Saturday, 17 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  17 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ डिसेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      वस्तू आणि सेवा कर पालनात होणाऱ्या अनियमितांना अपराधिक श्रेणीतून वगळण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय.

·      महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा तर भाजपचं राज्यभरात माफी मागा आंदोलन.

·      हिंगोली इथं अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावणाऱ्या पथकावर नागरिकांची दगडफेक.

आणि

·      पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशच्या चौथ्या दिवसअखेर सहा बाद २७२ धावा.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी पालनात होणाऱ्या अनियमितांना अपराधिक श्रेणीतून वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. जीएसटी परिषदेची ४८ वी बैठक आज दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर सीतारामन यांनी ही माहिती दिली. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलवरचा जीएसटी आता १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जैव इंधनाच्या वापराला चालना मिळेल तसंच कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी होईल, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. डाळींच्या फोलपटांवरच्या भुसा करमुक्त करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. या फोलपटांवर आतापर्यंत पाच टक्के जीएसटी आकारला जात होता.

****

आधुनिक युगात सांख्यिकीची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. दिल्लीत राष्ट्रपती भवनात भारतीय सांख्यिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी आज राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. योग्य सांख्यिकीय विश्लेषणाशिवाय धोरणांची आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी करणं शक्य होत नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. देशाची विकासाच्या दिशेनं अधिक वेगानं वाटचाल होण्यासाठी सांख्यिकी अधिकाऱ्यांच्या मोठ्या योगदानाची आवश्यकता असून अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं.

****

सरकार प्रत्येक स्तरावरच्या प्रक्रिया पारदर्शक आणि मजबूत बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या सुशासन सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी दिलेल्या शुभेच्छापर संदेशात पंतप्रधानांनी, येत्या २५ वर्षाच्या अमृतकाळात गौरवशाली आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याचा संकल्प जनतेनं केला असल्याचं म्हटलं आहे. या महिन्याच्या १९ ते २५ तारखेपर्यंत दुसरा सुशासन सप्ताह साजरा होणार आहे. शासनाचा प्रभाव वाढावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विविध धोरणात्मक हस्तक्षेपांद्वारे सरकार नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण आणि संस्थांच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं जोरदार वाटचाल करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

महागाई, बेरोजगारी, पळवलेले उद्योगधंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या अन्य नेत्यांकडून महापुरुषांचा होत असलेला अवमान आदी मुद्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शेकाप नेते जयंत पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तयार केलेल्या महापुरुषांच्या चित्ररथांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

****

महाविकास आघाडीला मुंबईत मैदानभर माणसंही गोळा करता आली नाहीत, हिंदू दैवतांचा अपमान, संतांची कुचेष्टा करणाऱ्या महाविकास आघाडीला मोर्चे काढण्याचा अधिकारही नाही, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या मोर्चावर टीका केली. शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून संतमहंत तसंच हिंदू दैवतांविरोधात होणाऱ्या विधानांच्या विरोधात भाजपच्या वतीनं आज राज्यभरात माफी मागा आंदोलन करण्यात आलं. राज्यात सुमारे सहाशेहून अधिक ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली.

महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा हा राज्यपालांच्या विरोधात नसून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करत असल्यानं, भीतीपोटी काढलेला मोर्चा असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या पुढाकाराने येत्या २६ डिसेंबरला विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर शेतकरी शेतमजुरांचा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा येत्या मंगळवारी २० तारखेला यवतमाळ जिल्ह्यात वणी इथून नागपूरकडे प्रयाण करेल. वरोरा, नांदुरी, बरबटी, बुटीबोरी मार्गे २५ तारखेला हा मोर्चा नागपुरात दीक्षाभूमीवर मुक्कामी पोहोचणार असून, २६ डिसेंबरला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या २८ जिल्ह्यातले शेतकरी शेतमजूर या मोर्चात सहभागी होणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयक पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी न्युयॉर्क इथं अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. जालना तसंच औरंगाबाद इथं भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचं दहन करून निषेध व्यक्त केला.

****

हिंगोली इथं आज अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यासाठी गेलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी दगडफेक केली. यात एक कर्मचारी जखमी झाला असून ऑटो आणि पोलिस गाडीचे नुकसान झालं आहे. दरम्यान, काल जलेश्वर तलाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती, मात्र उद्या असलेल्या ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम थांबवून उर्वरित मोहिम येत्या सोमवारी राबवण्यात येणार होती. त्यासाठीच्या सूचना देण्यासाठी हे पथक गेलं असतांना हल्ला झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर बांगलादेशनं सहा बाद २७२ धावा केल्या. या सामन्यात विजयासाठी भारतानं उद्या बांगलादेशचे चार गडी बाद करणं आवश्यक आहे, तर बांगलादेशला विजयासाठी २४१ धावांची आवश्यकता आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या २६६ पैकी बिनविरोध झालेल्या १३ ग्रामपंचायती वगळता २५३ ग्रामपंचातींसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण ८२९ केंद्रांवर मतदान होणार असून यासाठीची आवश्यक तयारी निवडणूक विभागानं पुर्ण केली आहे. दरम्यान, परवा मतमोजणीनंतर निवडणूक निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शर्मिष्ठा भोसले यांनी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून २० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या कालावधीत सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतली वाहनं, अत्यावश्यक सेवेतले अधिकारी तसंच कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, अंत्ययात्रा याकरता हे आदेश लागू राहणार नाहीत, असं अपर जिल्हादंडाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

नाविन्यपूर्ण उद्योगांना केंद्र तसंच राज्य सरकार भरीव आर्थिक सहकार्य करत असून याचा लाभ घेण्याचं आवाहन बजाज इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.सचिन देशमुख यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अटल इन्क्युबूशन सेंटर - बामू फाऊंडेशन यांच्या वतीने ‘स्ट्रेन्थनिंग ऑफ स्टार्टअप इकोसिस्टीम अ‍ॅण्ड बिझनेस मॉडेलिंग’ या विषयावर झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. आतापर्यंत ४३ स्टार्टअपना केंद्राच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना मूर्त स्वरूप देवून उद्योजकता वाढीस चालना देण्यासाठी अटल इन्कुबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

****

महात्मा गांधी अभिमत विद्यापीठाच्या महागामी गुरूकुलाच्या यंदाच्या ऑरा औरंगाबाद या महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. या महोत्सवांतर्गत गेल्या महिन्यात १९ नोव्हेंबरला औरंगाबाद लेणीत पहिला कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर देवगिरी किल्ला, सोनेरी महल, बिबी का मकबरा आदी ठिकाणी झालेल्या सांगितिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोप सोहळ्यात उद्या रविवारी सायंकाळी भोकरदन तालुक्यात अन्वा इथल्या मंदिरात महागामीच्या शिष्यांचं ओडिसी नृत्य आणि निरंजन भालेराव यांचं बासरी सादरीकरण होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...