Friday, 21 July 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.07.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 July 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

·      महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार -विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप.

·      नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तारदरवाडी तलाव फुटला; आपत्ती निवारण दल तैनात.

आणि

·      माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उद्यापासून औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर.

****

राज्यातल्या दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत आपल्या निवेदनातून ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली, ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश याबैठकीत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

या दुर्घटनेत वीस जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्घटना घडल्यानंतर, दोन तासांत प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. मदतकार्यात पाऊस, चिखल आणि धुक्याचा मोठा अडथळा होता, मात्र तरीही एकशे नव्व्याण्णव लोकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मदतकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचं निधन झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करत, शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इर्शाळवाडीतल्या नागरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या वेळी सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांनी मतभेद विसरून एकत्र प्रयत्न केले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान, विकासाच्या नादात निसर्गाशी छेडछाड करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालायला हवा, असं मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात विधानसभेत बोलताना व्यक्त केलं.

****

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरता स्थापन केलेल्या समितीला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

दरम्यान, या सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातंही जबाबदार असून, या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज विधान परिषदेत बोलत होते. या संदर्भात गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. सरकारने रुग्णवाहिका, तसंच वैद्यकीय पथकांचं कार्यक्रमस्थळी नियोजन केलं होतं तर घटनेवेळी या यंत्रणा कुठे होत्या असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.

****

राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सहाशे एकसष्ट खाजगी शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. यासंदर्भात हरिभाऊ बागडे, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्न केला होता.

****

मुंबई शहर आणि परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. दुपारी कुर्ला रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यानं उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

नवी मुंबई परिसरातही पावसाचा जोर वाढला असून, दुपारपर्यंत ४३ पूर्णांक ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरी भागात तसंच वाशी परिसरातल्या सखल भागात पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

रायगड जिल्ह्यातही चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरांची पडझड झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या दुथडी भरून वहात असल्यानं नदीकाठच्या तसंच दरडग्रस्त भागातल्या सातशे सहासष्ट लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

सातारा जिल्ह्यातल्या सातारा, वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या दरडप्रवण तालुक्यांमधल्या तीनशे एकसष्ट कुटुंबांचं तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव, पुसद आणि उमरखेड परिसरात काल रात्री मोठा पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये नाल्यांचं पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा शोधावा लागला, तसंच पिकं पाण्याखाली बुडाली.

चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सततच्या पावसामुळे अनेक तालुक्यातली शेती पाण्याखाली आली आहे. काही घरांची पडझड झाल्याचं वृत्त असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड मधील तारदरवाडी इथला तलाव अतिवृष्टीमुळे आज फुटला. याठिकाणी प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली असून आपत्ती निवारण दल तैनात करण्यात आलं आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सकाळी देगलूर आणि मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी गावकरी आणि शेतकऱ्यांना धीर देत प्रशासन नागरिकांच्या सोबत असल्याचं सांगितलं.

****

औरंगाबाद विभागात एक जून पासून आतापर्यंत २२९ मिली मीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली आहे. पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमी असून ८८ पूर्णांक आठ टक्केच पाऊस पडला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी १६८ मिली मीटर पाऊस झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३२७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात २७७, लातूर २४१, परभणी २०८, जालना २०४ आणि औरंगाबाद जिल्ह्यात २०२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३५ पूर्णांक २७ शतांश टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या, मोदी आडनाव मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये आज न्यायालयानं तक्रारदार पूर्णेश मोदी, गुजरात सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावली असून, याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या चार ऑगस्टला होणार आहे.

****

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वार उद्घाटन आणि पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे आणि पद्मश्री डॉ.यु.म.पठाण, डॉ.प्रभाकर मांडे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, गिरीश प्रमुणे, शब्बीर सय्यद, ना.धो.महानोर, कृषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. तसंच दिवंगत पद्मश्री फातेमा झकेरिया आणि पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार असून हा सन्मान त्यांचे कुटूंबीय स्वीकारणार आहेत. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात उद्या सायंकाळी पाच वाजता हा सोहळा होणार आहे. दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली आहे.

****

जैन साधू आचार्य कामकुमारनंदी महाराज यांचं अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली इथं जैन समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचं निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला तसंच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पाठवण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...