Wednesday, 21 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्यात सात हजार ६१९ ग्रामपंचायतींत थेट सरपंचाची निवड, ६९९ बिनविरोध सरपंच

·      भाजप- शिंदे गटाचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा दावा तर महाविकास आघाडीचाही प्रतिदावा

·      मराठवाड्यातही भाजप-शिंदे गट तसंच महाविकास आघाडीमध्ये चुरस

·      नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड विक्री प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची विरोधकाकडून मागणी, विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

·      आंतरधर्मीय विवाहाला कोणाचाही विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

·      बहुराज्य सहकारी संस्था सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय 

·      काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘भारत जोडो यात्रेतील वक्तव्यावरुन राज्यसभेत गदारोळ

आणि

·      नायलॉन मांजाबाबत सक्त कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

 

सविस्तर बातम्या

राज्यात विविध जिल्ह्यांत एकूण सात हजार ६१९ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी पार पडली. एकूण सदस्य संख्या ६५ हजार ९१६ असून, त्यापैकी १४ हजार २८ बिनविरोध विजयी सदस्य आहेत. निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा सात हजार ६१९ आहेत. तर, बिनविरोध विजयी सरपंच ६९९ आहेत. ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.

या निवडणुकीत एकूण तीन हजार २९ ग्रामपंचायतींमधे भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला विजय मिळाला असल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. तर हे निकाल म्हणजे जनतेनं आमच्या सरकारला दिलेला कौल आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तेराशे ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. आघाडीला ग्रामीण मतदारांनी मोठी साथ दिल्याचं ते म्हणाले.

या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसनं ९०० पेक्षा जास्त ग्राम पंचायतींमधे विजय मिळवला असून, महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपाचे विजयाचे दावे चुकीचे आहेत, भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातल्या लोकांनी भाजपा आणि शिंदे गटाला सपशेल नाकारलं आहे, अशी प्रतिक्रीया पटोले यांनी दिली आहे.

****

मराठवाड्यातही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गट तसंच महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळाली.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या २१६ ग्रामपंचायतींपैकी भाजप - शिंदे गटानं १५८ सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. 

सिल्लोड तालुक्यातल्या १८ पैकी १४ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून, भाजपनं चार जागा जिंकल्या आहेत.

जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गराडा, औरंगाबाद तालुक्यात नायगाव तसंच पिंपळगाव पांढरी या तीन ठिकाणी उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने, ईश्वर चिठ्ठीने निकाल काढण्यात आला.

 

बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने ४९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. बीड आणि शिरूर कासार तालुक्यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पन्नास पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. भाजप सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मात्र परळीसह बीड जिल्ह्यात जनतेने भाजपला कौल दिल्याचं म्हटलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील हे यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, विजयाची ही घोडदौड आगामी काळातही अशीच चालू राहील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी ट्विटर संदेशातून व्यक्त केला आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १६५ ग्रामपंचायतींपैकी तुळजापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे तर उस्मानाबाद तालुक्यात संमिश्र पक्षीय उमेदवार निवडून आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील तेर आणि येडशी आंबेजवळगा इथं भाजपचे उमेदवार विजयी झाले. ढोकी इथं काँग्रेस आणि उपळा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तर कावळेवाडी इथं आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

 

जालना जिल्ह्यातल्या २५४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याचे दावे-प्रतिवादे केले आहे. यामध्ये भाजपान १४४, बाळासाहेबांची शिवसेना गटानं ८५, उद्धव ठाकरे गटानं ७३, राष्ट्रवादी काँग्रेसनं ६९ तर काँग्रेसनं १६ जागांवर आपल्या पक्षाचे सरपंच विजयी झाल्याचा दावा केला आहे.

परतूर तालुक्यातल्या वरफळ आणि देवळा इथं विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतसंख्येत केवळ एका मताचा फरक असल्यामुळे या ठिकाणची परत मोतमोजणी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

मागील निवडणुकांमध्ये भाजपच राज्यात एक नंबरचा पक्ष होता, आताही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाने बाजी मारल्याचा दावा भाजपा नेते केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

 

परभणी जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली असून, सर्वच पक्षांनी विजयाचे दावे केले आहे.

दरम्यान, परभणी इथं नवा मोंढा परिसरात मतमोजणीनंतर दगडफेक झाली. वाडी दमाई ग्रामपंचायतीच्या मतमोजणीवरून हा प्रकार घडल्याचं सहायक पोलिस निरीक्षक बी बी पुंड यांनी सांगितलं. या दगडफेकीत चार जण जखमी झाले असून, नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

नांदेड जिल्ह्यातल्या १६२, लातूर जिल्ह्यातल्या ३३५, तर हिंगोली जिल्ह्यातल्या ६२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. स्थानिक नेत्यांनी आपल्या पक्षाचेच सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे.

****

नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड विक्री प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. न्याय प्रशासनातल्या कामात हस्तक्षेप करत, ८३ कोटी रुपयांचे भूखंड अवघ्या दोन कोटी रुपयांना बिल्डरला वाटल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवल्याचा आरोप, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

मात्र मुख्यमंत्र्यांनी असा कोणताही हस्तक्षेप केला नसून, न्यायालयानंही असा ठपका ठेवलेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायालयाने या प्रकरणात सरकारला बाजू मांडण्यास सांगितलं असून, सरकारने उत्तर सादर केलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...

 

हे जे १६ भूखंड आहेत, याचं नियमितीकरण हे १६ तारखेला रद्द करून तशा प्रकारचा रिपोर्ट देखील सबमिट झालेला आहे. कोर्टानी ताशेरे ओढलेले नाहीयेत. ऑन रेकॉर्ड गिलानी कमिटीचा रिपोर्ट असतांना, जर तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी हा निर्णय केला असता, तर ती चूक असती. ही केस सुरू आहे. या ऑनगोईंग केसवर या ठिकाणी चर्चा होऊ शकते का? होऊ शकत नाही. तरीही सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी चुकीच्या फॅक्टस्‌ मांडल्यामुळे या ठिकाणी सगळ्या फॅक्टस्‌ मांडलेल्या आहेत. आणि कोर्टानी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातली कारवाई ही सरकारने पूर्ण केलेली आहे.

 

मात्र या उत्तरानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित करत, माहितीच्या मुद्द्याद्वारे उत्तर देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी या विषयी उत्तर देण्यावर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेल्या उत्तरात आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावत, आपण अधिकाराचा गैरवापर किंवा न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप केलेला नाही, असं सांगितलं. ते म्हणाले...

 

सदर भूखंड ई डब्ल्यू एस साठी राखीव ठेवावा अशी गिलानी समितीची शिफारस आहे. ही शिफारस न्यायालयाच्या विचाराधीन आहे. न्यायालयाने अद्याप कुठलाही निर्णय दिलेला नाही. परंतू जेव्हा आमच्या लक्षात बाजू आली, की गिलानी समिती आहे याच्यात, तिच्याही काहीतरी फाइंडींग आहेत, त्याचं काहीतरी ऑब्जर्वेशन आहे, त्यांचे काहीतरी ओपिनियन आहेत, आणि म्हणून आम्ही एन आय टी च्या सभापतींच्या शिफारसीप्रमाणे काम केलं. आणि एकनाथ शिंदे असं खोटं काम करणार नाही, बिलकुल करणार नाही.

 

मुख्मंत्र्यांच्या या उत्तरावर समाधान न झाल्यानं, विरोधी पक्षांचे नाना पटोले यांच्यासह अनेकांनी हा मुद्दा लावून धरला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, विधीमंडळात त्यावर चर्चा होऊ शकत नाही, मात्र भुजबळांसारख्या ज्येष्ठ सदस्याने मुद्दा मांडल्यामुळे हे स्पष्टीकरण दिल्याचं सांगितलं. त्यानंतरही विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावत कामकाज पुढे चालू ठेवलं, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

दरम्यान, या प्रकरणी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर रहाण्याचा अधिकार नसून, महाविकास आघाडी सरकारला जाब विचारेल, असं माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हे भुखंड वाटप कायद्यानुसार झालं असेल, तर मग त्याला स्थगिती का दिली, याबाबत सरकारनं उत्तर द्यावं, असं ठाकरे म्हणाले.

****

विधानसभेचं कामकाज काल सकाळी दोन वेळा स्थगित करावं लागलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारनं विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातली कामं रोखल्याचा आरोप केला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होत.

****

राज्यातली विविध विकास कामं गतीनं होण्यासाठी सीएम वॉर रुम स्थापन करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. या माध्यमातून विकास कामांवर लक्ष ठेवलं जाणार असून विकास कामांना यापुढे विलंब होणार नसल्याचं ते म्हणाले.

****

आंतरधर्मीय विवाहाला कोणाचाही विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी काल उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी झालेल्या चर्चेस उत्तर देतांना ते बोलत होते. काही जिल्ह्यात जाणीवपूर्वक असे विवाह होत असल्याच्या घटना समोर येत असून, यासंदर्भात कायदे अधिक प्रभावी करण्याचा विचार करण्यात येईल. षडयंत्राचा भाग म्हणून कोणाचीही फसवणूक होऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, श्रद्धा वालकर प्रकरणी आरोपीला लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी सांगितलं .

****

बहुराज्य सहकारी संस्था सुधारणा विधेयक २०२२, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं आहे. या संयुक्त समितीमध्ये २१ लोकसभा आणि १० राज्यसभा सदस्य असतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत, हे विधेयक समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. पुढच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही समिती आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती त्यांनी दिली. यापूर्वी अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक संसदीय समितीकडे अधिक छाननीसाठी पाठवण्याची मागणी केली होती.

****

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच मध्यप्रदेशात ‘भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमातून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन काल राज्यसभेत गदारोळ झाला. खरगेंनी सभागृहाचा, देशाचा, मतदारांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी केली. ‘स्वातंत्र्य लढ्याच्या काळात माफी मागणारे आम्हाला माफी मागायला सांगत आहेत, असं प्रत्यूत्तर खरगे यांनी दिल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला.

****

नायलॉन मांजाबाबत सक्त कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या १२ जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत खंडपीठानं, संबंधित जिल्ह्यांचे पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांनी नायलॉन मांजा बंदीसाठी विशेष पथकं स्थापन करण्यास सांगितलं आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर महापालिकेने नायलॉन मांजावर बंदीबाबत जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये सुरु केलेल्या प्रबोधनात्मक उपक्रमांबाबत खंडपीठानं समाधान व्यक्त केलं.

****

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या 'स्टार्टअप इंडिया सीड फंड' या योजनेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या 'अटल इनक्युबेशन सेंटर 'चा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं याची घोषणा केली असल्याची माहिती, या केंद्राचे संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी दिली. या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना २० लाख रुपयांपर्यंत अनुदान किंवा ५० लाख रुपयापर्यंत गहाण विरहित कर्ज दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात माळेगाव इथं २६ डिसेंबर पर्यंत बहुमाध्यम प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्धाटन होणार आहे. हे प्रदर्शन भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तसंच केंद्र सरकारच्या आठ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण सेवा या विषयांवर अधारीत असेल. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या महत्वाच्या घडामोडी आणि स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात येणार असून हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असेल.

****

केंद्र सरकारच्या २०२५ पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याच्या धोरणात, राज्यातल्या २० जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यात दहा ठिकाणी आजपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयात काल मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबीरात ६० रुग्णांची तपासणी तसंच मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंधात्मक कार्यक्रम, व्यसन समस्या तसंच योग विषयक माहिती देण्यात आली. यावेळी नागरिकांना आरोग्य विषयक अडचणींवर मार्गदर्शन देखील करण्यात आलं.

****

उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचं क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. या कक्षात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, नायब तहसिलदार अर्चना मैंदर्गी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

****

अमृतसर-नांदेड -अमृतसर या विशेष रेल्वे गाडीच्या २२ ते २४ डिसेंबर दरम्यान चार फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...