Tuesday, 28 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 February 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा मुद्दा प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात सहा हजार आठशे कोटी रुपये नियमित नुकसानापैकी सहा हजार कोटी रुपये तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी ७५५ कोटी रुपये वाटप झाल्याचं सांगितलं. तीन हजार ३०० कोटी रुपये अतिरिक्त नुकसान भरपाईची मागणी आली असून, त्याची वैधता तपासली जात असल्याचं सांगितलं. कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान वाटप केलं जात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, अजून फार मोठा वर्ग या अनुदानापासून वंचित असल्याचं सांगितलं. हे अनुदान देण्यासाठी कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही मदत ३१ मार्चपर्यंत दिली जाईल, असं सांगितलं.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. सरकारने या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कांदा उत्पादकांच्या पाठिशी असून, नाफेडद्वारे कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली.

आजचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

***

पुण्यात भिडे वाड्याच्या स्मारकाचा प्रश्न छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलताना, येत्या १० मार्चला न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे, त्यापूर्वी या स्मारकाबाबतचे सर्व प्रश्न सोडवण्याची सूचना प्रधान सचिवांना केल्याची माहिती दिली.

***

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ५० लाखावर उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असल्याचा मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिली.

दोन लाख अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बोलताना, अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासोबत आज दुपारी दीड वाजता चर्चा होणार असून, सरकार याबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं.

सीमाभागातल्या नागरिकांनी मुंबईत येऊन पुकारलेल्या आंदोलनाकडे छगन भुजबळ यांनी लक्ष वेधलं. या आंदोलकांचीही आज दुपारी बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

***

G20 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या W20 बैठकीत आज सकाळच्या सत्रात चाकोरीबाहेरच्या महिलांच्या कथा या विषयावर विशेष सत्र झालं. आता महिला नेतृत्वात विकास: धोरण आणि कायदेशीर चौकट या विषयावर परिचर्चा होआहे. कृती दल तसंच प्रतिनिधींच्या बैठका झाल्यावर सर्व प्रतिनिधी दुपारी वेरुळ लेण्यांना भेट देणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने या दोन दिवसीय बैठकीची सांगता होणार आहे.

दरम्यान, आज सकाळी W20 च्या प्रतिनिधींनी शहरातल्या बीबी का मकबरा आणि औरंगाबाद लेणी या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.

***

डिजिटल क्रांतीचा फायदा समाजातल्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जीवनमान सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला ते आज संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीवनातील सुलभता वाढवण्यावर भर देण्यात आला असल्याचं पंतप्रधानांनी, यावेळी नमूद केलं.

***

हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे आज पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरी काढण्यात आली. शहरातल्या सर्व रस्त्यांवरून मार्गक्रमण करून इंदिरा गांधी चौकातल्या अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर या प्रभात फेरीची सांगता झाली. यावेळी तृणधान्याचं महत्त्व या विषयावर व्याख्यान झालं.

***

नांदेड जिल्हा परिषद शाळांमधल्या इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गात शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा इथल्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्रो इथं सहल नेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड परीक्षा काल जिल्ह्यातल्या १७६ केंद्रांवर घेण्यात आली. सुमारे साडे १२ हजार विद्यार्थ्यांनी काल ही परीक्षा दिली, त्यातून ४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

***

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर - गावसकर मालिकेतला तिसरा कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून इंदूर इथं सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतले पहिले दोन सामने जिंकून भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.

 

//**********//

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...