Wednesday, 1 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:01.05.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०१ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

महाराष्ट्र दिन आज साजरा होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत, लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, लातूर इथं राज्याचे  क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते, हिंगोली पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, तर नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अयोध्या दौर्यावर जाणार असून, संध्याकाळी त्या श्रीराम जन्मभूमी मंदीरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर हनुमागढी इथं भेट देऊन, त्या शरयू आरतीमध्ये सहभागी होणार आहेत.

****

तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १९ रुपये कपात केली आहे. त्यानुसार मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत एक हजार ६९८ रुपये पाच पैसे इतकी झाली आहे. हे नवे दर तत्काळ प्रभावाने लागू झाले.

****

No comments: