Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 January
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०७ जानेवारी २०२३ सकाळी
७.१० मि.
****
·
देशातल्या पाच राज्यांनी लागू केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात
आव्हान
·
महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न
करण्यासाठी जगभरातल्या मराठी माणसांनी पुढाकार घ्यावा-केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांचं आवाहन
·
दर्पण दिनानिमित्त काल राज्यभरात विविध कार्यक्रमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना अभिवादन
·
वृक्ष लागवडीतून पक्ष्यांचं अधिवास क्षेत्र वाढवण्याची गरज पर्यावरण तज्ज्ञ विजय
दिवाण यांच्याकडून व्यक्त; औरंगाबाद इथं नवव्या पक्षी महोत्सवाला प्रारंभ
·
रस्त्यांवरचे अपघात टाळण्यासाठी वॉक ऑन राईट मोहिम महत्त्वाची-न्यायाधीश शशिकांत
बांगर
·
थकित करापोटी परभणी महानगरपालिकेकडून एसटी महामंडळाचं विभागीय कार्यालय सील
·
जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद
शहरातली विकास कामं महिनाअखेरपर्यंत पूर्ण होणार-जिल्हाधिकाऱ्यांचा दावा
आणि
·
मिनी ऑलीम्पिक स्पर्धेच्या धनुर्विद्या प्रकारात उस्मानाबाद
जिल्हा संघाला रौप्य पदक
****
देशातल्या पाच राज्यांनी लागू
केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. जमियत
उलेमा-ए-हिंद या संघटनेने याबाबत दाखल केलेल्या एका जनहित याचिकेत हे कायदे म्हणजे
आंतरधर्मीय जोडप्यांचा छळ करण्याचे आणि त्यांना गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्याचं साधन
असल्याचा आरोप केला आहे. देशात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल
प्रदेश या पाच राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा लागू केला आहे.
****
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य
कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या याचिकेवरचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. आपल्या मुलाच्या येत्या १५ जानेवारीच्या नियोजित
विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई अवैध असल्याचा दावा, कोचर दाम्पत्याने
या याचिकेत केला आहे. या प्रकरणी पुढीची सुनावणी सोमवारी होणार आहे.
****
सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे
हत्या प्रकरणाची कारवाई सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र
न्यायालयाला दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने
दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत.
****
महाराष्ट्राला
आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी जगातल्या मराठी माणसांनी पुढाकार
घ्यावा, असं आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि
महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत वरळी इथं मराठी तितुका
मेळवावा या पहिल्या विश्व मराठी संमेलनातल्या कार्यक्रमात ते
काल बोलत होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी राज्यात
गुंतवणूक करुन उद्योजकता वाढवणं गरजेचं आहे, तसंच राज्य
सरकारनं विविध क्षेत्रांचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी कालबद्ध नियोजन करावं
असंही गडकरी यावेळी म्हणाले.
****
लम्पी त्वचा रोगावर प्रतिबंधक
लसीचं उत्पादन पुण्यात होणार आहे. केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या या लसीचं तंत्रज्ञान
पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे.
‘लम्पी प्रोव्हॅक’ असं या लसीचं नाव असेल, या लसीचं १० वर्षे व्यावसायिक उत्पादन घेण्याचे
अधिकार महाराष्ट्राला मिळाले आहेत.
****
देशातल्या महिलांनी स्वबळावर
विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे, त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा व्हावी,
असं आवाहन, कोलकाता इथल्या भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालक, डॉ.
द्रिती बॅनर्जी यांनी केलं आहे. नागपुरात भारतीय विज्ञान काँग्रेसध्ये घेण्यात आलेल्या
महिला विज्ञान काँग्रेसच्या समारोपप्रसंगी त्या काल बोलत होत्या.
दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे
लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं मत, सी एस आय आर चे माजी संचालक, डॉ.
शेखर मांडे यांनी व्यक्त केलं. भारतीय विज्ञान काँग्रेस मध्ये, विज्ञान आणि समाज या
परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
****
हरित रोख्यांच्या लिलावाचं वेळापत्रक
भारतीय रिजर्व्ह बँकेनं काल जाहीर केलं. त्यानुसार येत्या २५ जानेवारीला पहिला तर येत्या
नऊ फेब्रुवारीला दुसरा लिलाव होणार आहे. दोन्ही लिलावात प्रत्येकी आठ हजार कोटी रुपयांचे
रोखे विक्रीला निघतील. यातली पाच टक्के रक्कम किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेली
असेल, त्यात पाच किंवा दहा वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध राहील. या रोखेविक्रीतून
उभारलेली रक्कम हरित साधनसामुग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक उद्योगांमधे गुंतवली
जाणार आहे.
****
दर्पण दिन काल साजरा झाला. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी
भाषेतल्य पहिल्या वृत्तपत्राच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस
अभिवादन करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या
शाश्वत विकासात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे. काल मुंबईत पत्रकारिता पुरस्कार
प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचं
काम केलं, असं भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी
म्हटलं आहे. दर्पण दिनानिमित्तानं मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार गौरव सोहळ्यात ते
बोलत होते. दर्पण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या वतीने चार हजारावर
पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.
राज्यभरात ठिकठिकाणी दर्पण दिनानिमित्त
जांभेकरांना अभिवादनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. सिंधुदुर्ग इथं आकाशवाणीचे वार्ताहर
निलेश जोशी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लातूर जिल्हा माहिती कार्यालयात
माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून आदरांजली अर्पण करण्यात आली, तर बीड इथं माहिती अधिकारी किरण वाघ यांनी तर परभणी
इथं माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी
जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
परभणी जिल्हा
मराठी पत्रकार संघ आणि सुर्या हॉस्पीटलच्या वतीनं आयोजित आरेाग्य तपासणी
शिबीरामध्ये १५० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
****
औरंगाबाद इथं जिल्हा मराठी पत्रकार
संघ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात जांभेकर यांना अभिवादन करण्यात
आलं.
आजची पत्रकारिता म्हणजे कम्युनिटी
पोलिसिंगच असल्याचं, उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद
जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार गौरव सोहळ्यात ते काल बोलत होते. उस्मानाबाद जिल्हा
मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी
डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला.
****
पक्षी संवर्धनासाठी वृक्ष लागवड
करुन पक्ष्यांचं अधिवास क्षेत्र वाढवण्याची गरज, पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांनी
व्यक्त केली आहे. औरंगाबाद इथं एन्व्हार्यमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडेमी,
आणि एमआयटी संस्थेच्या वतीनं, नवव्या पक्षी महोत्सवाला काल मान्यवरांच्या हस्ते पृथ्वी
पूजनाने प्रारंभ झाला, त्यावेळी दिवाण बोलत होते. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.दिलीप यार्दी
यांनी आपल्या भाषणात, पक्षी निरीक्षण हा चैनीचा नव्हे तर अभ्यासाचा विषय असल्याचं सांगितलं.
या तीन दिवसीय पक्षी महोत्सवाअंतर्गत आज सुखना धरण परिसरात तर उद्या जायकवाडी पक्षी
अभारण्यात सकाळी सहा ते नऊ या वेळेत पक्षी निरीक्षण होणार असल्याची माहिती यार्दी यांनी
यावेळी दिली.
****
रस्त्यांवरचे अपघात टाळण्यासाठी
वॉक ऑन राईट अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला ही मोहिम महत्त्वाची असल्याचं,
नांदेडचे प्रभारी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी म्हटलं आहे.
वॉक ऑन राईट या अभिनव मोहिमेचा काल नांदेड इथं प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यास समोरून येणाऱ्या वाहनाचा निश्चित अंदाज बांधून
पादचारी आपली सुरक्षा सुनिश्चित करू शकतात, असं त्यांनी यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी
अभिजीत राऊत यांनी यावेळी केलेल्या भाषणात उजवीकडून चालण्याची सवय प्रत्येकाने अंगी
बिंबवणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परभणी महानगरपालिकेनं एसटी महामंडळाचं
विभागीय कार्यालय सील केलं आहे. या कार्यालयाचा २०१७ पासूनचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी
असा एकूण दोन कोटी २६ लाख रुपये कर थकलेला आहे, वारंवार नोटीस आणि मुदत देऊनही कराचा
भरणा न केल्यानं, काल ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचा शहरभरात सुमारे ९२ कोटी रुपये
कर थकलेला आहे. नागरिकांनी कर भरणा करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
जी-20 परिषदेच्या
निमित्ताने फेब्रुवारी मध्ये औरंगाबादमध्ये येणाऱ्या जगभरातल्या
शिष्टमंडळासमोर शहराची उत्कृष्ट प्रतिमा सादर व्हावी यासाठी शहरातली सर्व विकास
कामं जानेवारी अखेरपर्यंत पूर्णत्वास येतील असा दावा जिल्हाधिकारी
आस्तिक कुमार पांडेय यांनी केला आहे. जी-20 च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून शंभर कोटींच्या विविध कामांना मान्यता देण्यात आली असल्याचं, पांडे यांनी
सांगितलं.
****
महाराष्ट्र
राज्य मिनी ऑलीम्पिक धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह राउंड प्रकारातून
उस्मानाबाद जिल्ह्याच्या संघाने रौप्य पदक जिंकलं आहे. महाराष्ट्र ऑलीम्पिक संघटना आणि
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या वतीने अमरावती इथं ही
स्पर्धा घेण्यात आली. आर्यन, रय्यान, प्रणव आणि शौर्या यांचा या संघात समावेश आहे.
****
लातूर शहरात १९ ठिकाणी कोविड
लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. नागरिकांनी दुसरा डोस तसंच खबरदारीचा तिसरा डोस घ्यावा,
असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात काल महारोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ४११ जणांना नोकरी प्राप्त
झाल्याची माहिती या विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश काळे यांनी दिली. या उमेदवारांना सरासरी
१५ हजार रुपयांचे वेतन कंपन्यांनी देऊ केलं आहे.
****
जालना आणि औरंगाबाद सह अनेक शहरांतून
दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी अटक केली. शेख मोहसीन आणि मुस्ताक आरेफ अशी
या दोघांची नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी बारा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
****
औरंगाबाद इथं काल कंत्राटी कामगारांच्या
विविध मागण्यांसदर्भात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर
जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. कामगारांच्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला
सादर करण्यात आलं.
****
दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या
९२ वाव्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद इथं ममता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विधान
परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मीना ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शहरात सुगम आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम
घेण्यात आला.
****
औरंगाबाद इथं येत्या ११ ते १५
जानेवारी दरम्यान आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं आहे. या पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या चित्रपटांवर
आधारीत भित्तीपत्रक प्रदर्शनाचं आयोजन औरंगाबाद इथं प्रोझोन मॉलमध्ये करण्यात आलं आहे.
आज दुपारी या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. १५ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार
आहे. या प्रदर्शनात सत्यजित रे यांच्या गाजलेल्या चित्रपटातील सेटच्या प्रतिकृती, दुर्मिळ
छायाचित्रं, सिने कारकिर्दीवर आधारीत जीवनपट इत्यादीचा समावेश आहे.
****
औरंगाबाद
ग्रामीण परिसरात १८ जानेवारीपर्यंत पतंग उडवण्यासाठी तयार करण्यात येणार्या
नायलॉन दोरा निर्मिती, विक्री आणि वापर
बंदी घालण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकार्यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
****
आठ जानेवारीला धावणाऱ्या जम्मू
तावी -नांदेड हमसफर एक्स्प्रेस रेल्वे गाडीच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला
आहे. ही गाडी इटारसी, जुझार्पूर केबिन, नारखेर, बडनेरा आणि अकोला या
मार्गाने धावेल. ट्राफिक ब्लॉकमुळे हा तात्पुरता बदल करण्यात आला असल्याची माहिती
दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु
असलेल्या तीन टी -ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज राजकोट इथं
खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत दोन्ही संघ
एक - एकनं बरोबरीत आहेत.
****
जालना शहरासह
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, वातावरणात गारवा
निर्माण झाला आहे. जाफराबाद आणि जालना तालुक्यातल्या काही भागात झालेल्या पावसामुळे
वेचणीस आलेल्या कापसासह ज्वारी पिकांचं नुकसान झालं. बदलत्या
वातावरणाचा द्राक्ष बागांवर परिणाम होत असून, द्राक्ष
बागायतदारांना रोजच फवारणी घ्यावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे.
राज्यात मध्य
महाराष्ट्रात तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत
लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी किचिंत वाढ झाली आहे. येत्या दोन
दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमधे हवामान कोरडं राहिल, असा
पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
****
औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा संस्थेचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार, हिंगोली इथल्या बियाणी नूतन
साहित्य मंदिर वाचनालयाला जाहीर झाला आहे. आज औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ संशोधन
केंद्रात दुपारी साडे चार वाजता हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment