Wednesday, 31 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे. यानिमित्त अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर समाजात योगदान देणाऱ्या दोन  महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागानं घेतला आहे.    
                                      ***

केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या जनजागरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज होणार आहे. या निमित्त अजमेर इथं आयोजित सभेला ते संबोधित करणार आहेत.

***

२०२३-२४ या वर्षात देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर कायम राहण्याचा अंदाज, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठाम आर्थिक धोरणं, किंमतींमधली घट आणि सरकारी खर्चाच्या गुणवत्तेवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या धोरणाचा परिणाम म्हणून हा दर कायम राहील, असं बँकेच्या काल प्रसिद्ध झालेल्या या अहवालात म्हटलं आहे. 

***

युरोपातलं युद्ध, चीननं सीमेवर तैनात केलेलं सैन्य, शेजारी देशातल्या समस्या यामुळं भारतासमोर वेगळी आव्हानं निर्माण झाली आहेत. मात्र, सीमेवर नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थिरता राखणं हे भारतीय लष्कराचं कर्तव्य आहे, असं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना म्हटलं आहे. 

***

देशाच्या महामार्ग विकासाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल एक बैठक झाली. कार्यक्षमता वाढवणं, आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची कास धरून प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या‌ उपायांवर या बैठकीत चर्चा झाली.

***

लखनौ इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले  विद्यापीठानं महिला टेनिस स्पर्धेत काल पहिलं सुवर्णपदक जिंकलं. त्यांनी गतविजेत्या उस्मानिया विद्यापीठाचा दोन - शून्य असा पराभव केला.

//***********//

No comments: