Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 25 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ मे
२०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेमध्ये ९१ पूर्णांक २५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बारावीचा निकाल जाहीर केला, त्यावेळी ही माहिती दिली. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये यंदाही मुलींचं प्रमाण जास्त आहे. सर्व नऊ विभागीय मंडळांतून ९३ पूर्णांक ७३ टक्के विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या
असून ८९ पूर्णांक १४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण
विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४ पूर्णांक ५९ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकण विभागात सर्वाधिक ९६ पूर्णांक ०१ टक्के तर मुंबई विभागात सर्वात कमी ८८ पूर्णाक
१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद विभागात ९१ पूर्णांक ८५, लातूर ९०
पूर्णांक ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागात ९३ पूर्णांक ३४ टक्के, नागपूर ९० पूर्णांक
३५, अमरावती ९२ पूर्णांक ७५, कोल्हापूर ९३ पूर्णांक २८ आणि नाशिक विभागात ९१ पूर्णांक
६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी
विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची
एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२ पूर्णांक ३९ असल्याचं
गोसावी यांनी सांगितलं.
***
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या माळेगाव
जवळ ट्रक आणि मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रक दरम्यान आज सकाळी झालेल्या अपघातात
चार जणांचा मृत्यू झाला तर सुमारे दीडशे मेंढ्या दगावल्या आहेत. माळेगाव
जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे हा
अपघात झाला. या अपघातातल्या तिघा जणांना हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात
आलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. चौथ्या गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी
नांदेड इथं हलवण्यात आलं होतं. तिथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती
पोलिसांनी दिली.
***
नूतन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणं म्हणजे
लोकशाहीला नाकारणं असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा विरोधी पक्षाचा हेतू असून तो साध्य होणार नाही असं
ते यावेळी म्हणाले. आधीच्या काळात झालेल्या उद्धाटनांचा उल्लेख करत, उद्धाटन सोहळ्यावर
बहिष्कार घालणं हा विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी
केली.
***
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या अब्दुल्लापूर तांडा या गावानं हातभट्टी दारु
कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाच्या ग्रामसभेत या
संदर्भातला ठराव आज घेण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक
संतोष झगडे, पोलीस विभाग, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा झाली, त्यावेळी हा ठराव घेण्यात आला.
***
क्वाललंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स २०२३ बॅडमिंटन
स्पर्धेत काल पी वी सिंधू, किदांबी श्रीकांत, एच एस प्रणॉय, आणि लक्ष्य सेन यांनी विजयी
सुरुवात केली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या पी वी सिंधूनं डेनमार्कच्या
लाइन क्रिस्टोफरसेनला हरवलं. आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी सिंधूचा सामना जपानच्या
आया ओहोरी सोबत होईल. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किंदाम्बी श्रीकांतनं फ्रांसच्या
तोमा जूनियर पोपोव तर एच एस प्रणॉय यानं तैवानच्या चोउ तियेन चेन आणि लक्ष्य सेननं
सिंगापूरच्या लोह कियेन यू ला हरवत विजय मिळवला.आज एच एस प्रणॉय याचा सामना चीनच्या
के ली शी फेंग सोबत तर लक्ष्य सेनचा सामना हाँगकाँगच्या अंगस एंजि का लोंग सोबत होईल.
***
इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले- ऑफ गटातला निर्णायक सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात
होणार आहे. अहमदाबाद
इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल.या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होईल, तर विजेत्या संघाचा येत्या रविवारी चेन्नई सुपर किंग्स सोबत अंतिम फेरीसाठीचा
सामना होईल.
***
रिपब्लिकन
पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र राज्य महाअधिवेशन येत्या रविवारी शिर्डी इथं होत
आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या
अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होईल.
//************//
No comments:
Post a Comment