Tuesday, 13 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

अरुणाचल प्रदेशात तवांग भागात नऊ डिसेंबरला चीननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं चोख प्रत्यूत्तर दिल्यानं चीनला माघार घ्यावी लागली, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. तवांग भागात भारत आणि चिनी सैन्यात चकमक झाल्याचा मुद्दा आज संसदेत विरोधी पक्षांनी उपस्थित केला. त्यावर संरक्षण मंत्री निवेदन देत होते. या चकमकीत एकही भारतीय सैनिक हुतात्मा किंवा जखमी झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.

****

संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यातल्या आज २१ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीटर द्वारे या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांनी संसद भवन इथं हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

जी -ट्वेंटी राष्ट्रांनी विकासासाठी डेटा सामायिक करण्यासाठी तत्त्वे मांडण्याचं आवाहन, भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांनी केलं आहे. जी-20 समूह देशांच्या विकास कृतीगटाची बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. या बैठकीत डेटा फॉर डेव्हलपमेंट: रोल ऑफ जी20, या विषयावर कांत बोलत होते. नॅशनल डेटा अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म, देशातल्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा कायापालट करण्यासाठी डेटाचा वापर यासारख्या भारताच्या पद्धती त्यांनी यावेळी सांगितल्या. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या मेळाव्याला संबोधित करताना, डेटा वापरात भारताची भुमिका स्पष्ट केली.

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधान भवनात पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह इतर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपुचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावं, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. ही मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर इथल्या पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचं विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं. मराठवाड्यासह राज्यातल्या नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचं कामकाज सकाळी साडेनऊ वाजेपासून सुरु व्हावं, आदी मागण्याही पवार यांनी केल्या.

****

राज्यातल्या कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कृषी कंपनी स्थापन करण्यासाठी माजी ऊर्जा सचिव जयंत कावळे यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद इथं आज वीज कर्मचारी आणि संघटनानी निदर्शनं केली. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीच्या खाजगीकरणाचा एकतर्फी निर्णय सरकार आणि प्रशासनाने घेतला तर त्याविरोधात संघर्ष समिती मध्ये सहभागी ३० संघटनानी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

****

अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या तीन पिक वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये तुर पिकाचा पीडीकेव्ही आश्लेषा वाण, ज्वारी पिकाचा रब्बी हुरडा वाण ट्रॉम्बे अकोला सुरुची आणि तांदुळाचा पीडीकेव्ही साधना या वाणांचा समावेश आहे. या वाणांमुळे आधुनिक शेती व्यवसायाला हातभार लागणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्या वारंगा फाटा- हदगांव मार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या मुलांना कारने धडक दिल्यानं एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. कळमनुरी तालुक्यातल्या कुर्तडी इथले हे किशोरवयीन मुलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धडक दिलेली कार घटनास्थळावरुन पसार झाली असून, पोलिसांचा तपास सुरु आहे.

****

स्पेनमध्ये सुरु असलेल्या एफ आय एच हॉकी नेशन्स करंडक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी आगेकूच कायम आहे. काल झालेल्या दुसर्या सामन्यात भारतानं जपानवर दोन - एक असा विजय मिळवला. साखळी सामान्यातला भारताचा अंतिम सामना उद्या दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.

****

‘ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशेनियन चॅम्पियनशिप २०२२’ या नौकानयन स्पर्धेला आजपासून मुंबई इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धेत आशिया आणि ओशनिया प्रदेशातल्या १३ देशांमधले १०५ स्पर्धक सहभागी झाले आहेत.

//**********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...