Monday, 22 January 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.01.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 January 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      आजचा अलौकिक क्षण पुढची हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील-अयोध्येत बाळराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      अयोध्येतल्या सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह-शोभायात्रा, कलशयात्रा, महाआरतीसह आतिषबाजी

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण

आणि

·      ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन

****

आजचा अलौकिक क्षण पुढची हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमी स्थळी उभारलेल्या मंदिरात बाळरामाच्या मूर्तीची आज विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान या सोहळ्यात संपूर्ण देशाच्या वतीनं सहभागी झाले, त्यानंतर ते बोलत होते. हा क्षण अनुभवणं आणि या क्षणाचे साक्षीदार होणं ही आमच्यासाठी प्रभु रामचंद्राची कृपा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. राममूर्तीच्या या प्रतिष्ठापना सोहळ्यात उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. या सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी देशभरातून उपस्थित हजारो संतमहंतांना अभिवादन केलं, मंदिर उभारण्यात महत्त्वाचं योगदान असलेल्या श्रमिकांचा पंतप्रधानांनी पुष्पवर्षाव करून सन्मान केला.

****

अयोध्येच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं ऐतिहासिक श्री कोपिनेश्वर मंदिरात श्री प्रभू रामाची आरती केली. मंदिरात अयोध्येतल्या थेट प्रक्षेपणासाठी स्क्रीन लावण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवरांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.

प्रभु राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

****

अयोध्येत बाळरामाची प्रतिष्ठापना ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज नागपूर इथं राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. कारसेवक म्हणून फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे यावेळी सत्कार करण्यात आला. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक नृत्य करुन आनंद व्यक्त केला.

****

नाशिक इथल्याही काळाराम मंदिरात ढोल ताशांचा गजर, शंखध्वनी आणि घंटानादात रामजयघोष निनादला. मंदिरासह संपूर्ण परिसरात भगवे झेंडे आणि झेंडूच्या माळांनी फुलून गेला आहे. असंख्य भाविकांनी यावेळी रामाचं दर्शन घेतलं.

****

अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं छत्रपती संभाजीनगर इथंही अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते राम मूर्तीची प्रतिष्ठापना होताच घरोघरी नागरिकांनी प्रभुरामाच्या प्रतिमेचं पूजन करून आरती केली.

छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये विविध संघटनांच्या वतीने मिरवणुका काढण्यात येत आहे. वसाहतींमधूनही रामप्रतिमांच्या मिरवणुकांसह कलश यात्रा आणि रामनाम जपाच्या गजराने परिसर दणाणून गेला. किराडपुरा इथल्या श्रीराम मंदिरात १०५ किलो वजनाचा मोठा लाडूचा प्रसाद वितरित केला जाणार असून, या मंदिरात रात्री बारा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम चालणार असल्याचं, संस्थानचे प्रमुख दयाराम बसैये यांनी सांगितलं आहे.

 

समर्थ नगर परिसरातल्या समर्थ राम मंदिरातही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, भाविकांनी रामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. खडकेश्वर मंदिर इथं आज संध्याकाळी अकरा हजार एकशे अकरा दीप प्रज्वलन तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

नगरखाना इथल्या ३५० वर्षांपूर्वीच्या श्रीरामाच्या मूर्तीची पाटीदार समाजाच्या वतीने विधिवत पूजा करण्यात आली.

****

जालना शहरातल्या बडीसडक इथल्या श्रीराम मंदिराचा कलशारोहण सोहळा आज झाला. आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात अखंड रामजपासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यात जाफराबाद, भोकरदन, मंठा, अंबड शहरातही यानिमित्त श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करत प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष केला. आज सायंकाळी ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.

****

बीड शहरासह जिल्हाभरात हा उत्सव साजरा करण्यात आला. बीड इथं पारंपरिक टाळ- मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, भाजपतर्फे काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली आणि नमो चषक क्रीडा स्पर्धेचे पारितोषिकं वितरण करण्यात आले.

अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, आष्टी, केज, परळी आदी ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे.

****

लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी श्रीरामाचा जयघोष केला. रामरक्षा पठण तसंच दीपोत्सवात नागरिकांनी सहभाग घेतला.

****

 

नांदेड इथं विविध मंदिरामध्ये पहाटेपासूनच धार्मिक विधी करण्यात आले. दुपारच्या सुमारास रामलल्लांची प्रतिष्ठापना होताच शहराच्या अनेक भागात आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान, नांदेड इथं सायंकाळी गोदावरी तिरी आरती करण्यात येणार असल्याची माहिती, संयोजक प्रणिता चिखलीकर यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं आज श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रम झाला. परिसरातल्या ६ हजार स्वयंसेवक महिलांना आमदार तानाजी मुटकुळे, खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते साड्यांचं आणि साखरेचं वाटप करण्यात आलं. दरम्यान, गावातून सकाळी महिलांनी भव्य शोभायात्रा काढली.

धाराशिव इथं विविध मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांचं पूजन, शोभायात्रा, भजन, ज्ञानेश्वरीचे सामूहिक वाचन, महाप्रसाद आदी उपक्रमांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला.

****

परभणी इथं सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पारंपारिक वाद्यांसह गोंधळी, हलगी पथक तसंच लेझीम पथकासह विविध वेषभुषा केलेले नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी होत आहेत.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, २०२४ चं वितरण करण्यात येणार आहे. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल, देशभरातून निवडलेल्या १९ मुलांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यामध्ये महाराष्ट्रातल्या नंदूरबार इथल्या आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उद्या पंतप्रधान या मुलांशी संवाद साधणार आहेत.

****

तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात आज पारंपारिक जलकुंभ यात्रा काढण्यात आली. डोक्यावर पवित्र जलकुंभ घेतलेल्या महिला या जलयात्रेत सहभागी झाल्या. मंदिर संस्थानच्या वतीनं या महिलांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. दरम्यान देवीची आज शेषशायी पूजा बांधण्यात आली.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आसाम इथल्या भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं शिवसेना महाअधिवेशनाच्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

****

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट नेते विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घाटी रुग्णालयाला दान म्हणून देण्यात आला.

****

विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक लाभार्थी आपल्या लाभाबाबत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत माहिती देत आहेत. जालना इथले मनोज मामलेकर, जयश्री सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.

बाईट - मनोज मामलेकर आणि जयश्री सूर्यवंशी जि.जालना

****

परभणी इथं सय्यद शाह तुराबुल हक यांचा १ फेब्रुवारीपासून ऊर्स भरणार असून, या ऊर्स काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचं, आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...