Sunday, 11 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  11 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ डिसेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण.

·      समृद्धी महामार्ग ही राज्याच्या विकासाची जीवन वाहिनी ठरणार - मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त.

·      येत्या १७ तारखेला निघणारा मोर्चा हा महाराष्ट्राची सातत्याने होत असलेल्या अवहेलनेविरोधात-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

आणि

·      जालना जिल्ह्यात खरपुडी इथं एका विद्यार्थ्याचा खदाणीत बुडून मृत्यू.

****

समृद्धी महामार्गामुळे कृषी-उद्योग-पर्यटन तसंच विविध धार्मिक पर्यटनाला लाभ होणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, या भागाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांनी शिंदे - फडवणीस सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. २०१७ मध्ये डबल इंजिनचं सरकार सुरु झाल्यानंतर या महामार्गाच्या विकासाचा पाया रचला गेला आणि आज काम ते पूर्णत्वास गेल्याचं मोदी यांनी सांगितलं. ते म्हणाले -

डबल इंजिन की सरकार महाराष्ट्र मे कितनी तेज गती से काम कर रही है। समृद्धी महामार्ग से नागपूर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही, ये महाराष्ट्र के चोबीस जिलों को आधुनिक कनेक्टिव्हीटी से जोड रहा है। इससे खेती-किसानी को आस्था के विभीन्न स्थलों मे आनेजानेवाले श्रद्धालुओं को, उद्योगों को बहोत बडा लाभ होनेवाला है। रोजगार के नये अवसर बनने वाले है।

देशाच्या विकासात पायाभूत विकासला चालना देण्यावर आपला भर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशभरात वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा आणण्यावर आपला भर असून, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय सुरु करणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. 

तत्पूर्वी समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्याच्या झिरो मैल पॉईंट पासून १० किलोमीटर अंतराचा प्रवास पंतप्रधानांनी केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज गोव्यात नवव्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप सत्रालाही संबोधित केलं. त्यापूर्वी नागपुरात पंतप्रधानांनी फ्रीडम पार्क ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी एम्स नागपूरच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. नागपूर इथल्या मेट्रो २ मार्गिकांचं भूमिपूजन ही त्यांच्या हस्ते झालं. स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत या रेल्वेगाडीला ही पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्त्वाची शहर जोडली जाणार आहेत.

****

समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाची जीवन वाहिनी ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हा महामार्ग राज्याची भाग्यरेखा बनेल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या महामार्गावर १३ लाख झाडं लावण्यात आली असून आणखीन ३५ लाख झाडं लावण्याचं नियोजन आहे. हा रस्ता पूर्णपणे पर्यावरण पूरक असून वन्य प्राण्यांसाठी रस्ते पार करण्याची सुरक्षित सोय सुद्धा यामध्ये आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना राज्यात आणखी सहा राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं सांगितलं. ७५ हजार कोटी रुपयांच्या या हरित महामार्गांचं काम सुरु झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. यात औरंगाबाद ते पुण्यापर्यंत महामार्ग तयार करण्याच्या कामाचा लवकरच प्रारंभ होईल, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी कोणत्याही याचिके शिवाय अवघ्या ९ महिन्यात ७०० किलोमीटर भूमीचं अधिग्रहण आपल्या सरकारच्या काळात करण्यात आलं. मात्र मागील महाविकास आघाडीच्या सरकारनं या अधिग्रहण प्रक्रियेत अडथळे आणल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील १४ जिल्हे थेट जवाहरलाल नेहरू बंदरासोबत जोडले गेले आहेत. या महामार्गामुळे गडचिरोली आणि गोंदिया सारखे जिल्हे देखील मुंबईशी जोडले जातील असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नागपूरच्या मिहान परिसरात उभारण्यात आलेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्स पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केली. एम्स नागपूर ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असून तिची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी जुलै २०१७ मध्ये केली होती, ही केंद्रीय क्षेत्रातील योजना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. 

एम्स नागपूर हे वैद्यक शास्त्रातील सर्व प्रमुख विशेष आणि सुपर स्पेशालिटी विषयांचा समावेश असलेलं, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ३८ विभाग असलेलं रुग्णालय आहे. हे रुग्णालय एक हजार ५७५ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते चंद्रपूर इथल्या सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी -सिपेट आणि सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट, कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीस या दोन संस्थांचंही आज दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचं औरंगाबाद इथल्या माळीवाडा इंटरचेंज तसंच शिर्डी इथं थेट प्रसारण दाखवण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार आणि पणन मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रशांत बंब यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, समृद्धी महामार्गाचे मुख्य अभियंता बापुराव साळुंके यावेळी उपस्थित होते.

शिर्डी इथं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. जनतेच्या मनाला जोडणारा हा विकासाचा महामार्ग असल्याचं मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं.

****

येत्या १७ तारखेला निघणारा मोर्चा हा महाराष्ट्राची सातत्याने होत असलेल्या अवहेलनेविरोधात काढत असल्याचं, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत काही कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. छत्रपतींबाबत आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल पंतप्रधानांसोबत बसतात, बेळगाव निपाणीचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री अक्कलकोट, सोलापूरबाबत विधान करतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, असं ठाकरे म्हणाले.

****

बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीनं सोलापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटकात काल कन्नड रक्षण वेदिका संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं, त्याला प्रत्युत्तर म्हणून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्राचा द्वेष आणि आंदोलन थांबवा अन्यथा, कर्नाटकात येऊन असंच आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

****

जालना जिल्ह्यात खरपुडी इथं एका विद्यार्थ्याचा खदाणीत बुडून मृत्यू झाला. अर्णव कैलाश गिरी असं या पंधरा वर्षीय मुलाचं नाव आहे. आज सुटी असल्यानं अर्णवसह पाच मित्रमैत्रिणी खरपुडी इथं फिरायला गेले होते, इथल्या एका खदाणीजवळ सेल्फी काढत असताना अर्णवचा मोबाईल पाण्यात पडला, मोबाईल घेण्यासाठी तो पाण्यात उतरला, मात्र पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

****

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष - बाळासाहेबांची शिवसेना गटानं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या दूध संघाच्या या निवडणुकीत एकूण २० पैकी १६ जागांवर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. दूध संघाच्या विद्यमान अध्यक्ष मंदा खडसे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला आहे.

****

महाराष्ट्र ज्युदो संघटना आणि कोल्हापूर जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने कोल्हापूर इथं झालेल्या कनिष्ट वयोगटातील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत उस्मानाबादचे ज्युदोपटू प्रसाद निंबाळकर आणि ओंकार चौरे यांनी कांस्यपदक पटकावलं आहे. ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान या स्पर्धा खेळवण्यात आल्या.

****

रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळतं, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं, असं आवाहन लातूरचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी केलं आहे. रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबवलं जात असून इच्छुक शेतकऱ्यांनी १५ डिसेंबर पर्यंत हरंगुळ इथल्या औद्योगिक वसाहतीमधे असलेल्या जिल्हा रेशीम विकास कार्यालयात नाव नोंदणी करावी, असंही वराट यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 May-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...