Thursday, 23 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक : 23.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 March 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड १९ महामारीचा धोका अद्यापही संपला नसल्याचं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरीकांना सावध केलं आहे. देशातल्या कोविड-19 परिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली इथं माहिती दिली. दुसर्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्ण संख्या अत्यल्प असल्याचं ते म्हणाले. भारतात, गुजरात, केरळ आणि कर्नाटकानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक एक हजार ६५० कोविड रुग्ण आढळल्याचं भूषण यांनी सांगितलं. गेल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे सकारात्मकता दर शून्य पूर्णांक शून्य नऊ टक्क्यांवरून एक टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आधीच सर्व राज्यांना चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिल्याचं भूषण यांनी सांगितलं. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य आ णि अदानी समुहाच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग आठव्या दिवशी बाधित झालं.

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी समुहाच्या मुद्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. काही सदस्यांनी राहुल गांधी यांना सभागृहात बोलू देण्याची मागणी केली. नियमाच्या अधीन राहून सभागृहात सर्व सदस्यांना बोलू दिलं जाणार आहे, मात्र सुरवातीला प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचं आवाहन अध्यक्ष ओम बिरला यांनी केलं. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.  

राज्यसभेत आजचं कामकाज सुरु होताच अदानी समुहाच्या मुद्यावर विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. सभापतींच्या आवाहनानंतरही विरोधी पक्ष सभागृह चालू देत नसल्याचं भाजप नेते पियुष गोयल म्हणाले. तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी समुहाच्या मुद्याची चौकशी करण्याची मगणी लाऊन धरली. दोन्ही बाजुंचा गदारोळ वाढल्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

****


राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आज राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आणि लोकशाहीवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले. विधानसभेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या मुद्दा उपस्थित केला, आमदार संजय शिरसाठ यांनीही त्याला दुजोरा दिला. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यानंतर भाजपा आणि शिवसेना आमदारांनी अध्यक्षांसमोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं, सभागृहाचं दोन वेळा तहकूब झालं होतं.

****

मराठवाड्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसंदर्भात आज विधानपरिषदेत चर्चा झाली. सामाजिक वनीकरण कामामध्ये वृक्ष लागवड केली असून, जवळपास ९४ टक्के वृक्ष जिवंत असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मराठवाड्यात ठरवल्याप्रमाणे झाडं लावण्यात आली नसून, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार विक्रम काळे यांनी केला. वृक्ष लागवडीची ही लोकचळवळ होती, झाडं लावली नसल्यासंदर्भात माहिती असल्यास सदस्यांनी द्यावी, चौकशी करण्यात येईल, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या योजनेत अधिकारी सहभागी होत नसल्याचं सांगून, वृक्ष लागवडीच्या कामात इको बटालियनची मदत घेण्याची मागणी केली. वृक्षलागवडीसंदर्भात आणि वृक्षांचं जतन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपाय केले जात असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

****

२०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत इथल्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं असून, दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी आज राहुल गांधी न्यायालयात हजर झाले, त्यांना लगेचच वरच्या न्यायालयात अपिल करण्यासाठी जमिन मंजूर करण्यात आला. मोदी समाजाने गांधी यांच्याविरोधात हा खटला दाखल करुन मानहानीचा दावा केला होता.

****

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा स्मृतिदिन आज हुतात्मा दिन म्हणून पाळला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा राजगुरू चौक इथं भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.

****

भोपाळ इथं सुरु असलेल्या आयएसएसफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत नितीन राजु आणि रुद्रांक्ष पाटील या जोडीनं आज कांस्य पदक जिंकलं. दहा मीटर एयर रायफल प्रकारात त्यांनी चीनच्या जोडीचा १६ - आठ असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...