Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
· उच्च
शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी यूजीसीचं ‘ई-समाधान’ पोर्टल.
· खासदार
संजय राऊत धमकी प्रकरणी संपूर्ण तपास करून कारवाईचं गृहमंत्र्यांचं आश्वासन.
· आरटीई
अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी या आठवड्यात ऑनलाईन सोडत.
आणि
· मराठवाड्यात
उद्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा.
****
देशभरातील
उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता एक खिडकी पद्धतीने
‘ई-समाधान’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. रॅगिंग सह, शैक्षणिक-अशैक्षणिक समस्या, विद्यापीठ
किंवा महाविद्यालयातील अन्य तक्रारी सोडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं हे नवीन
पोर्टल कार्यान्वित केलं आहे. यापूर्वी वापरली जाणारी तक्रार निवारण प्रणाली बंद करण्याचा
निर्णय आयोगाने घेतला असून प्रलंबित तक्रारीही या पोर्टलद्वारे सोडवल्या जाणार असल्याचं
आयोगानं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
****
२०२३-२४
या वर्षीचा नवीन अर्थसंकल्प आजपासून लागू झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
यावर्षीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या विविध सरकारी
योजना आणि सुधारणाही आजपासून लागू झाल्या आहेत. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींची आजपासून
हॉलमार्क असलेल्या सहा अंकी सांकेतिक चिन्हासह विक्री केली जाणार आहे. अल्पमुदतीच्या
बचत योजनांवर आजपासून व्याजदर लागू होणार असून, दोन वर्षांची मुदत असलेल्या महिला सन्मान
बचत प्रमाणपत्र योजनेतही आजपासून गुंतवणूक करता येणार आहे.
****
२०२२-२३
या आर्थिक वर्षात जेम या सरकारी पोर्टलवरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीने दोन लाख कोटी
रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष
गोयल यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलताना दिली. भारतानं ७६५ अब्ज अमेरीकी डॉलर
निर्यातीचा टप्पा ओलांडला असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. व्यापार क्षेत्रातील सर्व
भागधारकांना भारताचे नवे परदेशी व्यापार धोरण दिलासा देणारे असल्याचं मत गोयल यांनी
व्यक्त केलं.
****
खासदार
संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, यासंदर्भात संपूर्ण तपास करून
कारवाई होईल, असं गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. जे जे चुकीचं काम करतील, त्यांना शासन झाल्याशिवाय
राहणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –
संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे, त्या संदर्भात
माणूस आयडेंटीफाय झालेला आहे. प्राथमिक रिपोर्ट असा आहे की दारूच्या नशेमध्ये त्याने
अशा प्रकारची धमकी दिली आहे. तथापि, हा केवळ प्राथमिक अशा प्रकारचा रिपोर्ट आहे. त्यामुळे
या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. आणि कोणीही धमकी दिली असेल तर कारवाई होईल. जे
जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी
मी पाच वर्ष सांभाळलेलं आहे. आताही जे लोकं इल्लीगल कामं करतील त्यांना सोडणार नाही.
****
लोकप्रतिनिधींना
वारंवार धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत. याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा
नाही का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला
आहे. महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची
धमकी दिली, त्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी एका ट्विट संदेशातून ही अतिशय गंभीर
बाब असल्याचं म्हटलं आहे. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन राऊत यांना आवश्यक ती सुरक्षा
पुरवण्याची गरज असल्याचं, सुळे यांनी म्हटलं आहे.
****
मुंबई
पासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत,
हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार
विकास सहकारी संस्थेने केला आहे. या बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून
आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी पकडली होती, मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा
खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नसल्याचं समोर
आलं आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यात भामरागड तालुक्याच्या मुसपर्शी गावाजवळच्या जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत
एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान मुसपर्शी परिसरात नक्षलविरोधी
अभियान राबवत असताना नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. याठिकाणी नक्षल्यांच्या
३ बंदुका आणि दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांनी जप्त केलं आहे.
****
शिक्षण
हक्क कायदा-आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन सोडत या महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद
गोसावी यांनी दिली. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील
विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या प्रक्रियेतंर्गत २०२३-२४ या
शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि ते स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली
आहे. राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६५ हजार
१२५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
****
नौदल
प्रमुख ॲडमिरल हरिकुमार यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे भोपाळमध्ये सुरू असलेली
तिन्ही सैन्य दलांची संयुक्त कमांडर्स परिषद सोडून ते दिल्लीला रवाना झाले. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज, या परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यापूर्वी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांची
कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यात नौदल प्रमुखांसह २२ जणांना कोरोना विषाणू संसर्ग
झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, पंतप्रधानांनी भोपाळ इथल्या राणी कमलापती रेल्वे
स्थानकावरून देशाच्या ११ व्या वंदे भारत रेल्वेला आज हिरवा कंदील दाखवला.
****
प्रादेशिक
परिवहन कार्यालयातील वाहन तपासणी यापुढे स्वयंचलित पद्धतीनं करण्यात येणार असून यानंतर
वाहनांना योग्यतेचं प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी राज्यभरात २३ स्वयंचलित तपासणी
आणि प्रमाणपत्र केंद्रे सुरू होणार आहेत. राज्य सरकारने यासाठी ६० कोटी रुपयांचा निधी
मंजूर केला असून याबाबतचा आदेशही काढण्यात आला आहे. प्रत्येक आरटीओ कार्यालयात ही केंद्रं
मार्च २०२४ अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.
****
मराठवाड्यात
उद्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री
डॉ.भागवत कराड आणि यात्रेचे मराठवाडा विभाग प्रमुख आमदार संभाजी निलंगेकर यांनी आज
छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष - शिवसेनेतर्फे
काढण्यात येणाऱ्या या गौरव यात्रेला छत्रपती संभाजीनगर शहरातल्या समर्थनगर भागातून
सुरुवात होणार असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं. ही यात्रा सहा एप्रिल पर्यंत मराठवाड्यातल्या
लोकसभा सर्व विधानसभा क्षेत्रांमधून प्रवास करणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज या सभेच्या
तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, मोठा जनसमुदाय सभेला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्याच्या राज्य शासनानं छत्रपती संभाजीनगरचे प्रश्न रेंगाळून ठेवलं आहेत, पाणीपुरवठा
योजना, रस्ते या सारख्या योजना रखडल्या असून त्यांना सरकारनं गतिमान करण्याची गरज असल्याचं
देसाई म्हणाले.
****
धाराशिव
इथं आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार कैलास घाडगे - पाटील यांच्या
नेतृत्वाखाली सरकारला बेशरमाची फुलं देत निषेध करण्यात आला. सततच्या पावसाने खरीप पिकांचं
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च पूर्वी अनुदान देण्याचं आश्वासन देण्यात आलं
होतं, परंतु अजुनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे निषेध करत असल्याचं आमदार पाटील यांनी
सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं २०२२-२३ या आर्थिक वर्षात १४१ कोटी रुपयांची थकीत
मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली करण्यात आली आहे. यात मालमत्ता कर एकशे पंधरा कोटी
सात लाख रूपये तर पाणीपट्टी पंचवीस कोटी ब्याऐंशी लाख रूपये इतकी वसुल करण्यात आली
आहे. शहरातील सर्व नऊ विभागीय कार्यालयात व्यवसायिक तसंच निवासी थकीत मालमत्ताकर आणि
पाणीपट्टी वसुली मोहीम राबवण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment