Tuesday, 1 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 01.08.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 01 August 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुणेरी पगडी, लोकमान्य टिळक वापरत होते तसं उपरणं, मानपत्र, चषक आणि एक लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पुण्यात एस पी महाविद्यालयात हा कार्यक्रम सुरु आहे. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, आपण लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशवासियांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. या पुरस्काराने आपण आनंदी आणि भाऊक झालो असल्याचं ते म्हणाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तही पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दीपक टिळक, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित आहेत.

या पुरस्कारासाठी जगप्रसिद्ध नेते नरेंद्र मोदी यांची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे आभार मानले. लोकमान्य टिळकांप्रमाणेच, पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांना देखील लोकमान्यता मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.

शरद पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमान्य टिळकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करुन दर्शन घेतलं. पुणे विमानतळावर त्यांचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं.

यानंतर पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन तसंच, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचं हस्तांतरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

****

थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे.

****

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तिनाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातल्या सारसबाग इथल्या त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा मातंग समाज आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीनं आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोने पाठवलेल्या भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान - तीनने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चांद्रयानानं पृथ्वीच्या कक्षेच्या आजूबाजूला आपल्या फेऱ्या पूर्ण केल्या असून, आता ते चंद्राच्या दिशेनं झेपावलं आहे. पाच ऑगस्टला यानाला चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल.

****

ठाणे जिल्ह्यात शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असताना क्रेन आणि गर्डर कोसळळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १७ झाली आहे. यामध्ये पाच साईट इंजिनियर आणि १२ कामगारांचा समावेश आहे. यात तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

राज्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात होत आहे. यानिमित्त विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महसूल विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना त्याचा लाभ घेता यावा, या उद्देशानं महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं.

****

हिंगोली जिल्ह्यातले उद्योजक, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या निर्यात क्षमता वृद्धीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे निर्यातबंधू योजनेअंतर्गत काल एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यावेळी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातल्या उद्योजकांनी जिल्ह्याचा एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

नांदेड जिल्ह्यात माहूर जवळ कोसदणी गावाच्या नाल्याजवळ आयशर ट्रकने पोलिस वहानाला धडक देऊन झालेल्या अपघातात एक पोलिस कर्मचारी आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला. काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या रस्त्यावर पोलिस एका ट्रकची तपासणी करत असताना हा अपघात झाला.   

****

संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतले चांभार, ढोर, होलार, मोची या चार जातीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचे सन २०२३-२४ करता उद्दिष्ट प्राप्त झालं आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना आज त्रिनिदाद इथं खेळला जाणार आहे.

****

आगामी दोन दिवसात मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

 

//************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...