Tuesday, 1 August 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.08.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      ४१वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समारंभपूर्वक प्रदान.

·      समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या २०; सरकारकडून मदत जाहीर.

·      केंद्र सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत येत्या आठ तारखेपासून चर्चा.

आणि

·      माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं आज पुण्यात सन्मानित करण्यात आलं. पुणेरी पगडी, लोकमान्य टिळक वापरत होते तसं उपरणं, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्यात एस पी महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, आपण लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशवासियांना समर्पित करत असल्याचं आणि पुरस्काराची रक्कम नमामि गंगा परियोजनेसाठी देत असल्याचं जाहीर केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं.

 

या समारंभाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दीपक टिळक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

या पुरस्कारासाठी जगप्रसिद्ध नेते नरेंद्र मोदी यांची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे आभार मानले. लोकमान्य टिळकांप्रमाणेच, पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांना देखील लोकमान्यता मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.

शरद पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमान्य टिळकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी आज सकाळी पुण्यात दाखल झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करून दर्शन घेतलं. पुण्यातल्या विविध विकासकामांचं लोकार्पण तसंच काही नवीन विकासकामांचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यामध्ये पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आणि पुणे महानगर पालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचं हस्तांतरण, कचऱ्यातून ऊर्जा या प्रकल्पाचं उद्घाटन, या विकासकामांचा समावेश आहे. या वेळी लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात घरांची किल्ली सोपवण्यात आली.

ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना असून, क्रांतिकार्यात मोठं योगदान देणाऱ्या पुणे शहरात या महिन्यात येण्याचं भाग्य मला लाभलं याचा आनंद आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राज्यांच्या विकासातून देशाचा विकास, हाच आमचा मंत्र आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. पुणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारं महत्वाचं शहर असल्याचं नमूद करत, स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासानं देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली, अशी प्रशंसा पंतप्रधानांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, नऊ महिन्यात पंतप्रधान चार वेळा राज्यात आल्याचं सांगत, राज्यात समविचारी सरकार असल्यानं विकासकामं जलद गतीनं होत आहेत, असं प्रतिपादन केलं.

****

थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनातल्या लोकमान्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही मुंबईत गिरगाव चौपाटी इथे लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त आज राजभवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

औरंगाबाद इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासून विविध पक्षसंघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

****

औरंगाबाद इथल्या, एकशे तीन वर्षांची परंपरा लाभलेल्या बलवंत वाचनालयात आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि वाचनालयाचा एकशे तीनवा वर्धापनदिन यानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. वाचनालयातल्या अमूल्य ग्रंथसंपदेचा वाचकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन या कार्यक्रमाचे आणि बलवंत वाचनालयाचे अध्यक्ष विपीनकुमार बाकलीवाल यांनी केलं.

****

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर काल रात्री ठाणे जिल्ह्यात झालेल्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये तर राज्यसरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जखमींना पंतप्रधानांनी प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याची सूचना केली आहे. शहापूर जवळ सरलांबे इथं पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असताना क्रेन आणि गर्डर कोसळून झालेल्या या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता वीस झाली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समृध्दी महामार्गाचं तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना हा अपघात घडला.

****

विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, पंतप्रधान या प्रस्तावावर येत्या दहा तारखेला उत्तर देण्याची शक्यता आहे. बिजू जनता दलानं पंतप्रधानांवरच्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

मणिपूर हिंसेच्या मुद्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज प्रभावित झालं. या गदारोळातच लोकसभेत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सुधारणा विधेयक २०२३ मांडण्यात आलं. या विधेयकामुळे दिल्ली सरकारच्या कामकाजासंबंधी कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे. या संदर्भातला अध्यादेश सरकारनं या आधीच आणला आहे. या विधेयकाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केला, तर, बिजू जनता दलानं या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बिजू जनता दलाच्या या निर्णयामुळे राज्यसभेत हे विधेयक पारित होण्यासाठी केंद्र सरकारला मदत होणार आहे.

दरम्यान, राज्यसभेनं दुपारच्या सत्रात आज बहु राज्य सहकारी संस्था सुधारणा विधेयक २०२३ पारित केलं. तर लोकसभेनं आज अनुसूचित जाती आदेश घटना दुरुस्ती विधेयक मंजूर केलं.

****

काँग्रेस पक्षानं, विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची शिफारस केली आहे. अजित पवार गट सरकारमध्ये गेल्यानंतर विरोधीपक्ष नेतेपद संख्याबळानुसार काँग्रेसकडे गेलं. त्यानुसार या पदासाठी काँग्रेस पक्षानं आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. वडेट्टीवार यांच्याकडे दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. याआधी २०१९ मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं.

****

तेल कंपन्यांनी आज, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र काहीच बदल झालेला नाही.

****

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त देशभरात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यातून सात हजार पाचशे कलशांमध्ये माती तसंच विविध रोपं घेऊन दिल्लीत पोहोचेल. राष्ट्रीय युद्धस्मारकाजवळ कलशातली माती आणि झाडांचा उपयोग करत 'अमृत वाटिका' निर्माण करण्यात येईल. ही अमृत वाटिका 'एक भारत श्रेष्ठ भारत' चं भव्य प्रतीक बनावी, असा सरकारचा मानस आहे. या उपक्रमासाठी लातूर जिल्हा परिषदेनं एक मोबाईल ॲप तयार केलं असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर करावा, असं आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...