Wednesday, 29 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:29.05.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन 

·      पुण्यातल्या पोर्शे कार अपघाताची सीबीआयमार्फत चौकशीची काँग्रेस पक्षाची मागणी

·      लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मराठवाड्यात प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण

·      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र अभिवादन

आणि

·      दक्षिण मराठवाड्यात पुढील २४ ते ३६ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता

 

सविस्तर बातम्या

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातला दुष्काळ तसंच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीटीचे पंचनामे, औषधी तसंच अन्नधान्य पुरवठा, तसंच परराज्यातून येणाऱ्या पाण्याबद्दल समन्वय यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी, वार्ताहरांशी बोलताना दिली.

****

पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फतच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अंमली पदार्थांचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असून, या रुग्णालयाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर एक पोस्ट करत, रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन चालकाचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं ३१ मे पर्यंत वाढ केली आहे. तर अटक केलेल्या दोन डॉक्टरांसह तिघांना सत्र न्यायालयानं ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या चार जूनला होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी, काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं.

****

नांदेड लोकसभा मतदार संघातल्या मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल सर्व उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या व्यवस्थेची पाहणीही राऊत यांनी केली.

****

मतमोजणी प्रक्रियेसाठी लातूर मतदार संघात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी काल प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि अचूक होण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

****

परभणी इथंही मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. मतमोजणीसाठी कर्मचारी आणि सुक्ष्म निरिक्षक असे एकूण ४२५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

****

हिंगोली इथंही जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल मतमोजणीचं प्रशिक्षण देण्यात आलं. ही जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केलं.

****

दहावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या १७ शाळांचा निकाल ८७ पूर्णांक ७० टक्के लागला असून, दोन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या सर्व १७ शाळांमधून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ५१ विद्यार्थ्यांचा काल मनपा मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी काल राजभवनात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या शासकीय निवासस्थानी, सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. शहरातल्या विविध संघटनांच्यावतीनं समर्थ नगर भागात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

नांदेड महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी, सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या सावरकर चौकात ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर सतीश महामुनी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. धाराशिव इथं जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीनं, अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते नारीशक्ती सन्मान सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४५ महिलांचा सत्कार करण्यात आला.

****

सावरकर जयंतीचं औचित्य साधून काल अंबाजोगाई इथं, 'भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा' या प्रवीण सरदेशमुख लिखित ग्रंथाचं प्रकाशन झालं, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरी शहरातलं ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातल्या सावरकर स्मारकात, सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

अहमदनगर शहराचा ५३४ वा स्थापना दिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा इथंल्या कबरीवर चादर अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व धर्माचे धर्मगुरु उपस्थित होते. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

****

दक्षिण मराठवाड्यात पुढील ३६ ते ४८ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या, ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस काल दक्षिण अरबी समुद्रात आणखी पुढे सरकला, येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये, तो दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ तसंच बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

****

पुण्यात काल एका ट्रकच्या धडकेत लातूरच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. आदिल शेख आणि फहाद शेख अशी त्यांची नावं असून, हे दोघं पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होते. काल खराडी नाका परिसरात त्यांच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला.

****

छत्रपती संभाजीनगर इथले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड पंडित मुंडे यांचं काल निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज बीड जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते प्राध्यापक डी एल हिवराळे यांचं काल कर्करोगानं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

धाराशिव जिल्हयात जनावरांना आवश्यक असलेला चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली असून, जून महिन्यात विभागातर्फे सुधारीत मका वैरण बियाणांचं वाटप करण्यात येणार असल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतर्फे ४० तलावांमधून आतापर्यंत ४४ हजार २८७ ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला आहे. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी घेवून जावा, असं आवाहन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी काल बिलोली तालुक्यात विविध गावांना भेटी देवून या कामांची पाहणी केली.

****

लातूर शहराला सध्या मांजरा प्रकल्पातल्या मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांनी नादुरुस्त असलेल्या नळ जोडण्या तातडीने दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी, असं आवाहन लातूर महापालिकेनं केलं आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही  देण्यात आला आहे.

दरम्यान, लातूर महानगरपालिकेनं मालमत्ता कर थकवलेल्या १२ गाळ्यांना काल टाळे ठोकलं तसंच १८ लाख २ हजार ५४७ रुपये कर वसूल केला.

****

धाराशिव जिल्ह्यात २५ मंडळात सोयबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी ३७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात, ३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. नुकसान भरपाईची रक्कम ठरवण्याची कार्यप्रणाली बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

****

जालना पंचायत समितीतला कंत्राटी रोजगार सेवक भाऊसाहेब गिराम याला काल अडीच हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मंजूर विहिरीचं मस्टर मंजूर करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.

****

धाराशिव जिल्हा कोषागार कार्यालयातल्या निवृत्ती वेतन शाखेतला लेखा लिपीक अनंता कानडे याला तीन हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून काल रंगेहाथ पकडलं. सेवानिवृत्ती वेतन मंजुरी प्रस्ताव आणि पेन्शन विक्रीच्या प्रलंबित बिलासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

पालघर रेल्वे स्थानकात काल संध्याकाळी लोखंडी कॉइल वाहून नेणाऱ्या मालगाडीचे जवळपास सात डब्बे रुळावरून घसरले. त्यामुळे पश्चिम रेल्वेची मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

****

 

No comments: