Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 April 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज प्रक्रियेला वेग;तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या ११ मतदार संघात एकूण २५८ उमेदवार
· गुजरातमध्ये सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय
· राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
· हनुमान जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा;सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
· १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश याला कॅनडातल्या कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याला आता वेग आला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात काल दिवसभरात चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांनी एक, तसंच महायुतीकडून शिवसेनेचे संदिपान भुमरे यांनी दोन, तर अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
जालना लोकसभा मतदार संघातून काल २२ जणांनी २३ उमेदवारी अर्ज घेतले. आतापर्यंत ७७ जणांनी १८६ अर्ज घेतले आहेत, तर आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातली अर्जप्रक्रिया पूर्ण झाली आहे. या टप्प्यात आता २५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात ३१, लातूर इथं २८, रायगड १३, बारामती ३८, सोलापूर २१, माढा ३२, सांगली २०, सातारा १६, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ९, कोल्हापूर २३, तर हातकणंगले मतदार संघात २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काल चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदार संघातून ३१ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या उमेदवारांना चिन्ह वाटपही काल करण्यात आलं.
लातूर मतदार संघातून छाननीअंती वैध ठरलेल्या ३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी काल माघार घेतली, आता २८ उमेदवार या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड, यांच्यासह अकरा जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता या मतदार संघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीचे राम सातपुते यांच्यासह २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे आता या मतदार संघात महायुतीचे संजय पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे.
****
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काल मुंबईत पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल निवडणूक जाहीरनामा जाहीर केला. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसुत्रीनुसार काम करणार असल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
****
गुजरातमधल्या सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल त्यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, तर उर्वरित उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तसंच भरतनाट्यम नृत्यांगना डॉ पद्मा सुब्रह्मण्यम् यांना पद्मविभूषण, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेता मिथुन चक्रवर्ती तसंच गायिका उषा उत्थुप यांना पद्मभूषण तर माजी राज्यपाल राम नाईक, डॉ. मनोहर डोळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. झहीर इशाक काझी, उद्योजक कल्पना मोरपारिया यांच्यासह अनेक मान्यवरांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
हनुमान जन्मोत्सव आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर इथं सुपारी हनुमान तसंच जिल्ह्यात खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरासह ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या जांभुळबेटावरही भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं वृत्त आहे.
****
चैत्र पौर्णिमेनिमित्त आदिशक्तीच्या विविध देवस्थानच्या यात्रांना आजपासून प्रारंभ होत आहे. तुळजापूर इथं तुळजाभवानी देवी तसंच येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी काढली जाते, या दिवशी चुनखडी वेचून पालखीवर वाहण्याचा प्रघात आहे.
****
भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर युवा बुद्धिबळपटू डी.गुकेश यानं कॅनडा इथं झालेल्या कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे. यानंतर विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचा प्रचार आता वेग घेत आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात राहता इथं प्रचार सभा घेतली. महायुतीचे अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील तसंच शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या या सभेला उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनीही संबोधित केलं.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल जाहीर सभा झाली. सिंचन आणि दळणवळण या मुद्यांवर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केलेल्या भाषणात, मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी आपण भाजपात आल्याचं सांगितलं.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ काल युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरूवात झाली. ही मिरवणूक पैठणगेट, गुलमंडी, मच्छली खडक, पानदरिबा मार्गे संस्थान गणपती जवळ विसर्जित करण्यात आली.
****
अमरावती इथं काल महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली. या दोन्ही नेत्यांनी यावेळी केलेल्या भाषणात भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली.
****
राज्यभरात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
नांदेड इथं स्वीप कक्षाच्या वतीनं काल जिल्हा पोलिस परेड मैदानावर विविध उपक्रम राबवण्यात आले. महिला लेझीम पथक, पथनाट्य, मी मतदान करणारच अशी शपथ, विविध स्पर्धा यासह विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. संस्कार भारतीच्या वतीने जिल्हा पोलीस परेड मैदानावर भव्य रांगोळी काढून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. कंधार तालुक्यातल्या पांगरा इथल्या अंगणवाडीतील बालकांनी मतदान जनजागृती गीत, तर नांदेड इथल्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाचा बाहेरील आणि अंतर्गत भाग मतदानाच्या जनजागृतीचे आकर्षक पोस्टर आणि गोल पताका लावून सजवण्यात आला आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठीच्या माध्यम कक्षातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली.
दरम्यान, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील, आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी, परस्परांच्या आचारसंहिताभंगाच्या तक्रारीवरून खुलासा करण्यासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत.
****
लातूर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी येत्या शनिवारी २७ तारखेला तर नांदेड मतदार संघातल्या २३ उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी उद्या होणार आहे. निवडणूक काळात तीन वेळा नोंदवही तपासणी केली जाते. नांदेड इथं याआधी १२ आणि १८ एप्रिलला दोन खर्च तपासण्या झाल्या आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एक हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं दिला आहे. यात तीनशे पाच गावातल्या दोन हजार ८३३ शेतकऱ्यांच्या बागायती जिरायती पिकांचं नुकसान झालं आहे.
****
No comments:
Post a Comment