Monday, 23 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज ‘पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातल्या २१ द्वीपांना, २१ परमवीर चक्र विजेत्यांची नावं प्रदान करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपावर उभारण्यात येणाऱ्या नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या प्रारूपाचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेताजींना अभिवादन केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय कायम त्यांचे ऋणी राहतील, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण होणार आहे. विज्ञान भवन इथं होणाऱ्या या पुरस्कार सोहोळ्यात असामान्य कामगिरी केलेल्या ११ मुलांना गौरवण्यात येणार आहे. 

****

भारतीय नौदलाच्या पाचव्या कलवरी प्रकारातल्या वागीर पाणबुडीचं आज जलावतरण होणार आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत फ्रान्सच्या मेसर्स नेवल ग्रुप या खासगी कंपनीच्या सहकार्याने ही पाणबुडी तयार झाली आहे. वागीरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.

****

जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल गुजरात मधल्या गांधीनगर इथं बैठकीला सुरुवात झाली. तीन दिवस चालणार्या या बैठाकीत जलवायू परिवर्तन, नाविन्यता, डिजिटल क्षेत्रातील वैश्विक सहयोग आणि मूल्य साखळी यावर चर्चा होत आहे.

****

निवडणुकीत तंत्रज्ञानाचा वापर आणि विश्वासार्हता या विषयावरची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्लीत आयोजित केली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हस्ते होणार असून, १७ विविध देशातले ४३ प्रतिनिधी त्यात भाग घेणार आहेत.

****

कर्नाटकात हुबळी-धारवाड इथं पार पडलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३ मध्ये, उस्मानाबादच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेनं बहारदार कलाकृती सादर करुन उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं आहे. या यशाबद्दल नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...