Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ डिसेंबर
२०२२ दुपारी १.०० वा.
****
कोविड परिस्थितीचा
आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक बैठक घेणार आहेत. चीन, जपान, दक्षिण
कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर
ही बैठक होणार आहे.
****
दरम्यान,
कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संशयितांचा शोध, चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीवर
काम करण्याची गरज असल्याचं, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज
नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या औषधांची रुग्णालयात कमी असून तातडीने आरोग्य
यंत्रणा सक्षम करा, अशी मागणी त्यांनी केली. आजपर्यंत देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात
बघायला मिळाली, त्यामुळे राज्य सरकारने आत्ताच सावध व्हावं, नवीन कोरोना प्रकाराबाबत
सतर्क राहून परदेशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करावी, अशी मागणीही टोपे यांनी केली.
****
२० आणि त्यापेक्षा
कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद होणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर
यांनी आज विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी
तालुक्यातल्या दरेवाडी इथं ४३ पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली असल्याचा मुद्दा
लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना केसरकर बोलत होते. शिक्षण हक्क
अधिकारातंर्गत सर्वेक्षण करण्यात आलं होतं, त्यामुळे शाळा बंद होणार, असे गैरसमज पसरले
होते. तूर्तास या शाळा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही, असं त्यांनी स्पष्ट
केलं. ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर भरती करण्यात येईल,
असं ते म्हणाले.
काँग्रेस
आमदार बाळासाहेब थोरात यांनी, सरकारने केलेल्या सर्वेक्षणामुळे राज्यात मोठा गोंधळ
झाला असून, एक विद्यार्थी असला तरी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल,
असं सांगितलं. दर्जेदार शिक्षण देणं ही सरकारची प्राथमिकता असल्याचं केसरकर यांनी नमूद
केलं.
****
फोन टॅपिंग
प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत विरोधी पक्षांनी उपस्थित केला. सरकार बदलल्यानंतर रश्मी
शुक्ला यांचा तपास बंद करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला,
असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. याप्रकरणी चर्चा करण्याची विरोधकांची
मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान,
विधानसभेत सदस्य भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी दीशा सालियान मृत्यूचा मुद्दा उपस्थित
केला. या प्रकरणावरुन सत्ताधारी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोन
वेळा तहकुब झालं होतं.
****
राज्यातल्या
अनुसूचित जमातीच्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आदिवासींच्या जागा भरण्यासाठी
सरकारतर्फे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, ७५ हजार जागांवर नवीन भरती
करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
सरकारी कार्यालयांमध्ये अनुसूचित जमातींची बोगस जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दाखले
सादर करणार्यांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ नियुक्ती रद्द करून सेवेतून कमी करावं,
अशी मागणी, आमदार आमश्या पाडवी यांनी केली.
****
दरम्यान,
विधीमंडळात आज कामकाज सुरु होण्याआधी सत्तारूढ पक्षाने आदित्य ठाकरे, छगन भुजबळाविरोधात
विधान भवनाच्या पायऱ्यावर घोषणा देत आंदोलन केलं. तर विरोधकांनी सुद्धा भूखंड प्रकरणी
आंदोलन केलं. एनआयटी भूखंडासंदर्भात न्यायालयात चुकीचं शपथपत्र सादर केल्यानं मुख्यमंत्र्यांवर
कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
यावेळी केली.
****
राज्यातल्या
ग्रामपंचायतींमध्ये 'आपले सेवा केंद्र' प्रकल्पातल्या संगणक परिचालकांनी किमान वेतन
कायद्यानुसार वेतन देण्याच्या मागणीसाठी नागपूर इथं विधीमंडळावर काढलेल्या मोर्चाची
काल रात्री सांगता झाली. हा मोर्चा दुपारी काढण्यात आला होता, मात्र ठोस आश्वासन न
मिळाल्यामुळे तब्बल दहा तास मोर्चेकरी ठाण मांडून होते. अखरे ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने
पुढील १५ दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चा मागे घेतला.
****
सोलापूर
इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांना
दोन लाख रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. नागरिकांनी कारखान्याविरुद्ध केलेल्या
तक्रारीवर कारवाई न करण्याकरता तसंच परवाना देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
भारत आणि
बांग्लादेशदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना ढाका इथं सुरु झाला असून, बांग्लादेशनं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांग्लादेशच्या
चार बाद १३९ धावा झाल्या होत्या. जयदेव उनाडकटनं दोन, तर उमेश यादव, आणि रविचंद्रन
अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला. दोन सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर
आहे.
**** ****
No comments:
Post a Comment