Thursday, 25 May 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र 25 मे 2023 सकाळी 11.00 वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय झारखंड दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज खुंटी इथं महिला मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती मुर्मू संध्याकाळी रांचीमधल्या नामकुम इथं भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत सभारंभाला उपस्थित राहतील.   

***

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता हा निकाल जाहीर होईल.

***

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या माळेगाव जवळ ट्रक आणि मेंढ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक दरम्यान आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर सुमारे दीडशे मेंढ्या दगावल्या आहेत. माळेगाव जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकनं पाठीमागून धडक दिल्यामुळं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

***

मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून चार दिवस तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

***

नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी ही माहिती दिली.

***

महावितरणतर्फे औरंगाबादमधे नारेगाव इथं आज विद्युत ग्राहकांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात ग्राहकांच्या वीजपुरवठा तसंच वीज देयकांसंदर्भातल्या तक्रारींचं निराकरण करण्यात येणार आहे.

***

औरंगाबाद इथं काल शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत महापालिकेकडून आरोग्य शिबीर घेण्यात आलं. या अभियानात लाभार्थींची रक्त तपासणी, कोविड प्रतिबंधक लसीकरण, तसंच आयुष्मान भारत आरोग्य सेवा नोंदणी करण्यात आली.

***

कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे इथं राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

//*************//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...