Saturday, 23 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक :23.12.2023 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 23 December 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करावं-आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचं आवाहन

·      छत्रपती संभाजीनगर इथं कोविडचे दोन रुग्ण;स्रावाचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी रवाना

·      नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा

·      मराठा समाजातल्या सुमारे साडे ३ हजार उमेदवारांना EWS वर्गातून नियुक्तीचा मार्ग मोकळा

आणि

·      विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड वाटप

 

सविस्तर बातम्या

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड प्रतिबंधासाठीच्या वर्तणुकीचे काटेकोर पालन करावं, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल पुण्यात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हा स्तरावर रुग्णालयांतल्या यंत्रणेची प्रायोगिक चाचणी-मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सावंत यांनी आरोग्य विभागाला दिले आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको एन सेवन परिसरात काल कोविडचे दोन रुग्ण आढळले. यात एका दहा वर्षीय बालिका तसंच ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी सांगितलं. या दोन्ही रुग्णांच्या श्वसन स्रावाचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे, या चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ मंडलेचा यांनी दिली.

जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेऊन पुढील तपासण्या करण्याची सूचना पाण्डेय यांनी केली आहे.

****

सांगली-मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे दोन नवीन रुग्ण आढळून आले असून या दोनही रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे.

****

नागपूर जिल्हा सहकारी बँक -एनडीसीसी मध्ये दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा घोटाळा झालं होता, त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. या प्रकरणी नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांच्या न्यायालयाने केदार यांच्यासह पाच जणांना काल निर्णय देत या सर्वांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत SEBC अर्थात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना EWS अर्थात आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या वर्गातून आरक्षणाचा लाभ द्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे मराठा समाजातल्या तीन हजार ४८५ उमेदवारांचा नोकरीचा मार्ग मोकळा झाला असून या उमेदवारांना EWS मधून नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

****

दरम्यान, मराठा समाजातल्या ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत, त्यांच्यासाठी सर्वेक्षण करून विशेष अधिवेशनात कायदा करू असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पुस्तक महोत्सवाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

****

राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या अखिल भारतीय थल सैनिक शिबीरात सर्वोत्तम ठरलेल्या कॅडेट्सचा एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांच्याहस्ते काल सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या शिबीरात महाराष्ट्रातल्या कॅडेट्सनी मुलींच्या गटात दुसरा तर मुलांच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं एनसीसी मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात योगेंदर सिंह यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या पथकाने दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरचं कौतुक केलं.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत एक कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. एकोणऐंशी हजारांहून अधिक विकसित भारत आरोग्य शिबिरांमध्ये १ कोटी ३१ लाख ६६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ४९ लाखांहून अधिक लोकांची क्षयरोग तपासणी तर, ३ लाख ४० हजारांहून अधिक नागरिकांना उच्च दर्जाच्या  सार्वजनिक आरोग्य सुविधांची शिफारस करण्यात आली.

दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरातील साई मंदिर इथं पोहचली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी यावेळी बोलताना, योजना समजून-जाणून घ्या आणि लाभार्थी बना असं आवाहन केलं. ते म्हणाले...

Byte…

या गाडीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत कशी मिळते ही माहिती दिली जाते. मी आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आपलं आरोग्य असेल, आपल्या घरातील गॅस असेल, आपला राहण्यासाठी घर असेल किंवा आपणाला लागणारा, गोरगरिबांसाठी अन्नधान्य असतील, शेतकऱ्यांसाठी निधी असेल अशा वेगवेगळ्या जवळजवळ ३४ योजनांची माहिती दिली जाते. आपण सुद्धा यामध्ये समावेश पहा आणि आपला विकास करा. आपला विकास म्हणजे भारत देशाचा विकास.

****

या यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात अनेक लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं

****

विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश गावखेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनाचा लाभ पोहोचवण्याचं केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होत्या. लवंगारे वर्मा यांनी धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या या संकल्प यात्रेचाही काल आढावा घेऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.

****

ही संकल्प यात्रा आज परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करणार आहे. नागरिकांनी शासकीय योजनांसाठी नोंदणी करून लाभ प्राप्त करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

सर्वसामान्य समाजबांधवांनी भक्कम साथ दिल्यामुळेच आरक्षण हे दृष्टिपथात आलं असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या सभेत बोलत होते. लातूर जिल्ह्यात रेणापूर इथंही जरांगे पाटील यांनी काल जाहीर सभेला संबोधित केलं.

****

वेल्डींग क्षेत्राची नवीन तंत्रज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी महाज्योती योजनेच्या माध्यमातून मराठवाडा ऑटो क्लस्टर इथं अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरु करता येईल, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथं वेल्ड टेक फेअर -२०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. या प्रदर्शनात १५ उत्पादक तसंच विक्रेत्यांनी आपली उत्पादनं प्रदर्शित केली आहेत.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सव येत्या जानेवारी ते मे महिन्यादरम्यान होणार आहे. याअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यात नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत कलावंतानी भाग घ्यावा, असं आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीड शाखेच्या अध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केलं आहे. त्या काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. इच्छुक कलावंतांना ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, हे प्रवेश अर्ज नाट्यपरिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...