Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 31 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ मे
२०२३ दुपारी १.०० वा.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून अहिल्यादेवी यांना अभिवादन केलं आहे.
अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा साजरा
होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत
स्तरावर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे.
***
जम्मू
कश्मीर पोलिसांसोबत भारतीय सैन्य दलानं केलेल्या
एका संयुक्त कारवाईत, तीन ते चार दहशतवाद्यांना
पुंछ भागामध्ये नियंत्रण रेखा ओलांडण्यापासून रोखण्यात
आलं आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानं प्रत्यूत्तरादाखल
केलेल्या गोळीबारात काही दहशतवादी ठार झाल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे.
***
केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या
जनजागरण मोहिमेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार
आहे. या निमित्त अजमेर इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित
करतील.
***
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
होत आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले,
बाळासाहेब थोरात, विजय वेडेट्टीवार, अशोक चव्हाण
यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी धानोरकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं.
धानोरकर यांचं काल दिल्ली इथं निधन झालं होतं.
***
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला
यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.
यानिमित्त उद्यापासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमांचं उद्घघाटन होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,
केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह
शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
***
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन
नियम अधिसूचित केले आहेत. ऑनलाइन सामग्रीचे प्रकाशक नवीन नियमांचं पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, केंद्रीय आरोग्य मंत्रालय
आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय कठोर कारवाई करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं
सांगितलं आहे.
***
राज्य सरकारनं यंदाच्या वर्षी होणाऱ्या सर्वसाधारण बदल्या
३० जून पर्यंत करायला परवानगी दिली आहे. या बदल्या करण्याची सर्वसाधारण कालमर्यादा
३१ मे होती. यासंदर्भातला शासन आदेश सामान्य प्रशासन विभागानं काल प्रसिद्ध केला आहे.
***
राज्यातल्या सुमारे तीन हजार
गृहनिर्माण सोसायट्यांनी उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे त्यांच्या मासिक वीज बिलात मोठी घट होण्याबरोबरच, महावितरणच्या
पॉवरग्रीडमध्ये देखील, ५२ मेगा वॅट विजेची
भर पडली आहे. हे लक्षात घेता आणखी गृहनिर्माण सोसायट्यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे.
***
वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी शासनानं
पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यापुढे अशा संस्थांना
दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं
असून, त्यासोबतच वक्फ मिळकती भाडेतत्त्वांवर देण्यासंदर्भात नियमावली
देखील तयार करण्यात आली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ३०
दिवसांत सादर करण्याचे आदेश तीन हजार संस्थांना
देण्यात आले आहेत.
***
येत्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी, आणि या पिकावरच्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, तसंच कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी, असं आवाहन, नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात
या हंगामात जवळपास एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर कापूस पिकाची लागवड होण्याचा अंदाज
आहे.
***
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिंगोली
इथं जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक काल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षण विभागांनी निकषाची पूर्तता करुन जिल्ह्यातल्या सर्व
शाळा तंबाखू मुक्त कराव्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच विविध विभागांनी
आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी कायद्याचं उल्लंघन होत असल्यास २०० रुपयापर्यंत दंड आकरण्याबाबत
यावेळी सूचना देण्यात आल्या.
// **********//
No comments:
Post a Comment