Sunday, 2 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 02.07.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 02 July 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०२ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या केके एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या इंजिनमध्ये सोलापूर जवळील मलिक पेठ इथं अचानक शॉर्टसर्किट झाल्यानं भीषण आग लागली. आज सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचं लक्षात येताच रेल्वे चालकानं सतर्कता बा‍ळगत तात्काळ गाडी थांबवली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही, रेल्वे चालक मात्र आग आटोक्यात आणताना भाजला गेला आहे. ही एक्सप्रेस आज सकाळी साडेसात वाजता कर्नाटकहून सोलापुरात दाखल झाली होती. तेथून ती दिल्लीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्यानंतर घाटणे परिसरात ही घटना घडली. या मार्गावरील धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्या नजिकच्या स्थानकात थांबवण्यात आल्या.
                                    ***

२०२५ पर्यंत देशात दरवर्षी ४४ कोटी नॅनो युरियाच्या बाटल्या तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं रसायन आणि खते मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशभरात नऊ ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.

काल आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडविया यांनी ही माहिती दिली. नॅनो युरियाच्या बाबतीत पिकांद्वारे युरिया शोषून घेण्याची क्षमता ८० टक्के आहे; तर पारंपरिक युरिेयाबाबत हे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. नॅनो युरिया लाभदायक असून त्याच्या वापरामुळे पीक उत्पादनात वाढ झाल्याचं ते म्हणाले. देश अधिकाधिक नॅनो युरियाचं उत्पादन करू शकणार असल्यानं त्याच्या निर्यातीसाठीदेखील प्रयत्न केले जातील असंही डॉ.मांडवीया यांनी यावेळी सांगितलं.

***

'एचडीएफसी' अर्थात हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि 'एचडीएफसी' बँक यांचं विलीनीकरण झाल्यानंतर कालपासून त्यांच्या एकत्रित कामकाजाला सुरुवात झाली आहे. या विलीनीकरणाला संचालक मंडळानं परवा शुक्रवारी मान्यता दिली. या विलीनीकरणामुळे जे पी मॉर्गन, 'आयसीबीसी' आणि 'बँक ऑफ अमेरिका' यांच्यानंतर बाजार मूल्यांनुसार 'एचडीएफसी' ही जगातील चौथी सर्वात मोठी बँक ठरली आहे. विलीनीकरणानंतर 'एचडीएफसी' बँकेच्या इतर प्रमुख उपकंपन्यांचा त्यात समावेश झाला आहे. या विलीनीकरणाची घोषणा ४ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आली होती.

***

भारतातील पंच्याहत्तर ऐतिहासिक दीपस्तंभांचं पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एक मोहीम सुरू केली आहे. गुजरातमधील द्वारका येथे द्वारका, गोपनाथ आणि वेरावळ या तीन सुधारित दीपगृहांचं पर्यटन स्थळात रूपांतर करून या मोहिमेचं अनावरण करण्यात आलं. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयानं या तीन दीपगृहांचं पुरेशा सुविधांसह नूतनीकरण केलं आहे. पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या भव्य वास्तूंची समृद्ध संस्कृती, महत्त्व आणि आकर्षकता दर्शविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तत्पूर्वी सूरत इथं सीआयआय बी - २० बैठकीला सोनोवाल उपस्थित राहिले. तिथं त्यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. भारतातील समृद्ध अंतर्देशीय जलमार्ग क्षेत्रात 'बी टू बी' आणि 'बी टू सी' या दोन्ही व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचं तसंच  किफायतशीर आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असलेल्या आंतरदेशीय जलमार्गाचा पर्याय मालवाहतुकीसाठी निवडण्याचं आवाहन सोनोवाल यांनी व्यावसायिकांना केलं. गंगा विलास या जगातील सर्वात लांब नदीवरील जलपर्यटनाला मिळालेलं यश लक्षात घेता जल पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन सोनोवाल यांनी व्यावसायिकांना यावेळी केलं.

***

दहशतवाद्यांना पैसा आणि अन्य मदत पुरवल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या सदस्यांच्या शोधात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं आज पहाटे पाटणा आणि दरभंगा इथं छापे टाकले. पीएफआयसंदर्भात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे  पाटणा इथल्या फुलवारी शरीफ आणि दरभंगा जिल्ह्यातील बेहेरा इथं हे छापे टाकण्यात आले असून एनआयएनं दरभंगा इथून एका संशयितालाही ताब्यात घेतलं आहे.

                                     ***
जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू झाली आहे. काल यात्रेच्या पहिल्या दिवशी सात हजारांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांनी भाविक गुहेत पोहोचत आहेत. दरम्यान, या दोन्ही मार्गावरून आज सुमारे साडेचार हजार भाविकांची दुसरी तुकडी निघत आहे. यात्रेच्या मार्गावर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

//************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...