घटनादुरुस्ती विधेयकं सादर केली. यामध्ये दोन विधेयकं तमिळनाडू आणि कर्नाटकात अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्तीची तर दोन विधेयकं हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींच्या यादीत काही समाजाचा समावेश करण्याशी संबंधित आहेत.

 

येत्या स्वातंत्रदिनापर्यंत देशभरात खेलो इंडियाअंतर्गत एक हजार केंद्र सुरू होतील, असं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितलं आहे. ते काल लोकसभेत याबाबतच्या चर्चेला उत्तर देत होते. यापैकी ७३३ केंद्रांना यापूर्वीच मंजुरी दिल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. खेळांसाठीच्या पायाभूत आराखड्यात सुधारणेवर लक्ष दिलं जात असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या कथित विधानाप्रकरणी राज्यपालांविरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला असल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भात प्रक्रियेनुसार कारवाई होईल अशी खात्री वाटत असल्याचं उदयनराजें भोसले यांनी म्हटलं आहे. 

****

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या एका शिष्टमंडळानं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळांनं त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसंच काँग्रेसच्या खासदारांचा समावेश होता.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने काल हायपरसॉनिक व्हेइकलची यशस्वी चाचणी घेतली. ध्वनीच्या पाचपट वेगाने भरारी घेणारं हे हायपरसॉनिक व्हेइकल म्हणजे विमान, अंतराळयान किंवा क्षेपणास्त्रही असू शकतं. या व्हेईकलने चाचणीत आवश्यक ते सर्व मापदंड साध्य केले असून, यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला अधिक बळ मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर इथं विविध विकासकामांचं लोकार्पण तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रो रेल्वेमधून तसंच समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

समृद्धी महामार्गाच्या पहिला टप्प्यात उद्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

****

राज्यात पोलिस भरतीसाठी तृतीयपंथीय देखील अर्ज करु शकतील अशी माहिती राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. यासंबंधीचा नियम फेब्रुवारी २०२३ पासून लागू होईल. तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी नियमावली बनवण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर गृह विभागानं सदर भूमिका स्पष्ट केली. केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही तृतीयपंथीयांना सेवेत सामावण्यासाठी याबाबतची तरतूद नसल्याची तक्रार याआधी करण्यात आली होती.

****

४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आज जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं प्रारंभ होत आहे. संत रामदास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातल्या महादंबा साहित्यनगरीत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी सकाळी आठ ते दहा वाजेदरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादर यांच्याहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. संमेलनाध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या दोन दिवसीय साहित्य संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत, बाल मेळावा आदी कार्यक्रम होणार आहे. उद्या सायंकाळी संमेलनाचा समारोप होणार आहे.

****

औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचं काल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. हे सभागृह विकास कार्याच्या चळवळीचे केंद्र व्हावं, असं अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. दोन एकर परिसरात उभारलेल्या या सभागृहाची चार मजली इमारत असून यामध्ये दोन सभागृहं, एक आर्ट गॅलरी ॲम्पिथिएटर, अतिथी कक्ष, प्रदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सोयी सुविधा करण्यात आल्या आहे. 

****

पैठण इथल्या संत एकनाथ महाराज संतपीठाच्या अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचं वितरण काल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. संतपीठाच्या पायाभूत सुविधांसह इतर उपक्रमांसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. विद्यापीठानंही सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी केल्या. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी संतपीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतीची दुरुस्ती तसंच इतर सुविधासाठी दोन कोटी रुपयापर्यंतचा निधी जिल्हा नियोजन समिती मधून देणार असल्याचं यावेळी सांगितलं.

****

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळ मोहदरी घाटात काल सायंकाळी झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक इथले आठ विद्यार्थ्यी संगमनेर इथून परतत असतांना मोहदरी घाटाजवळ त्यांच्या चारचाकी गाडीचे टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून गाडी प्रथम दुभाजकाला आणि नंतर इतर दोन चारचाकी गाड्यांवर आदळून हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थ्यीनींचा समावेश आहे. अपघातातीत जखमींना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या एमआयडीसी परिसरात काल सकाळी शाळेची बस आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

राज्यात १५ डिसेंबरपर्यंत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेतर्फे वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून ५०० किलोमीटर अंतरावर निर्माण झालेल्या ‘मॅनदौस’ चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याचं वेधशाळेतर्फे सांगण्यात आलं आहे. राज्यातही १५ डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, थंडीचा कडाका दोन दिवसांपासून वाढला असून काल परभणीत सर्वात कमी सहा पूर्णांक तीन अंश तर औरंगाबाद इथं सात पूर्णांक नऊ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

काल नाशिक जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस तर धुळे जिल्ह्यात सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. रब्बी पिकांवरही या वातावरण बदलाचा परिणाम होत आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे २९ आणि ८ जागांची तसंच ३८ अभ्यासमंडळाची निवडणूक प्रक्रिया आज होणार आहे. या निवडणुकीसाठी बीड, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हयात प्रत्येकी पाच तर जालना जिल्हयात दोन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. १३ तारखेला या मतदानाची मतमोजणी होणार आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघानं ११ चेंडू आणि ९ फलंदाज राखत जिंकला. भारताच्या संघाने २० षटकांत पाच बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघानं हे लक्ष्य ११ चेंडू बाकी असतांना साध्य केलं. दरम्यान, याच मैदानावर रविवारी दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. इतर सामने १४, १७ आणि २० डिसेंबर रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत.

****

बँकॉक इथं सुरू असलेल्या बॅटमिंटन खुल्या स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉयने डेन्मार्कचा गतविजेता व्हिक्टर अलेक्सन याचा १४-२१, २१-१७,२१-१८ असा पराभव केला. या स्पर्धेत प्रणॉय हा भारताकडून सहभागी झालेला एकमेव बॅटमिंटन पटू आहे.

****

फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात क्रोएशिया आणि दुसऱ्या सामन्यात अर्जेंटीनानं विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या सामन्यात क्रोएशियानं ब्राझीलवर पेनल्टी शुटआउट मध्ये ४-२ अशा फरकानं तर दुसऱ्या सामन्यात अर्जेंटीना संघानं नेदरलँडवर पेनल्टी शुटआउट मध्ये ४-३ अशा फरकानं विजय मिळवला. आज रात्री उपांत्यपूर्व फेरी साडेआठ वाजता मोरक्को आणि पोर्तुगाल यांच्यात आणि मध्यरात्री इंग्लैंड आणि फ्रांस यांच्यात सामना होईल.

****

आर्य संगीत प्रसारक मंडळाचा यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार पंडित उपेंद्र भट यांना जाहीर करण्यात आला आहे. ५१ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप असून पुण्यात १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात उपेंद्र भट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...