Monday, 27 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 27.02.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा १६ हजार ८०० कोटी रुपयांचा तेरावा हप्ता वितरित.

·      छत्रपती संभाजीनगर इथं G-20 परिषदेच्या W-20 प्रारंभिक बैठकीचं उद्घाटन.

·      राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात.

·      मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात विविध कार्यक्रमातून साजरा.

आणि

·      वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा आज समारोप.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १६ हजार ८०० कोटी रुपयांचा तेरावा हप्ता वितरित केला. कर्नाटकमध्ये बेळगावी इथं झालेल्या कार्यक्रमात थेट निधी हस्तांतर प्रणालीद्वारे सुमारे आठ कोटी शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला. दरम्यान, शिवमोगा विमानतळासह विविध प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण तसंच भूमिपूजन करण्यात आलं.

****

भारतात दोन कोटी ३० लाख महिला मुद्रा योजनेच्या लाभार्थी असून, इतक्या मोठ्या प्रमाणात महिला उद्योजक असलेल्या देशात W20 प्रतिनिधींचं स्वागत असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं G-20 परिषदेच्या W-20 प्रारंभिक बैठकीचं उद्घाटन आज इराणी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

G20 चे शेर्पा अमिताभ कांत, W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह G20 चे माजी अध्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर W20 च्या गटानं मार्गदर्शन करावं, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसाय, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असं इराणी यावेळी म्हणाल्या.

आज या बैठकीत अतिसुक्ष्म, सुक्ष्म आणि स्टार्ट अप उद्योगातील महिलांचं सक्षमीकरण, या विषयावर चर्चासत्र झालं. दुपारच्या सत्रात पर्यावरण बदलात महिला आणि मुलींची भूमिका, तळागाळातल्या महिला नेत्यांसाठी सक्षण प्रणाली विकसित करणं, लिंग गुणोत्तरातली दरी कमी करणं, शिक्षण आणि कौशल्य विकासातून महिला विकासाची दिशा, आणि महिलांच्या नेतृत्वात भारताचा विकास, या विषयांवर गटचर्चा झाली. उद्या सकाळी W20 प्रतिनिधी औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत.

 

दरम्यान, W20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला आज केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी भेट दिली. महिलांनी तयार केलेल्या अन्न प्रक्रिया पदार्थ, हॅडलूम, शोभेच्या वस्तूची पाहणी करून इराणी यांनी या महिलांचं कौतुक केलं. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. २०२६-२७ पर्यंत पाच लाख कोटी रुपये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यात महाराष्ट्र एक लाख कोटीचं योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, सीमाभागात राहणाऱ्या नागरीकांसाठी विविध योजना, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, स्वतंत्र दिव्यांग विभाग, स्वातंत्र्याचा तसंच मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम आदी मुद्यावर राज्यपालांनी भाष्य केलं.

 

अभिभाषणानंतर विधानसभेचं कामकाज सुरू होताच, ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी उपस्थित केली. भुजबळांच्या या मागणीला आशिष शेलार यांनीही अनुमोदन दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लवकरात लवकर उपमुख्यमंत्र्यांसह एक शिष्टमंडळ नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेईल, असं सांगितलं.

विधीमंडळ सभागृहाचं कामकाज हे प्रथा, परंपरा आणि नियमांना डावलून केलं जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विविध आयुधांचा वापर करुन सदस्यांनी केलेल्या सूचना मान्य झाल्या अथवा नाही माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना दिली जात नाही, दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची माहिती रात्री बारा वाजेनंतर संकेतस्थळावर अपलोड होते, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. यावर योग्य ती सुधारणा करण्याचे आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यानंतर राज्यातील महापालिका आणि मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करणारी विधेयकं सादर करण्यात आली. यात मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत सदस्यांची संख्या ५ वरुन १० करण्याचा आणि इतर महापालिकांमधल्या स्वीकृत सदस्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा कमाल १० करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणारं विधेयकही यावेळी मांडण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांनी आज योगेश सागर, संजय शिरसाठ, सुनील भुसारा आणि सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. दिवंगत सदस्यांना अभिवादन करुन विधानसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

 

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत विरोधकांना देशद्रोही म्हटल्याच्या विरोधात हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली.

****

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून राज्यभरात विविध कार्यक्रमातून साजरा करण्यात येत आहे.

दैनंदिन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्ती वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. भाषा ही प्रवाही राहिली पाहिजे, भाषेत शब्दांची देवाण घेवाण होत राहिली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली मराठी भाषा दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान इथं कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली, यात ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा आणि वाङमय विभागात आज विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी बोलताना दहा कोटींहून अधिक लोकांची मातृभाषा असलेल्या मराठीचा व्यावहारीक भाषा, ज्ञानभाषा म्हणून अधिकाधिक वापर होण्याची गरज व्यक्त केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा आज पद्मश्री शंकर महादेवन यांच्या गायनानं समारोप होत आहे. या महोत्सवात काल तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण झालं. आज शेवटच्या दिवशी या महोत्सवात संगीता मुजुमदार यांच्या एम स्टेप ग्रुपचं कथ्थक सादरीकरण, नील रंजन मुखर्जी यांचं गिटार वादन होणार आहे.

****

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज देवणी, तोगरी इथल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तासापासून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत महसूल विभागाचे बैठे पथक तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्था, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे.

****

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त हिंगोली इथं उद्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...