Monday, 19 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 19.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 December 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ;सीमा प्रश्नावरून पहिला दिवस वादळी

·      ५२ हजार ३२७ कोटी ८२ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर

·      राज्यात रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक पेरणी

आणि

·      हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी विविध उपाययोजना

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु झालं. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला, सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावचे जिल्हादंडाधिकारी नितेश पाटील यांनी प्रवेशबंदी केल्याकडे अजित पवार यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले....

एक आपल्या लोकसभेचे मेंबर त्यांना तिथं येण्याच्या करता तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे. स्वत: अमित शहा साहेबांच्या समोर ठरलेलं असताना आणि इथून पुढे आम्ही कुणालाही अडवणार नाही. अस सांगितलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी अध्यक्ष महोदय कशी आणु शकतो आणि जे कोर्टात व्हायचं ते निकाल तिथे लागेल ना परंतू अशा प्रकारची दडपशाही ही अध्यक्ष महोदय आपण खपवून घेता कामा नये. कर्नाटकच्या कुरापती या सातत्याने सुरु आहेत. त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भुमीका त्याठिकाणी घेतली पाहिजे.

विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या दुपट्टी भूमिकेचा मुद्दा मांडला आणि यासाठी सर्वांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरज यावेळी व्यक्त केली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि संपूर्ण सभागृह सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. आंदोलन प्रसंगी अटक केलेल्या खासदार, आमदारांना कर्नाटक सरकारने तत्काळ सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली.

दरम्यान, सीमावादाच्या मुद्यावर राजकारण करु नये, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. सीमा भागातल्या ४८ गावांत दोन हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ते म्हणाले...

सीमावासीयांचे मागे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या लढ्याला आपण पाठींबा दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होईल, अशा प्रकारचं कुठलही कृत्य आपल्याकडून होता कामा नये, याची आपण काळजी घेतली पाहिजे. शासन म्हणुन सर्व पक्षीय सर्व एकत्रपणे आपण बाळासाहेबांची भुमीका या सीमावासीयांच्या मागे उभी राहण्याची होती. अडीच वर्षामध्ये मागच्या यांच्या योजना बंद केल्या तुम्ही, योजना बंद केल्या तुम्ही काय सांगता सीमावासीयांच्या मागे आहे. सुप्रीम कोर्टाच्या विषयावर कुठलाही परिणाम होऊ नये, याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठलही राजकारण न आणता सर्वांनी एकदिलाने सीमावासीयांच्या मागे उभं राहिलं पाहिजे एवढच मी सांगतो.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव इथं आज होणारा महामेळावा रद्द करण्यात आला. या मेळाव्यासाठी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते बेळगाव इथं जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यानंतर नेत्यांनी याठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. मेळाव्याची परवानगी नाकारणे, मंडप काढून फेकणे, या कृतीचा निषेध करत हा भाग केंद्रशासित केला पाहिजे, अशी मागणी मुश्रिफ यांनी यावेळी केली.

****

नक्षलवादाला घाबरून गडचिरोली औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आकस्मिकता निधी -सुधारणा अध्यादेश २०२२ विधीमंडळासमोर ठेवला. सुमारे ५२ हजार ३२७ कोटी ८२ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्याही आज सादर करण्यात आल्या. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधिमंडळाबाहेरील परिसरात विरोधकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

****

भारत चीन मुद्यावरून राज्यसभेत आजही विरोधकांनी गदारोळ केला. काँग्रेससह इतर विरोधी पक्षनेत्यांनी विविध मुद्द्यांवर मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. मात्र चीनची घुसखोरी हा अत्यंत गंभीर मुद्दा असून त्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी, असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केलं. या मुद्द्यावरून काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी आणि इतरांनी सभात्याग केला.

****

देशातल्या सेवेत नसलेल्या १०० विमानतळ, हेलीपोर्ट आणि वॉटर एअरोड्रॉम्सचे उडान योजनेअंतर्गत पुनरुज्जीवन आणि विकास करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. दरम्यान, देशात २१ ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यासाठी सरकारने तत्वतः मंजुरी दिली असून आत्तापर्यंत नऊ ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित झाले असल्याचं नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी सांगितलं.

****

अनावश्यक आणि कालबाह्य कायदे रद्द करण्यासाठीचं निरसन आणि सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर झालं. विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी हे विधेयक सादर केलं.

****

दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईची मागणी नसल्याचं, केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं आहे, ते आज लोकसभेत बोलत होते. या महिन्याच्या दोन तारखेपर्यंत देशात ३१ लाख ९२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या नोटा चलनात असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

****

यंदा राज्यात रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील यांनी दिली. या हंगामात मक्याची लागवड २४ टक्क्यांनी, गव्हाची १९ टक्क्यांनी, तर हरभऱ्याची  लागवड १७ टक्क्यांनी वाढली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. अतिवृष्टी आणि उशिरापर्यंत सुरु झालेल्या पावसामुळे ज्वारीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी.जी.साळुंके यांनी ही माहिती दिली. अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इंटरचेंजवर २१ ठिकाणी सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने तर १५ रुग्ण वाहिका तैनात आहेत. या रुग्णवाहिकेकरिता १०८ क्रमांकावर संपर्क साधता येतो. नागपूरहून शिर्डीच्या दिशेने सात ठिकाणी तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने जातांना सहा ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंपची सोय करण्यात आली आहे. याच ठिकाणी प्रसाधनगृह, खानपान सेवा, तसंच वाहनांच्या किरकोळ दुरुस्तीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस तैनात असून, राज्य सुरक्षा महामंडळाचे १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत. वाहनांचा बिघाड, अपघात झाल्यास २४ तास हेल्पलाईन क्रमांक सुरू असून, तो महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.

२१ ठिकाणी नियंत्रण कक्ष असून, या माध्यमातून २४ तास सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जाते. समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी प्रवासी सोयी सुविधा केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच ती उपलब्ध करुन दिली जाईल, अशी माहिती मुख्य अभियंता बी.जी.साळुंके यांनी दिली.

****

राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाची उद्या मोजणी केली जाणार आहे. यंदा या निवडणुकीत सरासरी ८० क्क्याहून अधिक मतदान झालं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...