Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 24 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मार्च
२०२३ दुपारी १.०० वा.
****
२०२५
पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याकडे वाटचाल सुरु असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज वाराणसी इथं वन वर्ल्ड टीबी समिट या कार्यक्रमात
ते आज बोलत होते. क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत भारतानं उत्तम कामगिरी केली असून, त्यात
जनसहभाग महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले. टीबी मुक्त भारत अभियानात सहभागी होण्यासाठी
सरकारने नागरिकांना निक्षय मित्र होण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार जवळपास दहा लाख
क्षयरुग्णांना देशातल्या नागरिकांनी दत्तक घेऊन त्यांना मदत केल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. टीबी मुक्त भारत अभियानासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची त्यांनी
माहिती दिली. या कार्यक्रमात टीबी मुक्त पंचायत, संक्षिप्त टीबी निवारण उपचार प्रणाली,
टीबीसाटी परिवार केंद्रीत उपचार मॉडेल, यासारख्या योजनांची पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात
करण्यात आली. भारताचा वार्षिक टीबी अहवाल २०२३ देखील यावेळी प्रकाशित करण्यात आला.
जागतिक
क्षयरोग दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या क्षयरोग
नियंत्रण समितीच्या वतीनं सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली आणि महानगरपालिकेच्या
वतीनं १०० क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचं वाटप करण्यात आलं. तसंच
घंटागाड्यांवर क्षयरोग जनजागृतीसाठी जिंगल्स वाजवण्यात येत आहेत.
***
राहुल
गांधी यांच्या परदेशातल्या वक्तव्याप्रकरणी सत्ताधारी सदस्यांनी तर काँग्रेससह विरोधी
पक्षाच्या सदस्यांनी कथित अदाणी घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या
मागणीसाठी घोषणाबाजी केल्यानं, संसदेचं कामकाज आज विस्कळीत झालं. लोकसभेचं कामकाज बारा
वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिला मात्र तालिका अध्यक्षांनी या गदारोळातच
कामकाज सुरू ठेवलं. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयक सभागृहासमोर सादर
केलं. या विधेयकातल्या अनेक सूचना तसंच सुधारणा सदनानं मंजूर करून, त्यांचा विधेयकात
समावेश करण्यात आला.
***
राहुल गांधी यांच्या मुद्यावरून विरोधक आणि समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्यानं,
विघानसभेचं कामकाज देखिल आज सकाळच्या सत्रात वारंवार तहकूब झालं. दुपारी बारा वाजेनंतर
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल विधीमंडळ
परिसरात झालेलं आंदोलन तसंच आज सदनात झालेल्या आक्षेपार्ह शेऱ्याबद्दल संपूर्ण घटना
तपासून उद्या निर्णय देणार असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना, सभागृहाचं पावित्र्य जपणं दोन्ही
बाजूंचं काम असून, यापुढे सगळ्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असं सांगितलं. गेले आठ
महिने आपल्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या, फलक झळकावणाऱ्यांविरोधातही कारवाई करावी,
अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांकडे केली.
***
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधान परिषदेच्या सभापतींचा
उल्लेख नसल्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यावरून सदनाचं कामकाज उपसभापती नीलम
गोऱ्हे यांनी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून
माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी सांगितलं.
***
मराठवाडा
मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून लातूर ते नांदेड थेट रेल्वे
मार्गाची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात
लक्ष घालून हा प्रस्ताव केंद्राकडे कधी पाठवणार, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला.
रेल्वे विकासातून मराठवाडा पूर्णपणे वगळण्यात आल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी
यासंदर्भात उत्तर देताना, मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.
या प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
***
धाराशीव पोलिस मुख्यालयासह जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात सेंद्रीय
शेती मालाच्या विक्री उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी
यांनी काल तुळजापूर इथल्या सेंद्रीय भाजीपाला केंद्रास भेट दिली. दर आठवड्याला सेंद्रीय
मालाचा बाजार इथं भरवण्यात येणार असून, ही उत्पादनं
खरेदी करावीत, असं आवाहन कुलकर्णी यांनी केलं.
***
महिला विश्व मुष्टियुद्धपटू अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या
लवलिना बोर्गोहेन, निखत झरीन, स्वीटी बूरा आणि नीतू घंसास यांनी अंतिम फेरीत धडक मारली
आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या सामन्यांमध्ये ५० किलो वजनी गटात निखतनं कोलंबियाच्या
खेळाडुचा, ७५ किलो वजनी गटात लवलिनानं चीनच्या खेळाडुचा, नीतू घंसासनं कजाकिस्तानच्या,
तर स्वीटीनं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा पराभव केला.
//**********//
No comments:
Post a Comment