Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
· २०२३-२४
वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर, पायाभूत सुविधा, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्रासह
‘सप्तर्षी’ साठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद.
· ज्येष्ठ
नागरिकांसीठीच्या ठेव कमाल मर्यादेत ३० लाख रुपयापर्यंत वाढ.
· स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ, ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना सुरू करण्यात येणार.
· नवीन
कर प्रणालीत प्राप्तीकराच्या सवलत मर्यादेत पाच लाखांहून सात लाख रुपयांपर्यंत वाढ,
जुन्या कर प्रणालीचा लाभ घेण्याचा पर्याय कायम.
आणि
· भारत-न्यूझीलंड
मध्ये आज टी-२० क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना.
****
केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प
सादर केला. सर्वसमावेशक विकास, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक,
क्षमता विस्तार, हरित विकास, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र या मुख्य सात उद्दिष्टांना
सीतारमन यांनी ‘सप्तर्षी’ संबोधत या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली.
कृषी
क्षेत्रात उच्च मूल्याच्या फळपिकांच्या लागवडीसाठी रोगमुक्त, दर्जेदार लागवड सामग्रीची
उपलब्धता वाढवण्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाचा आत्मनिर्भर स्वच्छ रोप लागवड
कार्यक्रम अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला.
भारताला
‘श्री अन्न’ चे जागतिक केंद्र बनवण्यासाठी हैदराबादच्या भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेला
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठीचे
केंद्र म्हणून तयार करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली.
पशुसंवर्धन,
दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायासाठी वीस लाख कोटी रूपयांच्या कृषी कर्जाचं लक्ष्य
निर्धारित करण्यात आलं आहे. दोन हजार ५१६ कोटी रुपयांची गुंतवणूक करुन देशातील गावपातळीवरील
६३ हजार विविध कार्यकारी सहकारी संस्थांचं संगणकीकरण करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी
यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांना पर्यायी खतांच्या
वापरासाठी तसेच रासायनिक खतांच्या समतोल वापरासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने
“पृथ्वी मातेची पुनर्स्थापना, जागरूकता, पोषण आणि जीर्णोद्धार यासाठीचा पंतप्रधान कार्यक्रम”-पीएम-प्राणम
सुरु करण्यात येणार आहे.
ई-न्यायालय
प्रकल्पामधील तिसऱ्या टप्प्यासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील
४७ लाख युवकांना विद्यावेतन देण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन
योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण प्रणाली सुरु करण्यात येईल.
ज्येष्ठ
नागरिकांना ठेवी जमा करण्याच्या कमाल मर्यादेत वाढ करून ही मर्यादा आता १५ लाख रुपयांवरून
३० लाख रुपये करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ, एकाच वेळी ठेव ठेवता येणारी नवीन अल्प बचत योजना, ‘महिला
सन्मान बचत प्रमाणपत्र’ सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतून आंशिक पैसे काढण्याचा
पर्याय उपलब्ध असून साडे सात टक्के निश्चित व्याज दरानं दोन वर्षांच्या कालावधीसाठी
महिला किंवा मुलींच्या नावावर दोन लाख रुपयांपर्यंत ठेव सुविधा देण्यात येईल. मासिक
उत्पन्न खाते योजनेची कमाल ठेव मर्यादा एकल खात्यासाठी रुपये साडे चार लाखांवरून नऊ
लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांवरून १५ लाखांपर्यंत वाढवली आहे.
प्रत्यक्ष
कर प्रस्तावांमध्ये नवीन कर प्रणालीत वैयक्तिक प्राप्तिकराची सवलत मर्यादा वाढवून सध्याच्या
पाच लाख रुपयांवरून ती सात लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे आता सात लाख रुपयांपर्यंत
उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही. वैयक्तिक प्राप्तिकर प्रणालीत
नवीन कर रचनेनुसार बदल करून पाच टप्प्यात विभागणी करण्यात आली असून कर सवलत मर्यादा
वाढवून ती तीन लाख रुपये करण्यात आली आहे. तीन ते सहा लाख रुपये उत्पन्नावर पाच टक्के,
सहा ते नऊ लाख रूपये उत्पन्नावर दहा टक्के, नऊ ते बारा लाख रुपये उत्पन्नावर १५ टक्के,
बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्नावर २० टक्के, तर पंधरा लाख रुपयांहून अधिक वार्षिक
उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव नव्या संरचनेत अर्थमंत्र्यांनी मांडला
आहे. नवीन प्राप्तीकर प्रणाली मूलभूत कर प्रणाली बनवण्यात आली आहे, मात्र, जुन्या कर
प्रणालीचा लाभ घेण्याचा पर्याय कायम ठेवण्यात आला आहे.
अप्रत्यक्ष
कर प्रणालीमध्ये कापड आणि शेती माला व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क दरात
कपात करून तो २१ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आणला आहे. खेळणी, सायकली, ऑटोमोबाईल्स
आणि नॅप्था यासह काही वस्तूंवरील मूलभूत सीमा शुल्क, उपकर आणि अधिभार यामध्ये किरकोळ
बदल करण्यात आले आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरण्यासाठी लिथियम-आयन
सेलच्या निर्मितीसाठी यंत्रसामग्रीवरील सीमा शुल्क भरण्याची मर्यादा ३१ मार्च २०२४
पर्यंत वाढवण्यात आली आहे. सोने आणि प्लॅटिनमच्या डोरे आणि बारपासून बनवलेल्या वस्तूंवरील
करात वाढ करण्यात आली तर चांदीचे डोरे, बार आणि वस्तूंवरच्या आयात शुल्कात वाढ करण्याची
घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.
****
आजच्या
अर्थसंकल्पानं देशाच्या विकासाला गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी व्यक्त केली आहे.
बजेट में हमने टेक्नोलॉजी और न्यू इकॉनॉमीपर बहोत अधिक बल
दिया है। एसपिरॅशनल भारत आज रोड, रेल, मेट्रो, पोर्ट, वॉटरवेईज हर क्षेत्र में आधुनिक
इन्फ्रास्ट्रकचर चाहता है। नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रकचर चाहिए २०१४ के तुलना में
इन्फ्रास्ट्रकचर में निवेशपर चारसौ परसेंटसे ज्यादा की वृद्धी की गई है। इस बार इन्फ्रास्ट्रक्चर
पर १० लाख करोड रुपये का अभुतपूर्व इन्व्हेसमेंट भारत के विकास को नई ऊर्जा और तेज
गती देगा। यह निवेश युवाओं के लिए रोजगार के नए अवसर पैदा करेगा एक बहोत बडी आबादी
को आय के नए अवसर उपलब्ध कराएगा।
केंद्राचा
अर्थसंकल्प गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी तसंच पायाभूत
सुविधांना उत्तेजन देणारा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
आहे. आगामी नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प असल्याचं
विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले –
आता निवडणुका आहे आता सगळ्यांना
निवडणुकीचं आपण बजेट नाही म्हणाल, म्हणून बजेट करायचं नाही. हे बजेट दरवर्षी होणारं
बजेट आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाने स्वागत केलं पाहिजे की आता रेल्वेमध्ये
कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये बजेट दिलं आहे. म्हणजे नऊ पटीनं बजेट वाढवलेलं आहे, याचं
स्वागत करायला नको का सगळ्या समाज घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. गरीबांना,
मध्यमवर्गीयांना, महिला-भगिनींना, कामगारांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना त्याच
बरोबर तरुणांना रोजगार असेल, आरोग्य, शिक्षण, कृषी, क्लायमेट चेंज यालादेखील केंद्रीत
केलं आहे. आणि शेतकरी हा केंद्र बिंदू याच्यामध्ये मानलेला आहे.
केंद्रीय
अर्थसंकल्प हा ‘सर्वजन हिताय’ असल्याची प्रतिक्रिया देत पुढील २५ वर्षात विकसित भारताकडे
नेणारा अर्थसंकल्प असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
ते म्हणाले –
अर्थमंत्री
निर्मला सीतारमनजी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील ‘सर्वजन हिताय’ या
संकल्पनेवर आधारित अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार
करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार
या अर्थसंकल्पाने केला आहे. आणि विशेषतः पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये जो एक विकसित भारत
आपण म्हणतोय, त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे.
****
भारत
आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज अहमदाबाद
इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला पहिला सामना
न्यूझीलंडनं, तर दुसरा सामना भारतानं जिंकल्यामुळे दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
****
No comments:
Post a Comment