Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 01 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१
फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
२०२३-२४
या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत
सादर केला. अर्थसंकल्पातल्या मुख्य सात उद्दिष्टांना सीतारमन यांनी 'सप्तर्षी' असं संबोधलं. या 'सप्तर्षी'मध्ये सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य,
पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा
शक्ती, वित्तीय क्षेत्र यांचा समावेश करण्यात आला आहे.
आपल्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी करमुक्त
उत्पन्नाची मर्यादा वाढवत, कर संरचनेतही बदल प्रस्तावित केला
आहे. वार्षिक सात लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असलेल्या
करदात्यांना आयकरात सूट मिळेल. नव्या कर प्रणालीत तीन
लाखापर्यंत उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असेल. तीन ते सहा लाख रुपये उत्पन्नावर पाच
टक्के, सहा ते नऊ लाख उत्पन्नावर दहा टक्के, नऊ ते बारा लाख रुपये उत्पन्नावर १५ टक्के, बारा ते
पंधरा लाख रुपये उत्पन्नावर २० टक्के, तर वीस लाख रुपये
वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव नव्या
संरचनेत अर्थमंत्र्यांनी मांडला आहे.
पायाभूत सुविधांसाठी दहा लाख कोटी, तर रेल्वेसाठी दोन लाख
४० हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. राज्यांना ५० वर्षांसाठी
बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा एका वर्षासाठी वाढवण्याची घोषणा त्यांनी केली.
लोकांना नावात किंवा पत्त्यात बदल करणं सोपं व्हावं यासाठी
केवायसी सुविधा आणखी सोपी केली जाईल, सर्व सरकारी विभागांमध्ये सर्व प्रकारच्या
डिजिटल कामांसाठी पॅन कार्ड एक सर्वसमावेशक ओळखपत्र म्हणून स्वीकारलं जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
मेक ए आय इन इंडिया आणि मेक ए आय वर्क फॉर इंडियाला चालना देण्यासाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तीन केंद्रे स्थापन केली जातील, देशात १५७ नवीन
नर्सिंग कॉलेज सुरू केले जातील, ई- न्यायालयाच्या तिसर्या टप्प्याच्या
अंमलबजावणीसाठी सात हाजर कोटी प्रस्तावित, तर फाईव्ह - जी ॲप्स तयार करण्यासाठी
१०० प्रयोगशाळा उभारणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
पीएम आवास योजनेत ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असून ७९ हजार
कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. आदिवासी मुलांसाठी बांधलेल्या एकलव्य
शाळांसाठी सरकार ३८ हजार नवीन शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. लहान
मुले आणि प्रौढांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार केली जाईल, यातील प्रवेश
वाढवण्यासाठी पंचायत स्तरावर एक वाचनालयही तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून मुलांना तिथून डिजिटल पुस्तके वाचता येतील, असं सीतारामन यांनी
सांगितलं.
महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी
यावेळी केली. ज्येष्ठ नागरीक बचत योजनांची
मर्यादा १५ लाखावरुन ३० लाख रुपये, तर
मासिक उत्पन्न खाते योजनेची
मर्यादा साडे चार लाखावरुन नऊ लाख रुपये करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मोबाईलचे सुटे भाग आणि कॅमेरा लेन्सच्या आयातीत सवलत, स्वयंपाक
घरातील इलेक्ट्रीक चिमनीवरचं सीमा शुल्क साडेसात टक्क्यावरुन १५ टक्क्यांवर, प्रयोगशाळेत
तयार करण्यात येणाऱ्या हिऱ्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सीमा शुल्कात
सवलत, वस्त्र आणि कृषी माल सोडून अन्य वस्तुंवरच्या मूळ सीमा
शुल्कात घट तर सिगारेट वरच्या आकस्मिक शुल्कात १६ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
***
माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातल्या माथाडी कामगारांनी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. या
संपामुळे नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले पाचही मार्केट बंद आहेत. विविध मागण्यांबाबत
संघटनेने सरकारकडे पाठपुरावा केला होता, मात्र सरकारने या मागण्यांबाबत कोणतीही
ठोस भूमिका घेतली नसल्यानं हा संप पुकारत असल्याचं, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल
कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
***
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम
सामना आज अहमदाबाद इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला पहिला सामना न्यूझीलंडनं, तर दुसरा
सामना भारतानं जिंकल्यामुळे दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
***
माघी अर्थात जया एकादशीनिमित्त आज पंढरपुरात विठ्ठल भक्तांनी मंदिर परिसर
गजबजून केला आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
या सोहळयासाठी सुमारे चार लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
//**********//
No comments:
Post a Comment